Thursday, September 13, 2018

मोदकाख्यान


मोदक डेज्‌ आर हिअर अगेन.... आपल्या खाद्ययात्रेतला हा एक राजस पदार्थ. बुद्धिदात्या गणरायाचा आवडता. 
आठ-पंधरा दिवसांपूर्वी व्हॉट्‌सऍपवर एक पोस्ट फिरत होती. मोदकांचा आस्वाद घेण्यातला आनंद तितक्‍याच रसभरीत शब्दांत सांगणारी ही पोस्ट ज्यांनीज्यांनी वाचली असेल त्यांनात्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली असणार. हे व्हॉट्‌सऍप नावाचं प्रकरण मात्र एकदम भारी आहे. एकविसाव्या शतकात जगण्यासाठी अन्न-वस्त्र-निवाऱ्या इतकंच आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या आयुधांपैकी एक असलेल्या स्मार्ट फोनात असणाऱ्या असंख्य ऍपांपैकी एक -एवढीच या व्हॉट्‌सऍपची ओळख नाहीये. व्हॉट्‌सऍपनी आपली आयुष्य क्रांतीच्या भलत्याच वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवली आहेत. मुख्य म्हणजे या व्हॉट्‌सऍपनी आपल्याला एकदम "फॉरवर्ड' बनवलं आहे. (इथे "फॉरवर्ड'चा अर्थ "प्रगत' किंवा "पुढारलेला' असा नसून, हातातल्या फोनवर जे येईल ते "पुढे ढकलणारा असा घ्यावा.) तर उकडीच्या मोदकांबद्दलची ती पोस्ट अशीच फिरत फिरत माझ्यापर्यंत आली तेव्हा मूळ पोस्टकर्त्यांची ओळख पुसली गेली होती. फक्त (त्या मूळ लेखकाचं) नशीब इतकंच की पोस्ट कुणा दुसऱ्याच्या नावावर खपवलेली नव्हती. 
""अंतर्बाह्य सौंदर्याने भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो.'' बस्स... हे लिहीणारा किंवा लिहीणारी अंतर्बाह्य मोदकांच्या प्रेमात असणार. 
मोदक करणे हे एकूणच कौशल्याचं काम. नजाकतीनं करण्याचं. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून, ते सावलीत वाळवून, दळून ते त्याची उकड काढे पर्यंतची एक स्टेप. उकड काढण्यासाठी पाणी तयार करताना मोहन घालणं हा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. मोहन म्हणजे पाण्यात तेल किंवा तूप घालायचं का तेला-तुपात पाणी, हे कळण्यापासून तयारी लागते. मग छान पिवळ्या रंगाचा गूळ आणि ओल्या खोबऱ्याचं सारण जमायला हवं. उकड काढल्यावर हाताला तेल आणि पाणी लावून ती मळायची. इतकं सगळं जर सुरळीत पार पडलं तर मग गाडी मोदक वळण्याकडे वळते. बर हे वळण पुन्हा सरळ नाहीच. मळलेल्या उकडीचा गोळा घेऊन त्यात एक खळगा करायचा. ही मोदकाची पारी. मोदक उकडीचा असो किंवा कणकेचा, पारी पातळ हवी. पारी जाड झाली तर मोदकाची चव जाते. पण पारी पातळ आहे म्हणून मोदक फुटता कामा नये. मग त्या पारीत सारण भरून कळ्या किंवा मुखऱ्या करून तो मोदक बंद करायचा आणि मोदकपात्रात केळीच्या पानाच्या तुकड्यावर ठेवून वाफवायचा. मोदकाच्या पारीच्या कळ्या आणि मोदकाचं नाक ही स्वतंत्र कौशल्यं आहेत. नाहीतर एवढा घाट घालूनही मोदक "जमले नाहीत'चा शिक्का बसतो तो वेगळाच. 
*** 

पद्मपुराणातल्या सृष्टीखंडात महर्षी व्यास मोदकाची कथा सांगतात. या आख्यायिकेनुसार मोदकाची निर्मिती प्रत्यक्ष देवांनी केली आहे. सर्वप्रथम पूजा कोणाची करावी या संजयाच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना व्यास महर्षी मोदकाची कथा सांगतात. एकदा सर्व देवांनी विशेष श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला, आनंददायक असा देवी पार्वतीकडे दिला. त्या मोदकाचे नाव महाबुद्धी. देवांनी बनवलेला हा मोदक विशेष होता. त्याच्या केवळ वासाने अमरत्व प्राप्त होईल; हा मोदक सेवन करणारा सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ, सर्व शस्त्रास्त्रविद्यापारंगत आणि सर्व तंत्रात निपुण होईल; तसाच तो लेखक, चित्रकार आणि ज्ञानविज्ञानतत्त्ववेत्ता होऊन सर्वज्ञ होईल, अशी त्या मोदकाची ख्याती होती. स्कंद आणि गणेश ही शंकर आणि पार्वतीची दोन मुले. दोघांही मुलांनी पार्वतीकडे त्या मोदकाची मागणी केल्यावर, मोदक मिळवण्यासाठी पार्वतीने दोन्ही मुलांना शंभर सिद्धी प्राप्त करण्याची अट घातली. हे ऐकताच स्कंद मोरावर बसून जगातल्या सर्व तीर्थांमध्ये स्नान करून एका क्षणात परत आला. बुद्धिमान गणेशाने मात्र आईवडिलांनी श्रद्धेने प्रदक्षिणा घातली आणि तो त्यांच्यासमोर उभा राहिला. पार्वती म्हणाली, ""सर्व तीर्थांत केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व प्रकारची यज्ञयागादिक व्रते, नाना प्रकारचे यमनियम, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाएवढेही होऊ शकत नाही. तेव्हा, गणेश शंभर पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याने आईवडिलांची पूजा केली आहे. त्यालाच मी हा मोदक देते. यामुळेच गणेशाला यज्ञयागात, वेदशास्त्रादी स्तवनात, नित्य पूजाविधानात प्राथम्य मिळेल, असा वरही शंकर-पार्वतीनी गणेशाला दिला. गजाननाला मोदक प्रिय झाला तो तेव्हापासून. आणि गणपतीच्या अनेक नावांमध्ये आणखी एका नावाचीही भर पडली -मोदकप्रिय. अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केल्यानंतर प्रकट झालेल्या अमृतकुंभासाठी देव आणि दानवांमध्ये एक युद्ध झाले. युद्धाच्या धामधुमीत अमृतकुंभातले चार थेंब जमिनीवर सांडले. त्यापैकी एक थेंब पडला उज्जैनला क्षिप्रा नदीत. महाकालेश्‍वराच्या या अमृतक्षेत्री असलेल्या गजाननाच्या सहा मंदिरांमधलं एक मंदिर या मोदकप्रियाचंही आहे. 
ब्रह्मांडपुराण, नारदपुराणातल्या गणपती व्रतांमध्ये आणि अन्य काही व्रतांमध्ये नैवैद्याच्या संदर्भाने मोदक येतो. "यो मोदकसह्स्रेण यजति। स वाञ्छितफलमवाप्नोति। या मोदकप्रियाला हजार मोदकांचा नैवेद्य दाखवणाऱ्या भक्ताला इष्टफल प्राप्ती होते, असं गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. दुर्गा भागवतांच्या एका लेखात विष्णुपुराणात नोंदवलेल्या भोजनातल्या पदार्थांचे संदर्भ आहेत. त्यात साखरेचे पायस, शाली नावाच्या उत्तम तांदळाचा भात, लाडू, स्वादिष्ट वडे, घारगे, मांडे यांच्या जोडीला मोदकही आहेत. 
भारतीय पुराणांचे अभ्यासक मोदकाचे विविध अर्थ सांगतात. मोद म्हणजे आनंद देतो तो मोदक. चतुर्हस्त गणेशाच्या पारंपरिक रुपात एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात परशु, तिसऱ्या हातात मोदक असतो; आणि चौथा हात आशीर्वादासाठी उंचावलेला असतो. अभ्यासकांच्या मते हा मधुर मोदक तत्त्वज्ञानाचं प्रतिक आहे. 
पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण भारतात मोदक, कडबू, कानवले, कौळकटे, कुडुमु, पीठा, इलायडा अशा विविध नावांनी पिढ्यांकडून पिढ्यांकडे आलेल्या मोदकाचे पुराणातले उल्लेख त्याचे प्राचिनत्व दाखवत असले तरी भारतवर्षात सर्वत्र पुजल्या जाणाऱ्या सगळ्यात प्रिय देवतेला सगळ्यात प्रिय असणाऱ्या नैवेद्याचा नेमका प्रवास हे कोडंच आहे. पण पुराणांतरी देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या कोलेस्टोरल फ्री अवतारासह मोदकांच्या नानाविध रुपांपर्यंत आला आहे. 
*** 

मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ माणसाच्या एकंदर खाद्यसंस्कृतीला गेल्या चार एक हजार वर्षांपासून माहिती आहेत. आफ्रिकेतल्या, दक्षिण अमेरिकेतल्या आदीम रहिवासी, सुदूर पूर्वेकडचे चीन, जपान, इंडोनेशियादी प्रदेशांपासून युरोपातल्या पुढारलेल्या अभिजनांच्या खाद्यसंस्कृतीपर्यंत सगळीकडे या "डम्पलिंग्ज्‌'चा वावर आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज जगाच्या विविध भागातली ही डम्पलिंग्ज्‌ अवघ्या खाद्यब्रह्माला भुरळ घालताहेत. 
व्याख्याबिख्यांची आडवळणं अगदी घ्यायचीच म्हटली तर त्या त्या भौगोलिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या तांदूळ, गहू, ओटस्‌, मका, सोयाबीन, बार्ली, ज्वारी अशा धान्यांच्या पिठांच्या किंवा ब्रेडच्या किंवा बटाट्याच्या आवरणात भाज्या, फळं, कडधान्य, सुकामेवा, मांस, मासे अशा असंख्य पदार्थांचं सारण भरून उकडलेले, वाफावलेले, तळलेले, भाजलेले मोदक म्हणा, मोमोज्‌ म्हणा, करंज्या म्हणा, कचोरी म्हणा किंवा "सम्बुसा' अशा नावानी मध्य आशियात उगम पावून आता अक्षरशः जगभर पसरलेले सामोसे म्हणा म्हणजे "डम्पलिंग्ज्‌'. गोलाकार, लांबट, ठेंगणे-ठुसके, टोकदार नाकाचे, चंद्रकोरीच्या आकाराचे, त्रिकोणी, चौकोनी. तुपाच्या धारेबरोबर, वेगवेगळे सॉसेस, चटण्या-लोणच्यां बरोबर, सूपांमध्ये डुबवून किंवा नुसतेच खायचे. (वाचतावाचता मिळालेली आणि आत्ता सामोश्‍यांवरून सहज आठवलेली नोंद म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या सामोशाची. गिनिज बुकातल्या एका नोंदीप्रमाणे लंडनमधल्या बल्लवांनी बनवलेला हा सामोसा साडेतीनशेपेक्षा जास्त पौंडाचा होता. आपल्याकडेही दर गणेशात्सवात हौशी मंडळींनी पाच-पन्नास किलो वजनाचा मोदक करून तो नैवेद्य "श्रीं'ना अर्पण केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात.) 
"मोमो' मी पहिल्यांदा पाहिले ते मिझोरामची राजधानी ऐझॉलमध्ये. संपादकांच्या एका परिषदेच्यानिमित्तानी तिथे जाणं झालं होतं. सर्वशिक्षा अभियानाचा भाग म्हणून तिथल्या सरकारनी चालवलेल्या एका शाळेत आम्ही गेलो होतो. त्या शाळेच्या दारात एका छोट्या स्टोवर एक पसरट भांडं ठेवून मोमोज्‌ विकणारी ती मुलगी बसली होती. त्या "उकडलेल्या करंज्या' खाण्याचा काही धीर झाला नाही, पण तिच्या भोवती उभं राहून कसल्याशा पानावर घेऊन, आरडाओरडा करत मोमोज्‌ खाणाऱ्या मुलांकडे पाहता त्या मोमोज्‌ची लोकप्रियता लक्षात येत होती. मोमोज खरं तर मूळचे तिबेटमधले. पण "चिंडीयन' पदार्थांसारखे आपल्यापुरतं आपण त्यांचं भारतीयीकरण करून टाकलं आहे. हा तसा मूळचा मांसाहारी पदार्थ. पण आता पनीर, चीझ आणि भाज्या वापरून बनवलेल्या मोमोज्‌च्या शाकाहारी व्हर्जन्स्‌वरहीही खाद्यप्रेमींनी पसंतीची मोहोर उठवली आहे. उकळत्या पाण्यावर वाफेवर मोमोज्‌ उकडताना त्याचा अर्क पाण्यात उतरतो. अनेक ठिकाणी ते पाणी भाज्या वगैरे घालून सूप म्हणूनही सर्व्ह करतात. 
*** 

भारतीय पुराणांमध्ये साक्षात देवांनी अमृतापासून बनवलेला पदार्थ म्हणून येणारा मोदक चिनी इतिहासात मात्र भलत्याच संदर्भानी येतो. चिनी डम्पलिंग्ज्‌च्या नोंदी इसवीसन पूर्व सव्वादोनशे वर्षांपर्यंत मागे जातात. त्याकाळातल्या हूग लिआंग नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याला विष भरलेलं डम्पलिंग खायला घातलं होतं, अशी एक कथा सापडते. जिऍओझी हा चीनधला सर्वात लोकप्रिय मोदकप्रकार. आपल्याकडे जसे थंडीच्या दिवसांत धुंदुरमासात किंवा भोगीच्या जेवणात स्निग्ध पदार्थ आवर्जून खाल्ले जातात, तसे चीनमध्ये विंटर सॉल्स्टिसच्या दिवशी (21 किंवा 22 डिसेंबरला) आणि नववर्षदिनाच्या आधीच्या संध्याकाळी जिऍओझी हवेतच हवेत. 
आपल्या मोदकांसारखेच जगाच्या अनेक भागांमध्ये डम्पलिंग तिथल्या तिथल्या संस्कृतीचा भाग आहेत. मक्‍याच्या पिठाचे आफ्रिकेतले फूफू, बन्कू, केन्के, तिह्लो, मेल्क्को; चीन मधले गौटी, वान्टान किंवा "चिंडीयन' फूडमधले खवैय्येप्रिय स्प्रिंग रोल्स; चीनमधून इंडोनेशियात गेलेले सिओम; जपानी डॅंगो, निकुमान करंज्यांसारखे ग्योझा; शंकरपाळ्यासारखे दिसणारे इटालियन रॅव्हिओली; अमेरिकेतले टॉर्टिला किंवा चिकन, टर्की, स्ट्रॉबेरी, ऍपल, हॅम किंवा बटरबीन डम्पलिंग्ज्‌; अफगाणीस्तान, कझागीस्तान, उझबेकीस्तानातले मंटी किंवा मंटू; योमारी पुन्हीच्या, पौर्णिमेच्या, दिवशी नेपाळमध्ये होणारे योमारी; ब्रिटन मधले नॉरफोक, कॉस्टवोल्ड डम्पलिंग, रशियन पेलेमनी, ब्राझीलमधले बोलिंहा डी कार्न; चिली, जमैका, पेरू. मोदकांच्याच कुळातली ही डम्पलिंग्ज्‌ जगभरातल्या खाद्यप्रेमींच्या प्राधान्य यादीत असतात. 
ंचा आस्वाद तब्ब्येतीत घ्यावा असं आपण म्हणतो, तसंच जॉर्जियन सिन्कालीचंही आहे. सिंन्काली खाण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. मुख्य म्हणजे सिन्काली खाताना काटाचमच्यांचा वापर करणे शिष्टसंमत नाही. दिसण्यात अगदी आपल्या मोदकांची बहीण शोभेल अशा सिन्कालीचं नाक खात नाहीत. नाकाला धरून सिन्काली उचलायची पण नाक मोडून बशीत ठेवायचं. खाल्लेल्या सिन्कालींचा हिशेब मग या मोडून ठेवलेल्या नाकांवरून लावला जातो. 
*** 

जव्हार भागातल्या एका आदिवासी पाड्यावर मोदकाशी जवळीक सांगणारा एक पदार्थ खाल्ल्याचं आठवतं. एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला त्याच्या संस्थेने आर्थिक मदत दिलेल्या प्रकल्पांच्या कामाची पहाणी करायची होती. त्याच्याबरोबर मीही हिंडत होतो. एका रात्री पाड्यावर मुक्कामाला असताना पाहुण्यांसाठी म्हणून खास हा पदार्थ बनवला होता. घरधनी त्याला काहीतरी म्हणत होता, आता आठवत नाही. पण तांदळाच्या पिठीच्या गोळ्यात गुळाचे खडे घालून केलेले ते "मोदक' खाताना मधेच लागणारी गुळाची चव अजून जिभेवर आहे. 
*** 

जर्मनातल्या वायमार जवळचं हायशीलहॅम गाव डम्पलिंगप्रेमींची पंढरी आहे. इथंलं थुरिंगयान डम्पलिंग वर्ल्ड हे जगातलं बटाट्यांच्या डम्पलिंगचं एकमेव म्युझियम आहे. बटाटे गोळा करण्यापासून, ते बटाटे किसून त्याची डम्पलिंग करण्याच्या यंत्रसामुग्रीपासून त्या सगळ्या प्रक्रीयेपर्यंत अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव या संग्रहालयात घेता येतो. आणि संग्रहालयाचे वेगळेपण म्हणजे इथे असलेल्या काही वस्तू चाखताही येतात. पर्यटकांना एका अवाढव्य डम्पलिंगमधून फेरफटका मारता येतो, मुलांसाठी डम्पलिंग क्रॉल्स बॉक्‍सेस आणि डम्पलिंग पिरॅमिडस्‌ आहेत. इथे डम्पलिंगवर चर्चासत्र होतात. कदाचित मोठ्या आकाराच्या डम्पलिंगसाठी छोट्या आकाराचे बटाटे वापरावेत की नाही, असे विषय असतीलही या चर्चासत्रांत; पण तुम्हाला हौस असेल तर एखादी डम्पलिंग रेसिपी घेऊन इथे तुम्हाला तुमचं पाककौशल्यही आजमावता येऊ शकतं. (पर्यटकांनी बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रेमळ आग्रह संचालकांना करू नये. केल्यास आधी नम्रपणे नकार मिळेल. त्यानंतरही आग्रह कायम राहील्यास अपमान होऊ शकतो, असा सल्लावजा धमकी देणारी खास पुणेरी लडीवाळ (!) भाषेतली पाटी इथे आहे की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.) स्वतः काही बनवण्याचा आणि खाण्याचा उत्साह (पक्षीः धमक) नसेल तर अगदी पारंपरिक बटाटा डम्पलिंगपासून त्याच्या आधुनिक अवतारांवर तावही मारण्याची सोयही इथे आहे. 
चीनमध्येही जिऍक्‍झिन राईस डम्पलिंग म्युझियम आहे. जिऍक्‍झिन प्रांतात प्रसिद्ध असणाऱ्या ड्रॅगन बोट उत्सवाच्या निमित्ताने बनणाऱ्या राईस डम्पलिंगची सुरवात कशी झाली आणि तिथून ती संपूर्ण चीनमध्ये कशी पसरली ही या म्युझियमची मूळ कल्पना. इथेही पर्यटकांना त्यांचे पाककौशल्य आजमावण्याची, किंवा उत्तम राईस डम्पलिंगचा आस्वाद घेण्याची संधी असते. 
चीनमधल्या हान राजवटीपासूनचा डम्पलिंगचा इतिहास मांडणारं आणखी एक डम्पलिंग म्युझियम लिऑनिंग प्रांतातल्या डीलीयन येथे सुरू झाल्याची एक बातमी मध्यंतरी पहाण्यात आली होती. 
गणेशोत्सवाच्या अलिकडे मोदक करण्याचे वर्ग घेणं आता नवीन नाही; पण आपल्या परंपरेतल्या मोदककुळातल्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांना जगातल्या त्यांच्या आते-मामे-चुलत भावंडांशी जोडून एखादं टुरिस्ट आकर्षण निर्माण करणं हा कदाचित उद्याचा यशस्वी स्टार्टअप असू शकेल. 
*** 

मला विचाराल तर मोदक म्हणजे उकडीचाच. कणकेचे तळलेले मोदकही खायला चांगले लागतात; विशेषतः त्यातलं साखर आणि सुक्‍या खोबऱ्याचं सारण जमलं असेल तर. पण "पक्वान्न' या शब्दातला रूबाब कणकेच्या मोदकांजवळ नाही. आणि हा उकडीचा मोदक खाणं हा पण एक सोहळा असतो. म्हणजे उचलला मोदक आणि टाकला तोंडात, असं करण्यात हशील नाही. मोदक गंध-स्वादादी पंचेन्द्रियांनी खावा. मोदकपात्रातल्या हिरव्या केळीच्या पानावरून गरम वाफाळता मोदक ताटात यावा. पांढराशुभ्र. पारी अशी पातळ असावी की आतल्या गूळ आणि ओल्या खोबऱ्याच्या सारणाचा तांबूसपणा जाणवून नजर तृप्त व्हावी. मग मोदकाचं टोकदार नाक अलगद मोडून त्यावर गरम तुपाची धार धरावी आणि मग आख्ख्या मोदकाचा एकच घास करावा.... आणि तृप्तीचा तो क्षण जपून ठेवावा... 
गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत केलेल्या प्रार्थनेप्रमाणे मोदकाख्यान मांडण्याच्या या अगदी छोट्याशा प्रयत्नांती सर्व सु-रस यात्राप्रेमींसाठी एकच सदिच्छा.... वाञ्छितफलमवाप्नोति। 

(प्रथम प्रसिद्धीः सकाळ सप्तरंग, 27 ऑगस्ट 2017)

Sunday, August 12, 2018

पुस्तक पुस्तकः बहुआयामी प्रवासाची 'सत्या'वचनी गोष्ट

"एफ फाइव्ह". कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाणारी की.
गेली चार दशकं संगणकाच्या क्षेत्रात आपला दबदबा राखणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचं पहिलंच पुस्तक "हिट रिफ्रेश' मराठी वाचकांच्या दृष्टीनं "एफ फाइव्ह'ची एक सुखद अनुभूती आहे. "हिट रिफ्रेश : द क्वेस्ट टू रीडिस्कव्हर मायक्रोसॉफ्टज्‌ सोल ऍन्ड इमॅजिन अ बेटर फ्युचर फॉर एव्हरीवन' या नाडेला यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. मायक्रोसॉफ्टच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासातले नाडेला हे केवळ तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. चार वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बिल गेट्‌स आणि स्टीव्ह बामर या पूर्वसुरींच्या मध्ये उभ्या असलेल्या नाडेला यांच्या छायाचित्रानं भारतीयांची मान जशी उंचावली होती, तसंच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काही करू पाहणाऱ्या भारतीय तरुणांना नवी क्षितिजंही खुणावू लागली होती. ही डिजिटल पिढी आणि या पिढीचं तंत्रज्ञानाधिष्ठीत भविष्य यांचा वेध घेणारी ही विविधांगी कथा वाचकांना निश्‍चितच भावेल.

"हिट रिफ्रेश' ही नाडेला यांची आत्मकथा आहे; मायक्रोसॉफ्टचा जीवनपट आहेच आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भविष्यातला नवनिर्मितीचा वेधही आहे. नेतृत्व आणि परिवर्तन हे दोन मुद्दे अधोरेखित करताना नाडेला वाचकासमोर मायक्रोसॉफ्टमधल्या तीन पिढ्यांचा प्रवास वाचकासमोर ठेवतात. नाडेला यांच्या पुस्तकाचा उदय जोग यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

गोष्टीला सुरवात होते हैदराबादमधून. हैदराबादपासून ते रेडमंडपर्यंतचा आपला प्रवास नाडेला उलगडत नेतात. जग बदलणं हेच आपलं ध्येय आहे अशी श्रद्धा असणाऱ्या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा होती म्हणून आपण - जगाच्या दृष्टीनं आता यशाची जितीजागती दंतकथा असणाऱ्या- मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झालो, असं ते पहिल्यांदाच सांगून टाकतात. ही कथा परिवर्तनाची तर आहेच आणि त्याहीबरोबर या परिवर्तनाला चालना देणाऱ्या सहसंवेदनेच्या जाणिवेची आणि इतरांना सक्षम करण्याच्या आकांक्षेचीही आहे.

सहसंवेदनाच्या जाणिवेबद्दल मायक्रोसॉफ्टच्या दृष्टिकोनाबद्दल सांगताना नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होतानाच्या त्यांच्या स्वत:च्याच मुलाखतीबद्दल सांगून ते लिहितात : "अतिशय व्यक्तिगत पातळीवर लवकरच मला ती सहसंवेदना शिकावी लागणार आहे, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.'

हैदराबादकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या बारावीतल्या सत्याला हैदराबादमधून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगत संकुचित दृष्टिकोन सोडायला लावणारे भारतीय प्रशासकीय सेवेत असणारे वडील आणि हव्या त्या गोष्टी हव्या त्याच वेगानं करण्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या शिक्षिका आईचं आयुष्याबद्दलचं तत्त्वज्ञान या एका बाजूनं परस्परविरोधी वाटणाऱ्या विचारांचे आपल्यावर झालेले परिणाम, आयआयटीच्या प्रवेश परीक्षेतल्या अपयशानंतरचा विद्युत अभियांत्रिकीचा अभ्यास, पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण, शिक्षणादरम्यान जॉन व्हॉन न्यूमन आणि ऍलन ट्युरिंग या गणित आणि संगणकशास्त्रज्ञांची आणि क्वांटम संगणनाची मोहिनी, वडिलांच्या प्रशासकीय सेवेतल्या मित्राच्या मुलीशी, अनुपमा -अनुशी, विवाहाचा निर्णय, व्हिसासंबंधीच्या अमेरिकी नियमांच्या जंजाळातून पत्नीला आपल्याबरोबर अमेरिकेत येता यावं यासाठी घेतलेलं ग्रीन कार्ड परत करण्याचा निर्णय, व्यवसायाच्या आणि नेतृत्वाच्या काही तत्त्वांचा नाडेला यांनी क्रिकेटशी जोडलेला संबंध, मायक्रोसॉफ्टच्या "विंडोज 10'चं अनावरण ऑस्ट्रेलियाऐवजी केनियात करणं आणि मायक्रोसॉफ्टनं पुन:पुन्हा घेतलेला आत्मशोध या सगळ्यासह नजीकच्या भविष्यात जगाला कवेत घेणारं कृत्रिम बुद्धिमत्तेसारखं तंत्रज्ञान आणि त्याच्या नैतिक चौकटी यांच्याविषयीही नाडेला वाचकाशी संवाद साधतात. येत्या पिढ्यांना सहसंवेदना, शिक्षण, सर्जनशीलता स्वीकारावी लागणार आहे, असं सांगताना येणाऱ्या या युगाचा अर्थ पूर्णपणे जाणून घेण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या घटकांचं विश्‍लेषण होण्याची गरजही ते अधोरेखित करतात.

येऊ घातलेल्या तंत्रयुगाच्या लाटेसंबंधी नाडेला आपलं मत वाचकांसमोर ठेवतातच; पण त्या लाटेचा समाजावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतात. माणसं आणि यंत्रांच्या भवितव्याबद्दल संदर्भात नाडेला म्हणतात : "स्थित्यंतराचा प्रत्येक टप्पा अवघड समस्या उभी करतो; पण योग्य मूल्यं आणि संरचना तत्त्वं आणि मानव म्हणून आपल्याला आवश्‍यक असलेली कौशल्यं यांच्या साह्यानं परिवर्तन घडवून आणतानाही माणसाची आणि समाजाची भरभराट शक्‍य आहे.' शेवटच्या प्रकरणात ते भावी काळात अपेक्षित असणाऱ्या आर्थिक विकासासाठी -शिक्षण अधिक नावीन्य गुणिले तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर बरोबर आर्थिक विकास असं एक समीकरणही मांडतात. "हिट रिफ्रेश'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात नाडेला मायक्रोसॉफ्टमधील आपल्या प्रवासात घडलेल्या काही अनर्थांबद्दलही मोकळेपणानं बोलतात.

या पुस्तकाला बिल गेट्‌स यांची प्रस्तावना आहे. भविष्याविषयी आपण सर्वांनी आशावादी असायला हवे, हे सांगताना गेट्‌स यांनी पुस्तकाचा एक महत्त्वाचा पैलू उलगडून दाखवला आहे. ते म्हणतात : "तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्याचा आणि त्याच वेळी काही कठीण प्रश्‍नांना सामोरं जाण्याचा मार्गच सत्यानं आखून दिला आहे.'

नाडेला यांचेच शब्द उधृत करायचे, तर "हिट रिफ्रेश' मुख्यत्वे माणसांबद्दल आणि सहसंवेदना या आपल्यामधल्या एकमेवाद्वितीय गुणाबद्दल आहे. सद्यस्थितीला न भूतो.. असा धक्का देणारी तंत्रज्ञानाची लाट येत असताना तर माणसाला हा गुण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तंत्रज्ञानानं एका बाजूला निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरं जात असताना आपल्याला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे ती परिस्थिती आणि भविष्यातल्या या वाटचालीत आवश्‍यक त्या सर्व क्षणी "एफ फाइव्ह' दाबून रिफ्रेश होण्याची गरज समजावून घेण्यासाठी नाडेला यांचं हे पुस्तक निश्‍चितच मदत करेल.

पुस्तकाचं नाव : हिट रिफ्रेश : मायक्रोसॉफ्टचा हरवलेला आत्मा आणि मनुष्यमात्राच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न यांची एक शोधयात्रा
लेखक : सत्या नाडेला. मराठी अनुवाद : उदय जोग
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स (मूळ इंग्लिश). वेस्टलॅंड पब्लिकेशन्स आणि यात्रा बुक्‍स (मराठी अनुवाद)
पृष्ठं : 208, मूल्य : 350 रुपये
(प्रथम प्रसिद्धी -सकाळ -सप्तरंग, ऑगस्ट 12, 2018)

Wednesday, August 8, 2018

ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्सः वाघ मोजतात त्याची गोष्ट

कथाओं से भरे इस देश में 
मैं भी एक कथा हू 
एक कथा है बाघ भी 
इसलिए कई बार 
जब उसे छिपने को नहीं मिलती 
कोई ठीक-ठाक जगह 
तो वह धीरे से उठता है 
और जाकर बैठ जाता है 
किसी कथा की ओट में

वाघ म्हटल्यावर डोळ्यासमोर खूप गोष्टी येतात. तशी ही कविताही आठवते. हे खरंतर एक दीर्घकाव्य आहे. ‘बाघ’ नावाचं. हिंदीतले नामवंत कवी केदारनाथ सिंह यांनी वाघाचं आणि माणसाचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं नातं अशा छोट्या छोट्या रचनांमध्ये मांडलंय. वाघ तसा आपल्या आजूबाजूला असतोच - मिथकांमधून, गोष्टींमधून, प्रतिकांमधून. पण या सगळ्याच्या पलीकडं जाऊन वाघ ही एक अनुभवण्याची चीज आहे. 
राजबिंडं सौंदर्य, सौष्ठव, डौल, धाडस, ताकद या शब्दांना जितक्‍या भाषांमध्ये जितके म्हणून समानार्थी शब्द आहेत, त्या सगळ्यांचे सगळे अर्थ ‘वाघ’ या एकाच कल्पनेत सामावलेले दिसतात. एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा अरण्यात मुक्त संचार करणारा वाघ ज्यांनी ‘...याची डोळा’ पाहिला आहे, त्यांना समजेल मी काय म्हणतो आहे ते. 
पहिल्यांदा वाघ, अॅक्‍च्युली वाघीण, पाहिली ताडोबाच्या जंगलात. पंधरा एक वर्षांपूर्वी. ती दृश्‍यभेट अकल्पित होती. वाघ.. वाघ... करत मचाणावर बसून झाल्यावर, सगळ्या आशा सोडून दिलेल्या असताना झालेली! एका कुठल्यातरी छोट्या जंगलवाटेवरनं कॅम्पसाईटच्या रस्त्याला वळताना ती थेट समोरच आली. दोन बछड्यांसह आरामात फिरायला निघाल्यासारखी. जीपची घरघर ऐकल्यावर तिनं एक क्षणभर थांबून अंदाज घेतला आणि जीपमधल्या सगळ्या एक्‍साईटमेंटकडं चक्क दुर्लक्ष करून, चार पावलं आणखी चालून ती रस्त्याकडेच्या गवतात शिरली. तिचे दोन्ही बछडे तिच्या पाठोपाठ गवतात गडप झाले. 
काही हात अंतरावरून असं अचानक, आयुष्यात पहिल्यांदा वाघाचं दर्शन झाल्यानंतर जे काही वाटलं ते मला आजवर शब्दांत उतरवता आलेलं नाही. हे ‘पहिलेपण’ आठवताना मला आज्जीच्या गोष्टी आठवतात. पाळण्यातल्या मुलाच्या ओढीनी घरी जाणाऱ्या एका ओल्या बाळंतिणीनी वाघाशी झुंज घेतल्याची एक गोष्ट ती सांगायची. ती गोष्ट आजी जशी सांगायची तशी घडली नसणार हे आता समजतं. पण ती गोष्ट सांगताना आजी नेहमी सांगायची, वाघ नजरबंदी करतो. आजीच्या म्हणण्याचा अर्थ, वाघाचं पहिलं दर्शन शब्दांत मांडता आलं नाही, तेव्हा कळला. 
वाघ झपाटून टाकतो समोर आल्यावर. आणखी एक किस्सा असाच ऐकलेला. ताडोबातलाच. गेले दोन-तीन दिवस एका पाणवठ्यावर वाघ येतो आहे, असं कळल्यानं दहा-बारा कॅम्पर्सनी दुपार उतरता उतरता पाणवठ्यालगतच्या मचाणावर डेरा जमवलेला. यातल्या निम्म्या लोकांची पहिलीच वेळ वाघ पाहण्याची; किंबहुना अशा पद्धतीनं जंगलात वावरण्याचीच. त्यामुळं ते जरा एक्‍साईट झालेले. मचाणापासून समोर थोड्या अंतरावर तो पाणवठा आणि त्याला लगटून जाणारा रस्ता आणखी थोडा पुढं जाऊन, वळून दिसेनासा झालेला. बऱ्याच वेळानी पाणवठ्यापलीकडून चितळाचा आवाज ऐकू आला. या अलार्म कॉलमुळं मचाणावरची अनुभवी मंडळी सतर्क झाली. मचाणावर आणखी थोडी एक्‍साईटमेंट. काही क्षणांची उत्सुकता.. आणि मचाणासमोरचा रस्ता जिथं वळत होता तिथून आत जाणाऱ्या पायवाटेवरून तो आला. त्यानी आणखी दोन पावलं पुढं टाकली. मचाणावर थोडी खपफस. वाघानी मचाणावरचे ते दबके आवाज बहुधा टिपले असावेत. कारण तो थबकला. नाक वर करून त्यानी कसला तरी अदमास घेतला, आणि तो आला तसाच मागं वळला. हे सगळं नाट्य घडायला काही सेकंद लागले. तितका वेळ ते सौंदर्य मचाणावरच्या दहा-बारा दुणे वीस किंवा चोवीस डोळ्यांसमोर होतं, प्रत्येकाच्या हातात कॅमेरा होता; पण एकालाही फोटो घ्यायचं सुचलं नव्हतं. 
तुम्ही वाघाला पाहायच्या आधी वाघानी तुम्हाला किमान पंचवीस वेळा पाहिलेलं असतं, असं म्हणतात. जंगलात वाघ ‘बघायला’ म्हणून जाणाऱ्यांना वाघ दिसतो ही खरं एकतर वाघाची चूक असते किंवा दुर्दैव! जंगलात नेहमी फिरणाऱ्या लोकांकडं चौकशी करून पाहा; अगदी रस्त्याच्या पलीकडं किंवा बाजूला गवतात, बांबूच्या बेटांत बसलेला वाघ दिसता दिसत नसल्याचे अनेक किस्से त्यांच्या अनुभवाच्या पोतडीत असतील. 
आपल्या लोककथांपासून ते ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...’ पर्यंतच्या बालकथांपर्यंत वाघ आहे. वाघ आणि सिंह भारतीय परंपरेतल्या प्राचीन शिल्पकृतीतही आढळतात, पण त्यात वाघाची प्रतिमा सर्वांत प्राचीन आहे, असं दुर्गाबाई भागवतांनी एका ठिकाणी लिहिलं आहे.
भारत हा पृथ्वीतलावरचा एकमेव देश आहे, जिथं वाघ (जीवशास्त्रीय परिभाषेत - पॅंथेरा टायग्रीस) आणि सिंह (पॅंथेरा लिओ) दोघंही आढळतात. पश्‍चिम गुजरातेतल्या गीरच्या भागात सिंहांची वस्ती आहे. आशियायी सिंहांची ती आता जगातली एकमेव वस्ती आहे. पंजाब, राजस्थानच्या वाळवंटाचा काही भाग आणि कच्छ वगळता काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्‍चिम किनाऱ्यापासून पूर्वोत्तर भारतातल्या घनदाट जंगलांपर्यंत भारतात सगळीकडं वाघ आहेत. किंबहुना वाघाचा हा जो सार्वत्रिक आढळ आहे, त्याच्याच जोरावर भारताचा राष्ट्रीय प्राणी ठरवण्याच्या शर्यतीत वाघानं सिंहावर मात केली. वन्यजीव मंडळानं जुलै १९६९ मध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह असावा असं ठरवलं होतं; पण तीन-साडेतीन वर्षांतच सिंहाची जागा वाघानं घेतली. हा निर्णय झाला त्यावेळी व्याघ्रसंरक्षणाचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात होता. 
ऋग्वेदात वाघाचा उल्लेख नाही; पण हरप्पा आणि मोहें-जो-दारो येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या सिंधू संस्कृतीतल्या एका मोहरेवर वाघाचं चित्र आहे. त्यावरून सिंधू नदीकाठच्या लोकांना वाघ माहिती असावा असा निष्कर्ष काढता येतो, असं विश्‍वकोषातल्या नोंदीत म्हटलं आहे. अथर्ववेदात मात्र वाघ आणि सिंह या दोन्ही प्राण्यांचे उल्लेख येत असले तरी वाघाला त्यात प्राधान्य दिलेलं आहे, असं वाचायला मिळतं. लोककथा, धार्मिक कल्पना, मिथकं या सगळ्यांतून वाघ आपल्याशी घट्ट जोडला गेला आहे.  उपलब्ध संशोधनानुसार वाघ मूळचा उत्तर यूरेशियातला. तिथून तो दक्षिणेकडं सरकला. पूर्व तुर्कस्तानापासून ते रशिया, चीन, भारतासह आग्नेय आशियापर्यंत वाघ पसरला. संशोधकांच्या मते, हा विस्तार भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वाघाची सवय अधोरेखित करतो. भारतात वाघाचा प्रवेश (पूर्वीच्या) ब्रह्मदेशातून झाला असावा, असं संशोधक मानतात.
वाघाच्या दिसण्याला राजसस्पर्श देणाऱ्या वाघाच्या कातड्यानीच त्याचा मोठा घात केला, असं म्हणावं लागेल. त्याशिवाय वाघाच्या भोवती गुंफलेल्या पुरुषत्वाच्या कल्पना आहेतच. असंख्य गैरसमज आणि मानवी हव्यासापोटी जगभर औषधांपासून ते दागिन्यांपर्यंत असंख्य गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या वाघाच्या कातडीचा, इतर अवयवांचा अगदी रक्त आणि चरबीचा व्यापार अब्जावधी डॉलरच्या घरात जातो असं सांगणारे अनेक अहवाल आहेत. चार वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी तस्करांच्या एका टोळीकडून अठरा किलो वजनाच्या वाघाच्या कवट्या, हाडं, नखं आणि दात जप्त केले होते. वाघांच्या नऊ उपजातींपैकी बाली वाघ आणि कॅस्पियन वाघांचा माणसानी कधीच निर्वंश केला आहे. व्याघ्रसंवर्धनाचे प्रयोग होत असले तरी भारतीय वाघांसह जावा, सुमात्रा आणि सायबेरियातले वाघ अजूनही वेगवेगळ्या कारणांनी धोक्‍यात आहेत. 
असा वाघ आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली व्याघ्रगणनेची एक छोटी बातमी. दर चार वर्षांनी होणारी ही व्याघ्रगणना यावर्षी होते आहे. त्या गणनेचा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वीच संपला. जंगलातल्या वाघांची ही मोजणी वन्यजीव व्यवस्थापनात अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. वाघ हा जीवशास्त्रीय उतरंडीच्या सर्वांत वरच्या टोकावर आहे असं मानलं जातं. एखाद्या जंगलात वाघ आहे, याचा अर्थ ते जंगल सर्वार्थानी परिपूर्ण आहे. निसर्गाच्या साखळीतला कोणताही प्राणी पृथ्वीच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होणं, त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास आक्रसत जाणं हे विनाशाच्या दिशेनं पडलेलं आणखी एक पाऊल असतं, हे मनुष्यप्राण्यांपैकी निदान काही जणांना उमगलं आहे. वाघ समजावून घ्यायचा असेल, तर हरणं समजावून घ्यावी लागतील, असं टायगर बॉयलॉजिस्ट मेल सनक्विस्ट यांनी म्हटलं आहे. हरणं समजावून घ्यायची याचा अर्थ झाडं, माती, गवत आणि भूप्रदेशाचा अभ्यास. वाघाचा सगळ्याच पर्यावरणाशी असा थेट संबंध आहे.
यंदाची व्याघ्रगणना जराशी वेगळी आहे. एकतर पहिल्यांदा भारत, नेपाळ आणि बांगलादेशात मिळून एकत्रितपणे ही गणना होते आहे. यावर्षी वाघ मोजण्यासाठी आणखी आधुनिक, अँड्रॉईड-बेस्ड तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे, शिवाय नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अॅथॉरिटीनी (एनटीसीए) व्याघ्रगणनेच्या एकूण प्रक्रियांमध्ये आणखी सुसूत्रता आणली आहे. 
वन्यजीव रक्षणासाठी आपल्याकडं होत असलेल्या प्रयत्नांचा इतिहास सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीपर्यंत मागं जातो. हरणांना संरक्षण देणाऱ्या बिश्‍नोईंसारख्या अनेक जनसमूहांनी देवरायांसारख्या कल्पनांमधून वनं आणि वन्यप्राणी जपले. आधुनिक माणसाच्या हव्यासानी, विकासाच्या कल्पनांनी मात्र या सगळ्या परंपरांवर मात केली. अजूनही पुरेसे नसले तरी हे चाक होता होईल तो उलटं फिरवण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत. इंदिरा गांधींसारख्या निसर्गप्रेमी पंतप्रधानांनी सत्तरीच्या दशकात निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भात दाखवलेली दूरदृष्टी आणि कणखरपणाची पुण्याई आज आपल्या मदतीला येते आहे. 
पर्यावरण रक्षणाचे हे प्रयत्न योग्य दिशेनं जाताहेत की नाही हे तपासण्याचा एक मापदंड म्हणजे ही प्राणीगणना. वन्यजीव व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा टप्पा. 
इंग्रज भारतातून चालते झाले, तेव्हा इथं लाखभर वाघ होते. माणसाच्या प्रगतीचे नवे आलेख मांडणाऱ्या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला ही संख्या सहा वरून चार आकड्यात आली. या आधीच्या व्याघ्रगणनेनुसार भारतात फक्त सव्वाबाविसशे वाघ शिल्लक होते. या संख्येच्या अचूकतेबद्दल शंका असल्या तरी ही संख्या जगभरातल्या वाघांच्या एकूण संख्येच्या निम्मी आहे, याची नोंद घ्यायला हवी. आजमितीला जगातल्या तेरा देशांमध्ये वाघ आहेत. कधीकाळी ही संख्या पस्तीस होती.
वन्यजीवतज्ज्ञ जॉर्ज शेल्लर यांनी पन्नास वर्षांपूर्वी भारतातल्या वाघांचा पहिला पद्धतशीर अभ्यास केला. या अभ्यासाकरता शेल्लर यांनी ‘बांधलेले’ लपणगृह - शेल्लरज्‌ हाईड - आजही मध्यप्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात पाहायला मिळते. शेल्लर यांचा एक किस्सा ऐकायला मिळतो. एका रात्री लपणगृहात मुक्कामाला गेल्यावर शेल्लर यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या स्थानिक सहायकाला परत जायला सांगितलं. अंधारातून परत गावात जायला तो कांकू करत होता. शेल्लर यांनी त्याच्या भीतीचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, की आपण येत असताना वाघानी आपल्याला पाहिलं आहे. येताना आपण दोघं होतो, जाताना मी एकटाच आहे, हे वाघाच्या लक्षात आलं तर माझी काही खैर नाही. त्यावर शेल्लर त्याला म्हणाले, ‘तू बिनघोरपणे स्वतःशीच काहीतरी बडबड करत परत जा; वाघाला वजाबाकी येत नाही.’ 
गेल्या चाळीस वर्षांमध्ये वन्यजीव गणनेतही खूप बदल झाले आहेत. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसारखी घरोघर जाऊन वन्यप्राणीगणना करता येत नाही. मग एका विशिष्ट दिवशी पूर्ण चोवीस तास पाणवठ्यावर थांबून तिथं येणारे प्राणी प्रत्यक्ष मोजणं, त्यांच्या नोंदी करणं, विशिष्ट भूभागात प्राणी मोजण्याचा प्रयत्न करणं, पावलांचे ठसे घेऊन त्याद्वारे प्राण्याच्या एकूण संख्येचा अंदाज बांधणं आणि आता गेल्या काही दशकांपासून कॅमेरा ट्रॅप, जीआयएस, ड्रोन, लाँगरेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी (लोरा) सारखे तंत्रज्ञानही वन्यजीव गणनेसाठी वापरलं जातं. पावलांचे ठसे, आवाज, विष्ठेचे, केसांचे नमुने यांवरून प्राण्यांबद्दल काही अंदाज बांधता येत असले तरी ते अपुरे आहेत. या पद्धतीतल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी व्याघ्रतज्ज्ञ उल्लास कारंत यांनी १९८० पासून कॅमेरा ट्रॅपच्या वापरावर भर दिला. 
यंदाच्या व्याघ्रगणनेसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी मॉनिटरिंग सिस्टिम फॉर टायगर-इंटेन्सिव्ह प्रोटेक्‍शन अॅण्ड इकॉलॉजिकल स्टेटस (एम-स्ट्रर्लपेस) हे अॅप बनवलं आहे. वाघांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा, त्यांचं भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या, त्यांचे अधिवास, मानवी हस्तक्षेपाच्या खाणाखुणा या अॅपच्या सहाय्यानं नोंदवल्या जातील. अॅपमध्ये आधीच असलेल्या माहितीच्या आधारे नव्यानं नोंदवलेल्या माहितीचे बिनचूक विश्‍लेषण शक्‍य आहे, असं वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 
गेल्या चार वर्षातले व्याघ्रसंवर्धनाचे प्रयत्न लक्षात घेता आता भारतातली वाघांची संख्या तीन हजारांवर पोचली असेल, असा वनअधिकाऱ्यांचा अंदाज आहे. चार वर्षांपूर्वी ती २२२६ होती आणि २०१० मध्ये ती १७०६ होती. अर्थात जानेवारी २०१८ च्या व्याघ्रगणनेचे तपशील हातात येण्यासाठी पूर्ण एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 
भारतात सध्या एक्केचाळीस व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. वाघांची संख्या वाढली असली तरी काही आव्हानं अजून शिल्लक आहेतच. वाघांचे अधिवास वाढलेले नाहीत. रस्ते, धरणं अन्य विकास प्रकल्पांमध्ये अडकलेल्या वाघांच्या जागांचे व्यवस्थापन, दोन अधिवासांना जोडणारे नैसर्गिक मार्ग, जंगलांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांच्या गरजा, त्यांचे आणि निसर्गाचे सहचर्य, त्यांचं जगणं, अजूनही न थांबलेल्या शिकारी, माणूस आणि वन्यप्राण्यांमधल्या वाढता संघर्ष अशा अनेक मुद्‌द्‌यांवर उत्तरं शोधावी लागणार आहेत. 
आज माणूस वाघापासून इतका दुरावला आहे, की वाघाचं नैसर्गिक अस्तित्व पुन्हा अधोरेखित करावं लागणार आहे. वाघ मिथकांमध्ये जितका आदिम आहे तितकाच समकालीनही आहे; त्याच्या असण्यावर आपलं असणं अवलंबून आहे, हे पुन्हा नव्यानं समजावून घ्यावं लागणार आहे. 
टायगर जिंदा है... इतकंच पुरेसं नाही; तो वाढायलाही हवा. 
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक फेब्रुवारी 2018)

Tuesday, August 7, 2018

ट्रॅक्स अॅन्ड साईन्सः पंख चिमुकले, पुन्हा रोपले

मोनार्क नावाचं एक फुलपाखरू असतं. तसं पाहिलं तर इवलासा जीव. लांबी सगळी मिळून साडेतीन-चार इंच. ही लांबी पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराची आणि आयुष्य फार फार तर सहा आठवड्यांचं. झळाळते रंग आणि हवेत तरंगल्यासारखं त्याचं जादूई उडणं ही या जिवाची वैशिष्ट्ये. मुख्यतः आढळ दक्षिण कॅनडापासून ते दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडच्या भागात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स, उत्तर आफ्रिकेसह जगाच्या अन्य भागांतही मोनार्क सापडतात. इंग्लंडच्या तिसऱ्या विल्यमच्या नावावरून या फुलपाखरांना ‘मोनार्क’ किंवा सम्राट असं नाव मिळालं असे काही संशोधकांचं म्हणणं असलं तरी खुद्द ब्रिटनमध्ये यांचा वावर क्वचितच.
अमेरिकेतल्या अलाबामा, ईडाहो, इलिनॉस, मिनेसोटा, टेक्‍सास, व्हरमॉन्ट आणि वेस्ट व्हर्जिनिया या सात राज्यांनी मोनार्कला आपल्या राज्याचं प्रतीक असण्याचा मान दिलाय. (आपल्या महाराष्ट्रानेही पंखावर झळाळती निळाई मिरवणाऱ्या ब्ल्यू मॉर्मन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे.)  
खरंतर मोनार्कला आख्ख्या अमेरिकेचाच राष्ट्रीय कीटक म्हणून जाहीर करावं अशी मागणी एकदा नव्हे दोनदा झाली. न्यूयॉर्क टाइम्स वगैरे दबदबा असणाऱ्या वर्तमानपत्रातून वाचकांच्या पत्रव्यवहारात मोनार्कच अमेरिकेचा राष्ट्रीय कीटक कसा असू शकतो यावर चर्चाही झाली. पण दोन्ही वेळा मोनार्क अयशस्वी ठरलं.
मोनार्कांचे आणखी एक विशेष म्हणजे यांच्यातली बरीचशी फुलपाखरं स्थलांतर करतात. कीटकांमधलं स्थलांतर हा काही तितकासा अचंब्याचा विषय नाही, पण मोनार्क मात्र काहीच्या काही अंतरं पार करतात. अमेरिकेच्या पूर्व भागातून मोनार्कच्या काही थव्यांनी जवळजवळ पावणेआठ हजार किलोमीटरचं अंतर कापून मेक्‍सिकोपर्यंतचा पल्ला मारल्याच्या नोंदी आढळतात.
या मोनार्क पुराणाचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात अशाच एका पिल्लू मोनार्कनी इंग्लंड-अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांत, न्यूज साईटस्‌वर, वन्यजीवांना वाहिलेल्या पोर्टल्सवर हेडलाइन स्टेटस मिळवलं होतं. हे पिल्लू मोनार्क होतं तीन दिवसांचं. म्हणजे साठीच्या वयातल्या माणसाशी तुलना केली तर साधारण साडेचार वर्षांच्या माणसाच्या पिल्लाइतकं. त्याचा जन्म झाला रोमी मॅकक्‍लॉस्की या तरुण मुलीच्या टेक्‍सासमधल्या घराच्या बागेत. काही विशिष्ट झाडांची लागवड करून फुलपाखरांना आकर्षित करणारी बटरफ्लाय गार्डन तयार करणं हा अनेक अमेरिकी घरमालकांमधला एक वाढता ट्रेंड आहे. रोमीच्या बागेतही गेली तीन वर्षे सुरवंटांचं वास्तव्य आहे. खा खा खाऊन हे सुरवंट कोषांत जातात आणि मग एक दिवस त्या कोषांची नाजूकशी, झळाळती फुलपाखरं होतात. माणसाच्या तुलनेत एक अल्पायुषी आयुष्य नव्यानी सुरू होतं.
तर गेल्या महिन्यात रोमीच्या बागेतल्या एका कोषातून हे पिल्लू मोनार्क उगवलं. पण कोषातून बाहेर येतानाचा त्याचा प्रवास जरा जास्तच जिकिरीचा होता. सुरवंटाचा काय किंवा माणसाचा काय, आपापल्या कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास तसाही सोपा नसतोच; पण आपल्या या मोनार्क पिल्लाचा प्रवास जिवावरच बेतणारा होता. कोषातून बाहेर पडताना अजून ओल्या असणाऱ्या त्याच्या पंखांपैकी एक पंख पुरता तुटून गेला होता. फुलपाखरांना मन असतं की नाही ठाऊक नाही-ऐकण्यावाचण्यात नाही असं काही कधी-पण असेल तर या मोनार्क पिल्लाला खूप दुःख झालं असणार. कारण उडण्याकरिता फुलपाखरांना दोन सारखेच बांधेसूद आणि प्रमाणबद्ध पंख असावे लागतात, आणि फाटका पंख म्हणजे उडणं नाहीच; आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा तर निसर्गाचा नियमच.
पण या मोनार्क बाळाच्या इवल्याशा भाळावर सटवाईनी लिहिलेला लेख काही वेगळाच होता.
तर रोमी मॅकक्‍लॉस्की. रोमी कॉस्च्युम डिझायनर आहे आणि हॅण्ड एम्‌रॉयडरीमध्ये म्हणजे हातानी कशिदे विणण्यात (निदान तिच्या आजूबाजूला) कोणी तिचा हात धरू शकत नाही, अशी तिची ख्याती आहे. रोमीचं आणि फुलपाखरांचं नातं जरा हळवं आहे. बोअर्ड पांडा नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटनी जेव्हा रोमीची मुलाखत घेतली तेव्हा हे नातं उलगडलं. तिच्या आईचं वीसएक वर्षांपूर्वी निधन झालं. मुलीला कायमचं सोडून जाताना आई म्हणाली होती, रोमी जेव्हा जेव्हा तू फुलपाखरू पाहशील, तेव्हा असं समज की, मीच तुला भेटायला आले आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
रोमीला एक दिवस तिच्या बागेत एका झुडपावर तीन सुरवंटं दिसली; आणि तिचं बटरफ्लाय गार्डनिंग सुरू झालं.
पंख फाटलेलं मोनार्क बाळ सापडल्यावर रोमीनी तिच्या घरातल्याच एका खोलीचं ऑपरेशन थिएटर केलं आणि त्या मोनार्कचा तुटलेला पंख चक्क ‘ट्रान्सप्लांट’ केला. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या बागेत एक मेलेलं मोनार्क फुलपाखरू सापडलं होतं. त्याचा एक पंख तिच्याकडे होता. एक टॉवेल, कपड्यांचा हॅंगर, एक टूथपिक, गोंद, कातरी, कापूस आणि चेहऱ्याला लावायची पावडर वापरून रोमीनी ‘पंखारोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी केली, आणि आश्‍चर्य म्हणजे एक दिवसाची विश्रांती आणि शुश्रुषेनंतर त्या मोनार्कनी दोन्ही पंख पसरून रोमीच्या बागेत झेप घेतली.
या ‘पंखारोपणा’चा व्हिडिओ जगभरात पाहिला गेलाय. फुलपाखराचे पंख आपल्या केसांसारखे किंवा नखांसारखे असतात. त्यामुळे फाटलेला पंख नीट कातरून घेऊन दुसरा पंख तिथे चिटकवताना मोनार्कला भूल वगैरे द्यायची गरज नव्हती आणि मुख्य म्हणजे मोनार्कचा फाटलेला पंख हा अपघात होता, ती जन्मजात शारीरिक विकृती नव्हती.
मोनार्क बाळाला हॅंगरमध्ये नीट अडकवून रोमीनी आधी त्याचा फाटका पंख नीट साफ केला. मग अगदी हलक्‍या हातानी तिनी तिच्याकडचा दुसरा पंख त्या पंखाशी जुळवून घेऊन चिटकवला. मोनार्कच्या पंखांवर असलेल्या काळ्या रेषा अगदी नीट जुळल्या नाहीत, पण हे पंखारोपण यशस्वी झालं. आता एक त्रुटी राहिली. मोनार्क फुलपाखरांमध्ये नरांच्या पंखावर खालच्या बाजूला एक ठिपका असतो. रोमीकडे असलेल्या स्पेअर पंखावर हा ठिपका नव्हता, त्यामुळे नवा पंख मिळालेल्या मोनार्कच्या एकाच पंखावर आता तो नर असल्याची खूण आहे. रोमी म्हणते, ‘‘ठिपक्‍याचं काय एवढं? त्याला आता उडता येणार आहे.’’
तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तिला अनेक प्रश्‍न विचारले. मात्र ‘उत्साहाला आवर घाला,’ असा रोमीनी त्या सगळ्यांना सांगितलंय.
‘पंखारोपणा’वर एक मॅन्युअलच लिहायचा तिचा विचार आहे, पण एक मुद्दा मात्र ती पुन्हा पुन्हा सांगते, तुमचा हात खूपच स्टेडी असायला हवा, नाहीतर करायला जाल एक आणि होईल भलतंच...
***
मोनार्क फुलपाखरांच्या घटत्या संख्येबद्दल गेली अनेक वर्षे अमेरिकाभर चर्चा चालू आहेत. स्थलांतर करणाऱ्या मधमाश्‍या, मोनार्क फुलपाखरे यांच्या संरक्षणाकरिता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीनएक वर्षांपूर्वी एक धोरण प्रसिद्ध केले होते. परागीभवनाच्या एकूण प्रक्रियेतच पर्यायाने अन्नधान्य, फळफळावळ, फुलांच्या उत्पादनात हे कीटक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आश्‍चर्य वाटेल पण ओबामांच्या या धोरणात स्थलांतर करणाऱ्या मोनार्कांसाठी मेक्‍सिको ते मिनेसोटादरम्यान जवळपास दीड हजार मैलांचा ‘बटरफ्लाय कॉरिडॉर’ तयार करण्याचा प्रस्ताव होता. जगातल्या अन्य काही देशांमध्येही असे काही प्रस्ताव आहेत. 
फुलपाखरांवर संशोधन करणाऱ्या मंडळींना विचाराल तर अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे, असं ते सांगतील. भारतातही या संदर्भात अभ्यास होत असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देशभरातल्या महामार्गांवर असंख्य फुलपाखरांचा, मधमाश्‍यांचा, सापांचा जीव जातो, याबद्दल गेली दोनअडीच दशके वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव प्रेमी सातत्याने बोलत आहेत, उपाय सुचवत आहेत. काही वर्षांपूर्वी कोणत्या तरी अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या झाडावर फुलपाखरे ज्यामुळे लांब जातील अशी गंधद्रव्ये लावण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या प्रयोगाचं पुढे काय झालं कोण जाणे...  
***
रोमीच्या गोष्टीच्या निमित्ताने फुलपाखरांविषयी आणखी वाचत गेलो. दरम्यान आणखीही काही काही वाचत होतोच. दुर्गा भागवतांच्या ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ या पुस्तकातल्या ‘एक अभावात्मक संकेत’ या लेखात फुलपाखरांविषयीचा एक वेगळाच संदर्भ मिळाला. तो संदर्भही अगदीच अनपेक्षित -भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाचा. दुर्गाबाई लिहितात, ‘‘काही संकेत अभावात्मक असतात. म्हणजे एखाद्या वस्तूचा ती प्रत्यक्षात कितीही महत्त्वाची असली तरी वाङ्‌मयात उल्लेख नसतो. [...] परंतु काही परमरुचिर वस्तूंचा अभाव संकेतबद्धतेमुळे वाङ्‌मयात येतो. अशा गोष्टीत मी प्रामुख्याने भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाची गणना करीन.’’
आपल्या वाङ्‌मयात अमाप निसर्ग वर्णने आहेत. त्यात वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, मासे, नाग-साप, वाळवी, मुंग्या, पतंग आहेत; अगदी इंद्रगोपावर म्हणजे मृगाच्या किड्यावर कवने आहेत, असं सांगून दुर्गाबाई लिहितात, ‘‘परंतु तरीही हा निसर्ग फुलपाखराच्या अभावी खुरटा वाटतो. उणा वाटतो.’’
गोंडी भाषेतली काही कवने आणि बंगाली आणि आसामी साहित्यातले काही उल्लेख वगळता अन्य साऱ्या भारतीय वाङ्‌मयाने फुलपाखरांना नाकारले, असे दुर्गाबाई म्हणतात. या लेखाचा समारोप करताना त्या लिहितात, ‘‘जीवनालाही जिथे क्षणभंगुर म्हणून आम्ही ठोकर मारली, तिथे तर मूर्तिमंत क्षणभंगुर व सुखलोलुप जे फुलपाखरू ते आम्हास कसे रुचावे? [...] भारतीयांनी नादकलेचा परम उत्कर्ष संगीतात साधला तसा दुसऱ्यांना साधता आला नाही. म्हणूनच मला वाटते ‘गुं गुं’ करणारा भ्रमर काळा-ठुसका असूनही आम्हाला प्रिय झाला. [...] पण मूर्तिमंत सौंदर्य पाकोळीच्या रूपाने भ्रमरासारखेच, ‘सरस पाहून चुंबण्या’च्या विद्येत प्रवीण असूनही, केवळ मुके, निःशब्द म्हणून आम्ही नाकारले. सर्वस्वी उपेक्षिले.
दुर्गाबाईंच्या मते पाश्‍चात्य वाङ्‌मयातल्या कल्पनांबरोबर फुलपाखरू नवशिक्षितांच्या लेखनात प्रवेश करते झाले. याच लेखात दुर्गाबाईंनी जगातल्या अन्य संस्कृतींमध्ये फुलपाखरांविषयीच्या कल्पनांबाबतही विस्ताराने लिहिले आहे. ‘फुलपाखरू पाहशील तेव्हा मीच तुला भेटायला आले आहे, असे समज,’ या रोमीच्या आईच्या शब्दांप्रमाणे फुलपाखरू म्हणजे माणसाचा आत्मा ही कल्पना युरोप, जपान, पॅसिफिक बेटे यात प्रसृत आहे. नॉर्थ अमेरिकेतल्या इंडियनातही तो समज रूढ आहे, असा उल्लेख दुर्गाबाई करतात.
असो... दुर्गाबाईंचा हा विलक्षण लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पण आपला विषय तो नाही. राजेशाही शिकारींच्या कथा अगदी कालपरवापर्यंत ऐकल्या-सांगितल्या जात असल्या, त्यातून कितीतरी रमणोत्सुक मने जुळली असली आणि त्यातून पुढे महाभारते घडली असली, तरी संस्कृत वाङ्‌मयातला पहिला श्‍लोक महाकवी वाल्मीकींना स्फुरला तो प्रेमालापात मग्न असताना व्याधाच्या बाणाची शिकार झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या प्रियेच्या विलापातून.
जखमी झालेल्या वन्यप्राण्यांसाठी जीव टाकणारे रोमीसारखे असंख्य लोक जगभर आहेत. ते वन्यप्राण्यांसाठी अनाथालये चालवतात, अडचणीतल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालतात, आजारी प्राण्यांची देखभाल करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडतात, अपंगत्व आलेल्या प्राण्यांची आयुष्यभर काळजी घेतात. नीलिमकुमार खैरे यांच्या भारतीय सर्पविज्ञान संस्थेचं प्राण्यांचं अनाथालय, डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातला वन्यप्राण्यांचा दवाखाना ही आपल्या आजूबाजूची ठळक उदाहरणे. वन्यप्राण्यांना नवजीवन देण्याचे असे प्रयत्न जगभर सुरू असतात.
ग्रीनपीस या पर्यावरणरक्षणाला वाहून घेतलेल्या संस्थेतून बाहेर पडलेल्या पॉल वॅटसननी तर समुद्री प्राण्यांची शिकार करणाऱ्यांविरुद्ध चक्क लढाईच पुकारली आहे. त्यांच्या ‘सी शेफर्ड’ संघटनेचा थेट ‘डायरेक्‍ट अॅक्शन’वरच विश्‍वास आहे. अॅनिमल प्लॅनेट चॅनेल फॉलो करत असाल तर ‘व्हेल वॉर्स’ नावाची सीरिज आठवत असेल. हा पुन्हा वेगळाच विषय.
पंचवीसएक वर्षांपूर्वी सर्पविज्ञान संस्थेच्या अनाथालयाची सुरवात होत असताना पाय मोडलेल्या एखाद्या राखी बगळ्यावर शस्त्रक्रिया करता येते हाच चमत्कार वाटला होता. वनखात्याने सुटका केलेल्या, लोकांनी वाचवलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याकरिता, वाढवण्याकरिता काय काय आणि किती करावे लागते, एखाद्या प्राण्याबद्दल किती बाजूंनी विचार करावा लागतो याचा आपल्याला अंदाजच येऊ शकणार नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सापडलेली बिबट्याची काही पिल्लं वेगवेगळ्या वेळी नीलिमकडे सोपवली होती. या पिल्लांना वाढवतानाचे नीलिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत.
अनेक प्राणी नंतर कात्रजच्या अनाथालयात आले, बरे झाले, निसर्गात परतले. ज्यांना निसर्गात पुन्हा सोडता येणं शक्‍य नव्हतं, ते तिथेच राहिले. ‘मैत्र जीवाचे...’ या पुस्तकात नीलिमनी बाबा बिबट्या आणि अनाथालयातल्या अन्य काही प्राण्यापक्ष्यांबद्दल लिहिलेही आहे.
अगदी तीनएक आठवड्यांपूर्वी नाशिकच्या सुरगणा तालुक्‍यात वनाधिकाऱ्यांना अगदी विकल झालेली तरसाची एक मादी सापडली. अनिलनी, हा नीलिमचा धाकटा भाऊ, मला तिची गोष्ट सांगितली. मग त्यानीच वनपाल अमित साळवे आणि डॉ. अंकुश दुबेंना फोन लावला. आम्ही तिला नाशिकलाच ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, साळवे मला फोनवर सांगत होते. पण तिची एकंदर स्थिती बघून आम्ही तिला कात्रजला हलविण्याचा निर्णय घेतला. ती गरोदर होती. खूप अशक्त झाली होती. तिचं हिमोग्लोबिन प्रचंड कमी झालं होतं. वीसएक दिवस लागले, तिला पूर्ण बरं व्हायला. तिची बाळं वाचली नाहीत; पण ती छान बरी झाली, डॉ. अंकुश सांगत होते. दोन-चार दिवसांपूर्वीच जिथे सापडली होती त्याच परिसरात तिला पुन्हा सोडलं आम्ही, साळवेंनी गोष्ट संपवली.
विकासाच्या रेट्यात माणूस आणि वन्यप्राण्यांदरम्यान एक संघर्ष उभा राहात असताना, माणसाच्या हव्यासापोटी प्राण्यांच्या जातीमागून जाती संकटात सापडत असताना, असे प्राणीमित्र एखाद्या फुलपाखरासाठीही काही वेगळे करू पाहतात, हाच दिलासा आहे.
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक मार्च 2018)

Sunday, May 27, 2018

ट्रॅक्‍स अँड साईन्सः आभाळ पाठीवर घेणारे हत्ती


रानटी हत्तीचा माझा पहिला अनुभव "दृक'पेक्षा "श्राव्य' अधिक आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी दांडेलीच्या जंगलात मी पहिल्यांदा हत्ती "ऐकला'. रानावर प्रेम करणाऱ्यांसाठी, पक्षी पहाण्यात रस असणाऱ्यांसाठी दांडेली स्वर्ग आहे. दांडेलीपासून दहाबारा किलोमीटरवर कुळगी नावाच्या गावात एक कॅम्पसाईट आहे. सातआठ तंबूनिवास, एक खुलं सभागृह, एक नेचर इंटरप्रिटेशन सेंटर -तिथे वन्यप्राण्यांवरच्या काही उत्तम चित्रफिती पहाण्याची सोयही आहे. अलिकडे ही कॅम्पसाईट आणखी अपग्रेड झालीय, तंबू एसी झालेत वगैरे.
रान, रानातल्या वाटा, दिवसाच्या प्रत्येक बदलत्या प्रहरागणिक नवं रूप धारण करणारं रान अनुभवायचं असेल तर दांडेलीइतकी उत्तम जागा नाही. घनदाट हिरवाईत स्वतःला लपेटून घ्यायचं आणि कुळगीच्या कॅम्पसाईटला दिवसभर नुसतं बसून राहायचं. फारशी हालचाल न करता एक चेकलिस्टभर पक्षी सहज अनुभवता येतात. उंचच उंच वारूळे, लाल मुंग्यांची घरटी, नाजूकपणे विणलेली जायंट वुड स्पायडरची जाळी, मधूनच एखादा सिग्नेचर स्पायडर अशा मंडळींची ओळख करून घेत थोडी पायपीट करायची तयारी असेल तर काही प्राणीही नजरेस पडू शकतात. आणि तुमचं "टायगर लक' जर जोरावर असेल तर या जंगलात एखादा खराखुरा ब्लॅक पॅंथरही दर्शन देऊन जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही; किंवा नाकावर भलं थोरलं पिवळं शिंग घेऊन उडणारा मलबार हॉर्नबिल सुद्धा.
कोल्हापूरातले माझे मित्र सुनील करकरे गेली कित्येक वर्षे निसर्गात रस असणाऱ्या मंडळींना घेऊन वेगवेगळ्या अभयारण्यात जातात. त्यांना प्राण्याविषयी, निसर्गाविषयी सांगतात... सजग करतात. रान वाचायला शिकवतात. रानाचे, प्राण्यांचे फोटो काढतात. त्यांच्याबरोबर पहिल्यांदा दांडेलीला गेलो तेव्हा ते डब्ल्यूडब्ल्यूएफबरोबर काम करत होते. कुळगीच्या या कॅम्प साईटच्याजवळ एक छोटेसे वॉटरहोल होतं. अजूनही असेल. अगदी चित्रातल्यासारखं. चारही बाजूंनी घनदाट रानानी वेढलेलं. तिथे एक मचाण होते. पहिल्याच दिवशी संध्याकाळी एकदोन तासांसाठी आम्ही त्या मचाणावर डेरा जमवला होता.
जंगलात ऐकू येणारे आवाज, आजूबाजूला होणारी अगदी छोटीशीही खसफस, दिवस मावळताना पाण्यावर येणारे प्राणी, मधूनच त्या गचपणातून सूर मारल्यासारखे उडणारे पक्षी (माणसाच्या आजूबाजूला दिसणारे खंड्या वगैरेंसारखे काही ठळक अपवाद वगळले तर रानातल्या पक्ष्यांची ओळख व्हायला आताशा सुरवात झाली होती), त्यांच्या सवयी आणि त्यातून उलगडत जाणारं सभोवतालचं रान अशा सगळ्याबद्दल सुनिलनी कायकाय सांगितलं होतं त्या सगळ्याची मनोमन उजळणी करत आम्ही कुळगीच्या त्या मचाणावर बसलो होतो. इतका वेळ मचाणावर बसण्याचा तसा हा पहिलाच अनुभव. आणि समोर काही म्हणजे काहीच घडत नव्हतं. चित्रातल्या सारखा दिसणारा तो जलाशय चित्रातल्या सारखाच स्तब्ध होता. लांबवरच्या सुपा धरणाच्या मागच्या डोंगरात सूर्य मावळत होता तशी आल्या वाटेने कॅम्पसाईट गाठायची वेळ जवळ येत चालली होती.
अचानक आजूबाजूला प्रचंड कोलाहल सुरू झाला. झाडांतून प्रचंड हालचालीचे, बांबू मोडल्याचे आवाज यायला लागले. ""हत्ती...'', कोणीतरी कुजबुजलं. अंगभर एक शिरशिरी येऊन गेली. गडद होत जाणाऱ्या अंधारातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाबरोबर डोळे ताणताणून शोधण्याचा प्रयत्न केला. दिसलं काहीच नाही. खूपवेळ नुसतेच आवाज ऐकून आम्ही कॅम्पसाईटला परत आलो. मग पुष्कळशी प्रश्‍नोत्तरे, हत्तींबद्दल.
नंतर आणखी तीनचारवेळा दांडेलीत जाणं झालं. हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दांडेलीत हत्तींच्या वावराच्या खाणाखुणा खूप दिसल्या -त्यांच्या पाऊलखुणा, साली खाण्यासाठी सोललेली झाडं, दांडेलीत भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून विशेषतः हत्तींपासून उभ्या पिकाचं रक्षण करण्याकरता उभी केलेली सौरउर्जा खेळवलेली कुंपणं, आणखी खूप काही. पण दांडेलीत मला हत्ती प्रत्यक्ष कधी पहायला मिळाला नाही. तो पाहिला नंतर खूप वर्षांनी बांदीपूरमध्ये.
***
असंख्य समजुतींमधून, प्रतिकांमधून, चित्रांतून, शिल्पांमधून, काव्ये, पुराणे, गाणी, लोककथा, चालीरिती, परंपरा या सगळ्यांतून गेली हजारो वर्षं हत्ती आपल्या आजूबाजूला वावरतो आहे. भारताबाहेरही श्रीलंका, इंडोनेशिया, जावा बेटांपर्यंत पोचलेला, अग्रपूजेचा मान असलेला आपला बुद्धिदाता श्री गजानन "गजवदन'च आहे. हत्तीचे आणि माणसाचे संबंध कायमच गुंतागुंतीचे राहिले आहेत. हजारो वर्षांपासून माणसाच्या सान्निध्यात राहिलेल्या, युद्धांपासून ते अनेक अवजड कामांत माणसाला साथ देणाऱ्या, माणसाच्या ऐश्‍वर्यांचं आणि सत्तेचं प्रतिक असणाऱ्या हत्तींचा सगळ्यात मोठा शत्रू माणूसच आहे.
कोट्यवधी वर्षांपूर्वी सशाच्या आकाराच्या मॅरिथेरियमपासून आजच्या हत्तींचा प्रवास सुरू झाला असं शास्त्रज्ञ सांगतात. गजकुळाच्या कधीकाळी तीनएकशे शाखा असाव्यात. एकेकाळी हत्ती जगभर पसरलेले होते असे आजवरच्या संशोनातून दिसून आले आहे. उत्क्रांतीच्या खेळात आता फक्त आफ्रिकेतले "लोक्‍झोडोन्ता आफ्रिकाना' आणि आशियातले "एलीफस मॅक्‍झिमस' ही दोनच कुळे उरली आहेत. आफ्रिकी हत्ती मुख्यतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे मध्य आणि पश्‍चिम आफ्रिकेत आढळतात तर पाकिस्तान सोडून दक्षिण आणि आग्नेय आशियातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये हत्ती आढळतात. आशियायी हत्तींच्या तीन उपजाती आहेत. "एलीफस मॅक्‍झिमस इंडिकस' म्हणजे भारतीय हत्ती, सुमात्रा आणि आजूबाजूच्या प्रदेशातले "एलीफस मॅक्‍झिमस सुमात्रन' आणि श्रीलंकेत सापडणारे "एलीफस मॅक्‍झिमस मॅक्‍झिमस'. जमिनीवर रहाणारा हा सगळ्यात मोठा प्राणी आहे. ताकद आणि वजनाचा विचार केला तर खोल समुद्रात रहाणारे काही देवमासे आणि उंचीचा विचार करता जिराफ एवढेच प्राणी हत्तीपेक्षा मोठे आहेत.
रामायणात, महाभारतात कालीदास -भवभूतींच्या वाङ्‌मयात, अन्य लिखाणात हत्तींचे अनेक उल्लेख आहेत. राज्याभिषेक, विवाहादी प्रसंगांमध्ये, युद्धांत, महाभारतातल्या द्युतात शृंगारलेल्या हत्तींचे, हस्तिदंताने मढवलेल्या सिंहासनांचे, दागिन्यांचे उल्लेख येतात. भारतीय युद्धात, दुर्योधनाने केलेल्या निर्भत्सनेमुळे संतापून पांडवांवर तुटून पडलेल्या द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडले गेले, त्या प्रसंगातला हत्तीचा उल्लेख मानवी स्वभावाचे ताणेबाणे दाखवणारा एक भाषिक अलंकारच झाला. नरो वा कुंजरो वा... पराक्रम गाजवणाऱ्या द्रोणाचार्यांना रोखण्यासाठी "शस्त्र न धरी करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' म्हणणाऱ्या श्रीकृष्णाने भीमाकडून अश्‍वत्थामा नावाचा एक हत्ती मारवला. द्रोणपुत्र अश्‍वत्थामा मारला गेल्याचे कर्णोपकर्णी सैन्यात पसरले. बातमीची शहानिशा करण्यासाठी द्रोणाने असत्य कथन न करणाऱ्या धर्मराजाला विचारले. आचार्यांच्या प्रश्‍नाला ज्येष्ठ पांडवाने उत्तर दिले, अश्‍वत्थामा हतः। नरो वा कुंजरो वा। अश्‍वत्थामा मारला गेला, माणूस की हत्ती ते माहिती नाही. कृष्णाच्या योजनेप्रमाणे "अश्‍वत्थामा हतः' इतक्‍याच उद्‌गारांनंतर सुरू झालेल्या शंखनादात "नरो वा कुंजरो वा' हरवून गेलं; पुत्रवियोगाच्या दुःखाने द्रोणांनी धनुष्य खाली ठेवले आणि धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. भारतीय युद्धाला आणखी एक वळण देणारा हा प्रसंग. असत्य किंवा संदिग्ध कथनाच्या पापाकरता धर्मराजाला काही क्षणांसाठी का होईना पण नरकाचे दर्शन होते अशी कथा पुढे महाभारतात येते. संदिग्ध कथनातला हा हत्ती तिथून थेट भाषेत स्थिरावला.
युद्धांमध्ये हत्तींच्या वापराचे उल्लेख जगभर सापडतात. सव्वाबावीसशे वर्षांपूर्वी मध्य आशियातल्या एका महायुद्धात चौथ्या टॉलेमीनी आशियायी हत्ती वापरल्याची नोंद आहे. जग जिंकायला बाहेर पडलेल्या सिकंदराची घोडदौड रोखणाऱ्या राजा पौरसाच्या सैन्यातल्या हत्तींची गोष्ट सर्वश्रुत आहेच.
चालुक्‍य वंशातील राजा सोमेश्‍वर याच्या "मानसोल्लास' ग्रंथात गजदलाची प्रशंसा केलेली आहे, असा उल्लेख बाळ सामंत यांच्या "गजराज' या हत्तींवरच्या पुस्तकात मिळाला.
राजा सोमेश्‍वर लिहितो -
वारणै र्भटूजातीर्य कालिङ्‌गवन जान्मिथी ।
शिसितैः सज्जितेः शूरर्लभ्यते विजयो युधी ।।
मुख्यं दन्तिबल राज्ञां समरे विजर्यषिणाय।
तस्मान्निजबले कार्या बाहतो वारणोत्तमा ।।
कलिंगवनात जन्मलेल्या, उत्तम जातीच्या, सुशिक्षित व सुसज्ज अशा शूर हत्तींच्या साहाय्याने युद्धात विजय प्राप्त होतो. युद्धात विजयाची आकांक्षा असणाऱ्या राजांच्या सैन्यात गजदल मुख्य असते. म्हणून त्यांनी स्वतःच्या सैन्यात पुष्कळ उत्तम हत्ती ठेवावेत.
तरीही हत्ती आणि माणसामधलं अगदी पौराणिक काळापासूनचं नातं चमत्कारीकच आहे. हत्तींच्या अचाट ताकदीचा उपयोग माणसानी करून घेतला. कांस्ययुगापासून हत्तींकडून कामं करवून घेणाऱ्या माणसांचे संदर्भ सापडतात. पण श्‍वानांसारखा किंवा घोड्यांसारखा हत्ती पूर्णपणे कधीच माणसाळला नाही. त्या अर्थानी हत्ती आणि माणसात कायमच एक अंतर राहिलं.
***
सोंड हे हत्तीचं वैशिष्ट्य. आफ्रिकी आणि आशियाई हत्तींच्या सोंडेच्या टोकावळच्या रचनेत थोडा फरक असतो. "लोक्‍झोडोन्ता आफ्रिकाना' मध्ये सोंडेच्या टोकावर बोटांसारख्या दोन मांसल रचना असतात आणि "एलीफस मॅक्‍झिमस'च्या सोंडेच्या टोकावर अशी एकच रचना असते. सोंडेच्या या टोकानी हत्ती अगदी टाचणी एवढी बारीक वस्तूही उचलू शकतो असे प्राणीशास्त्रज्ञ सांगतात. चाळीस हजार स्नायू एकत्र मिळून हत्तीची सोंड बनते. माणसाशी तुलना करायची तर माणसाच्या आख्ख्या शरिरात सहाशेपेक्षा थोडे जास्त स्नायू असतात. हत्ती सोंडेनी श्वास घेतो, आजूबाजूच्या अन्य गंधांचं ज्ञान त्याला सोंडेमुळे होतं. सोंडेनी तो पाणी पितो, मातीचा वास घेतो, धूळ उडवतो, दंगामस्ती करतो, सोंडेत तो चारपाच लिटर पाणी साठवू शकतो. पण युद्धात हीच सोंड त्याच्या घातालाही कारणीभूत होऊ शकते. महाभारताच्या "उपसंहार' खंडात चिंतामणराव वैद्य म्हणतात -..र्.िें हत्तींना फौजेत मानाचे स्थान होते. पण त्याची सोंड नरम असल्याने तो भाग सहज तोडण्यासारखा असे. त्यामुळे हत्तीच्या गंडस्थळापासून सोंडेच्या शेवटापर्यंत लोखंडी चिलखत घातलेले असे ..र्.िें
***
माझ्या पिढीतल्या अनेकांची हत्तीशी प्रत्यक्ष पहिली गाठ पडली असणार ती सर्कशीत. फूटबॉल खेळणारे, सर्कससुंदरीच्या इशाऱ्यासरशी त्यांच्या आकाराच्या मानानी इवल्याश्‍या स्टूलावर चारही पाय ठेवून उभे रहाणारे, काम नसताना सर्कशीच्या शिकारखान्यात गवत उडवत झुलत रहाणारे, पाय मोकळे केल्यासारखे गावातून फेरफटका मारताना सर्कसची जाहिरात करणारे हत्ती. आत्ता पन्नाशी आणि साठीच्या दरम्यान असलेल्या पिढीला आणखी एक आठवण असणार; "चल, चल, चल मेरे साथी; ओ मेरे हाथी...' असं म्हणत हत्तींची आख्खी पलटण हिंडवणारे त्यावेळचे बॉलीवूडमधले ज्येष्ठ हत्तीमित्र रा.रा. राजेश खन्ना यांची.
पुण्याच्या पेशवे पार्कात सुमित्रा आणि अनारकली नावाच्या दोन हत्तीणी होत्या. त्यावेळी "बच्चेकंपनी' या सदरात मोडणाऱ्या अवघ्या पुणेकरांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा या हत्तीणींवर जीव होता. पेशवे पार्कात त्यावेळी या हत्तीणींच्या पाठीवर बसून एक छोटासा फेरफटकाही मारता येत असे. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत अग्रभागी चालण्याचा मान अनेक वर्षे आधी सुमित्रेचा आणि नंतर अनारकलीचा होता. पुण्यासारख्याच कोल्हापूरकरांच्या, सांगलीकरांच्या आणखी कुठल्या कुठल्या गावांतल्या रहिवाशांच्या आठवणी हत्तींशी जोडलेल्या असतील. सांगली देवस्थानच्या सुंदर गजराजाच्या किंवा त्याच्या नंतर आलेल्या बबलू हत्तीच्या आठवणी अजून ताज्या असतील. बातमीदारीच्या निमित्ताने केव्हातरी सांगलीला गेलो असताना श्रृंगार करून बाजारपेठेतून दिमाखात फेरफटका मारणारा, हक्कानी केळ्यांचा घड स्विकारणारा सांगलीच्या देवस्थानचा हत्ती माझ्याही स्मरणात आहे.
हंपीच्या देवळातला एक अनुभव आहे. हंपीच्या विरुपाक्ष मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सामोरा आला मंदिरातला हत्ती; एखाद्या शुभंकरासारखा, आशीर्वाद दिल्यासारखी सोंड उंचावून.
हत्तीच्या शेपटीचा पुसटसा फटकाही चांगला खरचवटून जातो हे कळण्याचाही योग नंतर एकदा यायचा होता.
***
दक्षिणेकडच्या बहुतेक सगळ्या अभयारण्यांमध्ये हत्ती आढळतात. त्यांच्या त्या साम्राज्यात त्यांना पहाण्याचा आनंद काही आगळाच असतो हे कळलं बांदीपूरमध्ये. "तुम्ही हत्तींच्या प्रदेशात आहात. रस्त्यावर फार वेळ रेंगाळू नका,' बांदीपूर अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यावर स्वागत होतं ते अशा अर्थाच्या सूचनेनीच. न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा रस्ता सूर्यास्तानंतर माणसांच्या राज्यातल्या वाहतुकीला बंद असतो.
जंगलात नेहमी फिरणाऱ्या मित्रांकडून हत्तींचे त्यांनी अनुभवलेले, ऐकलेले खूप किस्से सांगतात. जॉर्ज ऑर्वेलसह जुन्या काळातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून अनेकानी त्यांच्या आठवणीतले हत्ती लिहून ठेवले आहे. ऑर्वेल सुरवातीच्या काळात ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी असतानाचा त्यांनी एका हत्तीला गोळ्या घातल्या होत्या. "शूटींग ऍन एलेफंट' या प्रसिद्ध निबंधात त्यांनी हा प्रसंग नोंदवून ठेवला आहे. स्थानिक लोकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल फारसं ममत्व नव्हतं. शिवाय केवळ एका मजूराला मारून टाकले म्हणून त्या हत्तीला गोळ्या घालण्याची ऑर्वेल त्यांची कृतीही काहीशी वादग्रस्त ठरली होती. "ऍनिमल फार्म' आणि "नाईन्टीन एटीफोर' सारख्या आपल्या कादंबऱ्यांमधून कालातीत ठरणारी राजकीय टिपणी करणाऱ्या ऑर्वेल यांचा हा अनुभव मुळातून वाचण्यासारखा आहे.
हत्तींविषयी वाचताना असंख्य उल्लेख सापडतात. समुद्रमंथनातून मिळालेला ऐरावत, भोंडल्याच्या खेळात फेर धरलेल्या मुलींच्या मध्ये पाटावर चितारलेला किंवा हौसेनी घडवलेला मातीचा हत्ती, "मेघदूत' रचणाऱ्या कवीकुलगुरू कालीदासाने आषाढाच्या पहिल्याच दिवशी पर्वतशिखरांशी झुंजणाऱ्या काळ्याकभिन्न मेघांना दिलेली मत्त हत्तींची उपमा, अन्य संस्कृत रचनांमध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, "हस्तिप्रधानो विजयी राज्ञाम्‌' हे कौटिल्याचे वचन, गौतम बुद्धांच्या मातेला स्वप्नात दिसलेला शुभ्र हत्ती, "गाथा सप्तशती' मध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, हरप्पा मध्ये सापडलेल्या हत्तींच्या प्रतिमा, अजंठा, भारहूत इथल्या शिल्पांमधल्या गजप्रतिमा, गजांतलक्ष्मीची कल्पना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी रायगडासारख्या बेलाग किल्ल्यावर झुलणारे हत्ती पाहून अचंबित झालेला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्‍झेंडन, दक्षिण भारतातले गजपर्व, म्हैसूरमधल्या दसऱ्याच्या शाही सोहळ्यातले शृंगारलेले हत्ती, नवी वास्तू हत्तीसारखी मजबूत व्हानी म्हणून वास्तूशांतीच्यावेळी हत्तीच्या पायाखालची माती पुजण्याची रीत, हत्तीच्या सोंडेसारख्या धारांनी बरसणारा हस्ताचा पाऊस, रूडयार्ड किपलिंगच्या "जंगल बुक' मधला "व्हेन आय वॉज इन्‌ द आर्मी ऑफ... ' असं सांगत शिस्तीच्या स्वतःच्याच कल्पनांमध्ये रममाण होणारा रिटायर्ड फौजी -कर्नल हाथी, हस्तीदंताच्या हव्यासापायी जगबर माणसानी मांडलेला गजमेध, कृष्णमेघ कुंटेंनी सांगितलेली कुडकोम्बन नावाच्या लांब सुळ्यांच्या हत्तीची गोष्ट, जगातली सध्याची सर्वात वयस्क हत्तीण - चेंगन्नूरच्या महादेव मंदिरातली अठ्ठ्यांशी वर्षांची चेनकल्लूर दाक्षायणी, हत्तीनी भाषेला दिलेल्या "पांढरा हत्ती', "साठमारी', "खायचे आणि दाखवायचे दात', "द एलिफंट इन द रूम', "ऍन एलिफंट नेव्हर फर्गेटस्‌', "हॅव अ मेमरी लाईक एलिफंट', "हत्ती गेला शेपूट राहिले,' "दुःख हत्तीच्या पावलांनी येते..', "हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी' सारख्या म्हणी, संज्ञा आणि वाक्‌प्रचार, अधिवास आक्रसत चालल्याने माणसाशी संघर्ष मांडणारे हत्ती, तळकोकणातल्या अशा संघर्षाला केंद्रस्थानी ठेवत बदलत्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे पहाणारी अजय कांडर यांची "हत्ती इलो' ही दीर्घ कविता, कोलंबोतल्या गंगरामाया विहारात पाहिलेला जमिनीला टेकण्याइतके लांब सुळे असलेला हत्ती अशा वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या असंख्य प्रतिमा डोळ्यासमोर येत गेल्या. मग लक्षात आलं, हत्ती समजावून घेताना आपलीच अवस्था लिळाचरित्रातल्या हत्ती पहाणाऱ्या सात आंधळ्यांसारखी झालीय. प्राणीशास्त्रातून दिसणारा हत्ती, उत्क्रांतीच्या प्रवासात दिसणारा हत्ती, संस्कृतीचा, इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून येणारा हत्ती, महाकाव्यांमधून, भाषिक प्रतिमांमधून दिसणारा हत्ती... हत्तींची ही कहाणी; खरंतर साठा उत्तरी पण पाचा उत्तरीच पूर्ण होणारी! 
(प्रथम प्रसिद्धी -सकाळ साप्ताहिक)

Friday, August 18, 2017

खाद्यसंस्कृतीची ‘रुचकर’ सफर...

खाद्यसंस्कृतीचे अनेक पैलू आहेत. सुरवातीला मानव ‘चिंपाझी’सारखा मिश्रआहारीच होता. अग्नीचा शोध लागल्यावर त्याच्या जगण्याला ‘चव’ मिळाली. तिथून खाद्ययात्रेला आणखी परिमाणं मिळत गेली. पाककलेच्या शास्त्राचा पाया रचला गेला. प्रथा, परंपरा आल्या. आहाराचंही शास्त्र निर्माण झालं. जगातल्या बहुतेक साऱ्या मानवी संस्कृतींमध्ये सणवार, समारंभ, सोहळे, सुखाचे प्रसंग, दुःखाच्या वेळा या सगळ्या गोष्टी स्थूलमानानं आवर्जून खायच्या किंवा आवर्जून टाळायच्या पदार्थांशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्कृतीचा हा ‘रुचकर’ प्रवास...
संस्कृती या शब्दाची अमुक अशी एकच व्याख्या नाही. सोपेपणानं म्हणायचं, तर माणसाचा आजवरचा विविधांगी प्रवास, त्यातली वळणं-क्वचित आडवळणं, चढ-उतार, श्रद्धा-अंधश्रद्धा, आसक्ती -अनासक्ती या सगळ्यांचा सर्वसमावेशक अर्थ संस्कृती या एका शब्दानं पुढं येतो. शोधत गेलं, तर माणसं, समाज आणि काळाच्या संदर्भात वापरला जाणारा हा शब्द शोधणाऱ्याला पार जीवसृष्टीच्या उगमापर्यंत घेऊन जातो. ईशोपनिषदात आत्म-तत्त्वाचं वर्णन आहे- ‘तद्‌ अंतर्‌ अस्य सर्वस्य, तदु सर्वसस्यास्य बाह्यतः...’ विनोबा त्याचा अनुवाद ‘ते या सर्वांच्या आत, आणि ते या सर्वांच्या बाहेर आहे,’ असा करतात. संस्कृतीही अशीच सर्व काही व्यापून उरते.
निर्माण केलेल्या संस्कृतीमधले जे भाग प्रवाही राहिले, ते टिकले. अनेकदा त्यात अनेक धारोपधारा मिसळत गेल्या. माणसाची संस्कृती काही नवं स्वीकारत गेली, तिचे काही कोपरे अंतर्बाह्य बदलत गेले. काही बदलांच्या रेट्यातही होते तसे तगले, काही बदलले; त्यांनी प्रवाह अडू दिला नाही. माणसाच्या संस्कृतीच्या आजवरच्या या प्रवासाचं प्रतिबिंब माणसाच्या जगण्याचा भाग असणाऱ्या त्याच्या खाद्यसंस्कृतीतही जसंच्या तसं पडलेलं दिसतं.
अन्नाचं महत्त्व ही काही कुणी कुणाला समजावून सांगण्याची बाब नव्हे. खाण्याची सुरवात गर्भावस्थेतल्या पोषणापासूनच खरं तर झालेली असते. बहुतेक प्राण्यांमध्ये पहिला श्‍वास घेतल्यानंतरची पहिली भौतिक क्रिया ही उदरभरणाचीच असते. खूप वर्षांपूर्वी एका अत्यंत विषारी सापाचा जन्म पाहिला होता. एका काचेच्या सर्पपेटीपाशी आम्ही उभे होतो. एका क्षणी अंड्याच्या कवचाआड हालचाल जाणवली. मग एका ठिकाणी त्या कवचाला तडे गेले आणि तुकतुकीत अंगकांतीचं पिल्लू बाहेर डोकावलं. मग बोटभर लांबीचा तो जीव हळूहळू अंड्यातून बाहेर आला आणि पुढच्याच क्षणी त्यानं आपली दुभंगलेली जीभ बाहेर काढून त्या सर्पपेटीतल्या वातावरणाचा अंदाज घेतला. ‘‘ते आता आधी काही तरी खायला शोधेल,’’ माझ्या शेजारी उभ्या असलेल्या सर्पजाणकार मित्रानं अत्यंत गंभीरपणे सांगितलं. माझ्याही नकळत मी ‘जीवो जीवस्य जीवनम्‌’ या न्यायानं चालणाऱ्या आणखी एका जीवनचक्राचा साक्षीदार झालो होतो.
***
माणूस सुरवातीला काय खात असेल? संस्कृती म्हणून धांडोळा घ्यावा इतपत विस्तारलेल्या तुमच्या-माझ्या खाद्ययात्रेचा आरंभबिंदू कोणता? क्वचितच केव्हा तरी (आणि त्या ‘क्वचित’मधल्या बहुतेक वेळी आपली रसवंती तृप्त करणाऱ्या आपल्या अत्यंत आवडीच्या; मुख्यतः सामिष, किंवा किमानपक्षी चमचमीत; पदार्थाची प्रतीक्षा सुरू असताना) आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्‍न पडतो (आणि ते पदार्थ समोर आल्यानंतर ‘दर्शनमात्रे मनःकामना पुरती...’ या न्यायानं बहुतेक वेळा तो अनुत्तरितही राहतो); पण माणसाच्या आजवरच्या प्रवासाचा गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या एखाद्या मानववंश शास्त्रज्ञाला हाच प्रश्‍न विचारा. आपले डोळे रोखून तो तुम्हाला गंभीरपणे सांगेल, ‘‘चिंपांझीकडं बघा...’’ आजच्या काळातही चिंपांझींचं जे अन्न आहे- पानं, फुलं, झाडांच्या साली, बांबूसारख्या तृणप्रकारांचे कोवळे कोंब, किडे- हेच सगळं आपण सगळं सुरवातीला खात होतो. मिश्रआहारी. या आहारात बदल व्हायला सुरवात झाली ती २.६ कोटी वर्षांपूर्वी असं मानववंश शास्त्रज्ञ मानतात. पाषाणयुगाच्या सुरवातीचा हा बदल असावा. आदिम प्रेरणांसह जगणारा त्या काळातला माणूस आजूबाजूच्या अफाट रानातून कायकाय खाता येईल, हे शोधून काढत होता. खूप गोष्टी ‘ट्राय’ झाल्या असतील; ही ‘ट्रायल अँड एरर’ कधी तरी महागातही पडली असणार. त्या युगातल्या माणसांनी अळंबी खाल्ल्याचे पुरावे सापडले आहेत. साडेअठरा हजार वर्षांपूर्वीपासून माणसाच्या आहारात अळंब्यांचा समावेश आहे, असं आता अलीकडच्या संशोधनात दिसून आलंय. इतिहासपूर्व काळातल्या एका स्त्रीच्या अवशेषांचा अभ्यास करताना मानववंश शास्त्रज्ञांना हा शोध लागला. आज आपण अळंब्यांच्या अनेक जातींमधून खाण्यालायक जाती शोधून त्या वाढवतो आहोत. याची सुरवात त्या साडेअठरा हजार वर्षांपूर्वीच्या शोधयात्रेत आहे.
अणकुचीदार दगडाचा हत्यार म्हणून वापर सुरू झाल्यावर मग कधीतरी माणूस मांसाहाराकडे वळला. त्याची सुरवात प्राण्यांच्या हाडांमधल्या मगजापासून (बोन मॅरो) झाली, यावर बहुतेक अभ्यासकांचं एकमत आहे.
अग्नीच्या ‘भक्ष्य’स्थानी...
अरण्येच्या अरण्यं भस्मसात करणारा महाभयानक अग्नी माणसाला हवा तेव्हा निर्माण करता यायला लागला, हा मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चकमकीचे दगड वापरून ठिणग्या पाडायच्या आणि आग पेटवायची, या कलेनं पाषाण किंवा तत्सम युगातल्या माणसाचं जगणंच बदललं, आणि तो एकदम पुढच्या युगासाठी ‘अपग्रेड’च झाला.
भाजलेलं मांस अधिक रुचकर लागतं, हा शोध अपघातानंच लागला असावा. (बहुतेक सगळे शोध अपघातानंच लागतात. उदाहरणार्थ  न्यूटनच्या डोक्‍यावर पडलेलं सफरचंद). झालं काय असणार, रात्रभराच्या थंडीनंतर सूर्याची सोनेरी किरणं (तेव्हा ‘सोनेरी’ हा शब्द नसणार, पण तरीही उगवणाऱ्या सूर्याची किरणं सोनेरीच असणार) गुहेच्या आसपास पसरत असताना खाण्यासाठी भांडाभांडी करणाऱ्या दोघा कार्ट्यांना गुहाधनिणीनं हरणांच्या पाठी काळ्या पडायला लागणाऱ्या दिवसांसाठी जमवून ठेवलेल्या मांसाच्या साठ्यातले दोन तुकडे काढून दिले असणार. आताच्या काळातही जशी धाकटी पोरं जरा जास्त (लाडाची असल्यानं) वांड असतात, तशीच त्या काळातही असणार. त्यामुळं धाकट्यानं थोरल्यावरचा राग काढण्यासाठी हातातला मांसाचा तुकडा विझत आलेल्या शेकोटीत भिरकावला असणार; मग शेलक्‍या शब्दांच्या आतषबाजीसह गुहेच्या मालकिणीनं तो आगीत पडलेला मासाचा तुकडा बाहेर काढून गुहाधन्याच्या समोर टाकून त्याला संपवायला लावला असणार; सुरवातीला नाराजीनंच तो तुकडा उचलणाऱ्या गुहाधन्याला पहिल्याच लचक्‍याला त्या तुकड्याची- केवळ भाजला गेल्यानं- बदललेली चव जाणवली असणार आणि...युरेक्काऽऽऽऽ! इथं गुहेतल्या त्या माणसाच्या जगण्याला चव मिळाली. तेव्हापासून सुरू झालेली ही ‘सुरसयात्रा’ अव्याहत सुरू आहे- आजतागायत.
नवे शोध, नवे ‘पाक’पैलू
शिकारीकडून माणूस शेतीकडं वळला. मग स्थिरावला. एव्हाना त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फरक पडला होता. विस्तव आणि पाण्याचं प्रमाण कमी-जास्त करून पदार्थ भाजता, शिजवता किंवा उकडता येतो; वेगवेगळ्या पदार्थांच्या मिश्रणानं वेगवेगळ्या चवी निर्माण करता येतात हे उलगडत गेल्यानंतर या यात्रेला आणखी परिमाणं मिळत गेली. पाककलेच्या शास्त्राचा पाया रचला गेला. माणसाच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या अग्नीपासून ते क्षुधाशांती करणाऱ्या असंख्य गोष्टी देणाऱ्या निसर्गातल्या घटकांचं दैवतीकरण होत गेलं. कृतज्ञतेपोटी माणसानी त्यांच्यावर सूक्तं रचली, आपल्या अन्नातला वाटा हवीच्या रुपानं त्यांच्यासाठीही ठेवला. सुरस यात्रेला भावनिक पदर जोडले गेले. प्रथा, परंपरा आल्या. आहाराचंही शास्त्र निर्माण झालं. काळाच्या ओघात जगातल्या बहुतेक साऱ्या मानवी संस्कृतींमध्ये सणवार, समारंभ, सोहळे, सुखाचे प्रसंग, दुःखाच्या वेळाही स्थूलमानानं आवर्जून खायच्या किंवा आवर्जून टाळायच्या वेगवेगळ्या पदार्थांना जोडल्या गेल्या आहेत. गुळाच्या पोळ्यांशिवाय संक्रांत होत नाही आणि चातुर्मासात सामिष आहारच काय; पण कांदा, लसूणही वर्ज्य असतात. मराठीतल्या अनेक म्हणी, वाक्‍प्रचार, उखाणे, ओव्यांमधूनही  खाद्यसंस्कृतीचं प्रतिबिंब उमटत राहतं.   
पौराणिक ग्रंथांमध्येही उल्लेख
वेदवाङ्‌मयापासून अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये महाभारतादी काव्यांमध्ये त्या-त्या काळातल्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडतं. पुरोडाश, धीवर, करंभ अशा पदार्थांबरोबर आमट्या, कोशिंबिरी, चटण्यांचे उल्लेख पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पक्वान्न करण्यासाठी कंदमुळं, फळांबरोबर मधाचा; तुपाचा वापर होत असे. हरिणादी प्राण्यांच्या मांसाचा आहारात समावेश असे. खादाड म्हणून ओळख असणारा महाभारतातला भीम आणि नल-दमयंती आख्यानातला नल राजा हे पाककुशल होते. अग्नीशिवाय स्वयंपाक करता येईल, असा वर अग्नीनंच नल राजाला दिला होता, असाही उल्लेख पौराणिक कथांमध्ये सापडतो. विराटाघरच्या अज्ञातवासाच्या काळात भीमानं बल्लवाचीच भूमिका स्वीकारली होती. आज सणावाराच्या प्रसंगी मस्ट असलेल्या श्रीखंडाचं जनकत्व भीमाकडे जातं. नल राजाच्या नावावर तर पाकशास्त्राचं एक पुस्तक आहे- ‘नलपाकरहस्य.’ दुर्गा भागवत यांच्या लिखाणात या पुस्तकाचे संदर्भ येतात. नल राजाच्या नावावर असलं, तरी हे पुस्तक फार प्राचीन नसावं, असं त्यांनी एका लेखात म्हटलं आहे. संस्कृतमधल्या त्या छोट्याशा पुस्तकाचं भाषांतर करण्याचीही दुर्गाबाईंची इच्छा होती.
माणसं वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रदेशात जायला लागली. ती त्यांच्याबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही घेऊन गेली. खाद्यसंस्कृतीचा हा प्रवास दिवसेंदिवस बहुपेडी होतो आहे. या प्रवासाला धार्मिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक असे असंख्य चेहरे आहेत.
***
एखाद्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेणं, हा एक सोहळा असतो. खाण्यापिण्याचीही एक शिस्त असते, संस्कार असतो. अतिथीला देव मानणाऱ्या, प्रसंगी आपल्या घासातला घास अतिथीला देणाऱ्या भारतीय संस्कृतीनं हा संस्कार आजपर्यंत तरी कसोशीनं पाळला आहे. आपल्या शास्त्रकर्त्यांनी सकाळी काय खायचं, मध्यान्हीच्या जेवणात काय असावं, रात्रीच्या जेवणात काय असावं, यांवर खूप विचार केलेला आढळतो. त्याशिवाय निरनिराळ्या ऋतूंमधला, वयोमानानुसार आहार कसा असावा याचीही एक शिस्त आहे. जेवणाच्या सुरवातीला काय वाढायचं, शेवट कसा करायचा याची पद्धत आहे. आजच्या भाषेत बोलायचं, तर तीन-चार-पाच अगदी ‘सेव्हन कोर्स’ जेवणालाही ही शिस्त आहे. पाश्‍चात्त्य पद्धतीच्या टेबलावर बसून सुरी-काट्यानं जेवणाचेही प्रसंगी कर्मठ वाटावेत, असे नियम आहेत. तिथं भाजी खायचा चमचा करीला चालत नाही, आणि सूप पिण्यासाठी ठेवलेल्या चमच्याला काट्याशी किंवा सुरीशी सलगी करता येत नाही. जेवताना कसं बसावं-पुरुषानं कसं बसावं, महिलेनं कसं बसावं, आळस देऊ नये, गप्पा माराव्यात की मारू नयेत, यजमानांनी अनुमती दिल्यावर मगच जेवायला सुरवात करावी, खाताना तोंडाचा आवाज होऊ नये इथपासून ते ‘भुरका घेतल्याशिवाय आमटीला न्याय मिळत नाही’ या कल्पनेपर्यंत आणि ताटात अन्न टाकू नये ते ताटात काही शिल्लक राहिलं नाही तर ‘जेवणाऱ्याला जेवण कमी पडलं,’ असं समजण्यापर्यंत असंख्य वेगवेगळ्या कल्पना जगभर आढळतात. ‘पोटभर जेवा’ असा यजमानांचा आग्रह असला, तरी किती खावं याचेही काही संकेत आहेत. दुसऱ्याकडं गेल्यावर ‘बहु’भोजन करणं हे समर्थांनी तर मूर्ख लक्षणातच धरलं आहे.  
***
खाद्यसंस्कृतीविषयी बोलताना पाककृतींची पुस्तकं हा विषय नजरेआड करता येणार नाही. पुस्तकं वाचून स्वयंपाक करणाऱ्या सुनांच्या असंख्य ‘सुरस आणि चमत्कारिक गोष्टी’ (त्यांच्या त्यांच्या) सासवांकडून ऐकायला मिळत असल्या, तरी ही पुस्तकं आणि त्या पुस्तकांचं कर्ते यांचे उपकार गृहिणींच्या आणि ‘मास्टर शेफ’ना असणारी मागणी डोळ्यांसमोर ठेवून किंवा आपण म्हणजे घरकामात हातभार लावणारे आधुनिक पती असल्याचा समज असल्यानं किंवा अन्य काही ‘जेन्युईन -इनजेन्युईन’ कारणासाठी स्वयंपाकघरात लुडबूड करणाऱ्यांच्या असंख्य पिढ्या विसरणार नाहीत, हे सत्य उरतंच. आपल्याकडच्या पाककृतींच्या पुस्तकांचा किंवा ‘कूक बुक्‍स’चाही इतिहास मनोरंजक आहे. ‘नलपाकरहस्य’ पुस्तकाचा उल्लेख वरती आलाच आहे. याशिवाय वेदवाङ्‌मयात आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून ते अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आणि मराठीतला पहिला ग्रंथ असणाऱ्या लीळाचरित्रातही त्या काळातले काही पदार्थ कसे बनत होते, याविषयी काही उल्लेख सापडतात; पण अगदी गेल्या शंभर-दोनशे वर्षांचा विचार करायचा, तर पाककृतींना ग्रंथबद्ध करण्याचं श्रेय, भारतीय कलांचा वारसा जपताना त्या कलांच्या संदर्भातलं उत्तम वाङ्‌मय निर्माण करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या तंजावरच्या भोसले घराण्याच्या कलांचे भोक्ते असणाऱ्या वारसांकडं जातं. ग्रंथालयाचं ‘सरस्वती महाल’ असे नामकरण करणाऱ्या या राजघराण्यातल्या दीपांबिका या राणीनं ‘भोजनकुतूहलम्‌’ हा ग्रंथ लिहून घेतल्याचा उल्लेख सापडतो. राजवाड्यातल्या मुदपाकखान्यात शिजणाऱ्या पदार्थांच्या कृतीही ग्रंथबद्ध करण्यात आल्या होत्या. पुढच्या काळात लक्ष्मीबाई धुरंदर यांचं ‘गृहिणीमित्र’ आणि कमलाबाई ओगले यांचं ‘रुचिरा’ हे या ग्रांथिक प्रवासातले महत्त्वाचे टप्पे. अर्थात त्याआधी इंग्रजी आणि अन्य भाषांमधली पाककृतींची पुस्तकं होतीच. अठराव्या शतकाच्या मध्यावर प्रसिद्ध झालेल्या हॅना ग्लासचं ‘द आर्ट ऑफ कुकरी मेड प्लेन अॅन्ड इझी’ हे त्या काळातलं सेलिब्रिटी बुक ठरलेलं पाककृती पुस्तक. या पुस्तकात भारतीय ‘करी’ पहिल्यांदा झळकली, असा उल्लेख मला चिन्मय दामले यांच्या एका लेखात आढळला. प्रकाशकांनी ‘आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या या प्रकारच्या पुस्तकांमधलं सर्वोत्तम पुस्तक’ अशी या पुस्तकाची द्वाही फिरवली आहे. पाककृतींच्या बाबतीत आजपर्यंत कोणी केला नाही असा प्रयत्न आपण करत असल्याचं हॅनानं वाचकांना उद्देशून लिहिलेल्या मजकुराच्या सुरवातीलाच म्हटलं आहे.
वाचकांकडून ‘फडशा’
प्रांतोप्रांतीच्या पाककृतींवर अक्षरशः शेकड्यांनी पुस्तके आहेत. ग्रंथव्यवहारात अग्रेसर असणाऱ्या मित्रांना विचारलं, तर ही पुस्तकं सर्वाधिक खपतात, असं ते सांगतात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेला ‘महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश’ माझ्या संग्रहात आहे. त्याची अनुक्रमणिका वाचतानाच पोट भरून जातं. यात अल्पोपाहाराचे तब्बल ६०३ प्रकार नोंदवले आहेत. अनुक्रमणिकेत पुढं ३३ प्रकारची थालीपीठे, ५७ प्रकारची भजी, ७२ प्रकारचे वडे, शंभर आमट्या, चाळीस उसळी, ४७ खिचड्या आणि शंभर मसाले आहेत. शाकाहारी, मांसाहारी पदार्थ कसे बनवावेत, हे सांगणारी पुस्तकं आहेतच, पण फक्त चटण्यांवरही एक पुस्तक आहे. स्वयंपाक तेल वापरून करा, तेल न वापरता करा, साखर वापरा, वापरू नका, मिरची कोणती बरी असे हजारो प्रश्‍न आणि त्यांना उत्तरं देणारं अक्षरवाङ्‌मय असा हा मामला आहे.  
पुस्तकांप्रमाणंच पाककृतींचे ब्लॉग आणि दूरचित्रवाणी वाहिन्यावरचे कार्यक्रमही आता स्थिरावले आहेत. वाहिन्यांवर पाककलांचे प्रयोग दाखवणाऱ्या असंख्य कार्यक्रमांना जसा उत्तम टीआरपी मिळतो, तसा रेसिपी ब्लॉग चालवणे हाही आता अर्थाजनाचा मार्ग ठरतो आहे. आपल्या पाककृती खवय्यांच्या पसंतीला उतरायला हव्यात, अशी एक किरकोळ अट पाळली म्हणजे झालं.
***
अन्नाचा माणसाच्या जगण्याशी थेट संबंध असतो. सात्त्विक आहार, फास्ट फूड, लहान वयातच मुलांमध्ये बळावणारा स्थूलपणा आणि मधुमेह, अन्नाचा अभाव नसतानाही चुकीच्या आहारामुळं होणारं कुपोषण क्वचित प्रसंगी झीरो फिगरचा अट्टाहास या सगळ्याबद्दल आजकालच्या जगाला काळजी आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यात काय द्यावं, हा अलीकडच्या आयांना सतावणारा यक्षप्रश्‍न आहे. ‘मुलं डबा खात नाहीत, शाळेतून डबा जस्साच्या तस्सा परत येतो,’ अशा तक्रारी सार्वत्रिक आहेत. मग पुन्हा परंपरांना आधुनिक साज चढवण्याचे प्रयत्न होताना दिसतात.
आहारशास्त्र ही वैद्यकाची शाखा आता स्थिरावली आहे. आयुष्याचा वेग बदलतोय. त्यामुळे शारीरिक व्याधींवर उपचार करताना आहार आणि विहाराचा विचार करण्याची गरज आता तज्ज्ञांना वाटू लागली आहे. डॉ. मालती कारवारकर यांनी त्यांच्या ‘अन्नजिज्ञासा’ पुस्तकात व्यक्त केलेलं मत या प्रवासात मला महत्त्वाचं वाटतं. त्या म्हणतात ः वैद्यकतज्ज्ञांनी अधिक खोलात जाऊन आहारशास्त्राचा आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा. त्यामुळं जे शोध लागतील, त्यांचा बोध सामान्य माणसाला करून द्यावा आणि त्यांच्या स्वयंपाकातली लज्जत वाढवायला मदत करावी. शेवटी खाण्यामुळं काय होतं असं म्हटलं, तरी गदा येते ती खाण्यावरच! असं झालं तरच आज आहारशास्त्रावरील लिखाणाला आणि वक्तव्याला जे उथळ स्वरूप आलं आहे ते नाहीसं होईल.
एखादा पदार्थ गावाच्या नावाबरोबर जोडला जातो आणि खाद्यसंस्कृती आणखी पुढं जाते. ‘बेळगावला जाताय अमुक ठिकाणचा कुंदा खायला विसरू नका बरं,’ किंवा ‘आमच्या जळगावचं वांग्याचं भरीत खाऊन बघा,’ किंवा ‘अमुक इथल्या तिसऱ्या खाऊन बघा महाराज,’ अशा फर्माईशी होत राहतात. भौगोलिक परिस्थिती आणि पदार्थांची उपलब्धता यांचा पाककला समृद्ध होण्यात मोठा वाटा असतो. काश्‍मिरात अक्रोडाचा सढळ हातानं वापर होतो आणि किनारपट्टीवर काजूचा. सहसा स्वयंपाकाला गोडं म्हणजे शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं; पण पंजाबात गेलात तर सरसोचं, दक्षिणेत बऱ्याच ठिकाणी नारळाचं तेल वापरलं जातं, तर काही ठिकाणी जवसाचं आणि तिळाचंही!
भारतातल्या प्रत्येक भागात स्थानिक परिस्थिती, तिथं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे पदार्थ, त्या-त्या भागांतल्या परंपरा, समज अशी मिळून खाद्यसंस्कृती घडत जाते. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे.
ही एक अशी कहाणी आहे, की ती कितीही सांगितली तरी साठा उत्तरी संपूर्ण होणं कठीण आहे. हिमनगाचा पाण्याच्या वर दिसणारा भागही हिमालय भासावा अशी ही ‘सुरसयात्रा’ आहे. इथं तर नमनालाच घडाभर तेल पडलं आहे, कारण खरं तर खाद्यसंस्कृतीचं तत्त्वज्ञान  ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...’ या चारच शब्दांत मांडता येईल...
(प्रथम प्रसिद्धी ः ‘सकाळ -सप्तरंग’ - जानेवारी 29, 2017)

Sunday, December 18, 2016

ट्रॅक्‍स अँड साईन्स : 'सिंहाचा वाटा'

भारत हा जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश आहे जिथे बृहतमार्जारकुलातले वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी सापडतात. देशाच्या पश्‍चिम टोकाला जुनागडजवळचा गीर हा सिंहांचा देश आहे. पश्‍चिम घाटांच्या सदाहरित अरण्यांपासून ते मध्य भारतातली, विदर्भातली पानझडींची वने, पश्‍चिम बंगालमधले सुंदरबनाचे पाणथळ प्रदेश ते आसाममधल्या अरण्यांपर्यंत वाघांचा वावर आहे. सिंहांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशांमध्ये वाघ नाही आणि तुर्कस्तानापासून ते बर्फाळ सैबेरियापर्यंत आणि आग्नेय आशियातल्या जावा आणि बाली बेटांमध्ये पसरलेल्या भूप्रदेशात सिंह नाही. भारतातल्या जैवविविधतेचे महत्त्व या एकाच मुद्‌द्‌याने अधोरेखीत व्हावे.
हे आज आठवायचे कारण म्हणजे गीरच्या अभयारण्याभोवतीच्या ईको-सेन्सेटिव्ह झोनचा (पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनाशील भूभाग -ईएसझेड) आकार कमी करण्याच्या प्रस्तावावरून सुरू असलेली चर्चा. गीर हे आशियायी सिंहांचे (शास्त्रीय नावः पॅंथेरा लिओ पर्सिका) शेवटचे वसतीस्थान. या गीर अभयारण्याभोवतीचा सिंहांच्या वावराच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला भूभाग आक्रसत गेला तर त्याचे विपरीत परिणाम होतील, अशी भिती वन्यजीव अभ्यासकांना वाटते आहे. यातून अनर्थ घडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्राण्यापक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या एका मित्राबरोबर अशाच गप्पा मारताना त्यानी केलेलं एक विधान असंच लक्षात राहीलं होतं. प्राण्यांना हद्दी कळत नाहीत, असं तो कुठल्यातरी संदर्भात बोलताना म्हणाला होता. होतं काय, अभयारण्याच्या सीमांना लागून अगदी तस्संच दिसणारं आणि वागणारं रान असतं. फरक असतो तो त्या जमिनीच्या आणि त्यावरच्या झाडांच्या, गवताच्या मालकीचा. अभयारण्यात ती मालकी सरकारची असते, आणि त्यापलीकडे कोणा एका व्यक्तीची, संस्थेची असते. नकाशावर या सीमा छान आखलेल्या पण असतात. प्रश्‍न इतकाच असतो की ज्या प्राण्यांना सुरक्षितपणे वावरता यावं म्हणून नकाशांवर अभयारण्यांच्या सीमा रेखाटल्या जातात त्यांना माणसांची भाषा वाचता येत नाही, पर्यायाने अभयारण्य कुठे संपतं ते त्यांना कळत नाही आणि अभयारण्याला लागून असलेलं अभयारण्यासारखंच रान त्यांना आपल्यासाठी नाही, हेही त्यांना समजत नाही; आणि ते माणसांच्या जमिनीवर "आक्रमण' करतात. अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या वनांना लागून असणाऱ्या जमिनींचा अनिर्बंध "विकास' झाला, माणसांचा वावर वाढला, त्या जमिनी वापरण्याच्या पद्धतीत, तिथल्या पीक पद्धतीत, तिथल्या बांधकामांत, नैसर्गिक स्त्रोतांच्या वापराच्या प्रमाणात आजूबाजूच्या पर्यावरणाशी विसंगत ठरणारे बदल झाले; तर त्याचे परिणाम संरक्षित वनांनाही भोगावे लागतात. अभयारण्यांच्या शेजारच्या जमिनींवरही म्हणून काही निर्बंध असावेत असा विचार स्वीकारला गेला. हा ईएसझेड.
वनांच्या आजूबाजूलाही प्राण्यांचा वावर असतो. काहीवेळा दोन अरण्यांना जोडणारे वनांचे पट्टे असतात. प्राण्यांच्या वावराचा विचार केला तर हे पेट्‌ट्‌ही खूप महत्त्वाचे ठरतात. या सगळ्या जमिनी प्राण्यांच्या भवतालाचा भाग असतो आणि म्हणून तो जपला जावा, असं वन्यजीव अभ्यासकांना वाटतं. गीरच्या संदर्भात अलिकडे आलेल्या बातम्यांनुसार स्थानिक वनखात्याला गीर भोवतालचा ईएसझेड आठ ते अठरा किलोमिटरवरून अवघ्या अर्ध्या किलोमिटवर आणायचाय. त्यामुळे सिंहप्रेमी अभ्यासक अस्वस्थ आहेत. असं घडलं तर गीरच्या परिसरातला सिंहांचा वावर आक्रसेल, असं त्यांचं मत आहे.
गीरच्या सिंहांचाही एक इतिहास आहे. आशियायी सिंहांसाठी काही भूभाग राखून ठेवण्याची मूळ कल्पना भारताच्या इतिहासात ज्याच्या नावासमोर (दडपशाही, हुकूमशाहीतच्या अर्थाने) "शाही' हा शब्द जोडला जातो त्या लॉर्ड कर्झनची. जुनागडच्या महाराजांनी कर्झनच्या कल्पनेनुसार सासण-गीरच्या परिसरात सिंहांच्या शिकारीला बंदी करून जंगलच्या राजाला अभय दिलं. ही घटना विसाव्या शतकाच्या सुरवातीची. त्याकाळात गीर परिसरात ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या बरोबरीने शेकडो सिंहांची शिकार केल्याच्या अनेक नोंदी सापडतात. गीरमध्ये अवघे वीस सिंह उरले आहेत अशी 1913च्या आसपासची एक नोंद मला या संदर्भात वाचताना मिळाली. गीरला अभयारण्याचा दर्जा मिळाला 1965 मध्ये. म्हशी किंवा रेड्यांच्या भक्ष्याचे आमिष दाखवून तिथे "लायन शो' व्हायचे. वीस-बावीस वर्ष ते चालू होते.
सिंहांसाठी माहिती असलेलं गीर आज देशातला जैवविविधतेचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. एका नोंदीनुसार साडेतेवीसशेपेक्षा जास्त लहानमोठे प्राणी, तीनशे जातींचे पक्षी, पस्तीसएक सपरटे आणि दोन हजारांच्या आसपास किटकांच्या प्रजाती आज गीरमध्ये नांदत आहेत. इथे एक मगर प्रजनन केंद्रही आहे.
भारतातली अरण्यं आक्रसत चालली आहेत, असे अनेक अभ्यास दर्शवतात. वनक्षेत्र किती असावं याचे काही निकष आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडीयाने 2013मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशातल्या 21 टक्‍क्‍यांपेक्षा थोडी जास्त जमीन वनांखाली होती. यात वनांखालची सर्वाधिक जमीन होती मिझोराममध्ये. आणि सगळ्यात कमी होती पंजाब आणि हरियानात. त्या आकडेवारीप्रमाणे गुजराथमध्ये जवळपास साडेसात टक्के आणि महाराष्ट्रात साडेसोळा टक्के जमीनी वनांखाली होत्या. गीरच्या सभोवतालचा ईको-सेन्सेटिव्ह झोन कमी करण्याच्या निर्णयाबद्दल वन्यजीव अभ्यासकांच्या मनात असलेल्या भितीला कदाचित ही पार्श्‍वभूमी आहे.
दुसऱ्या एका बातमी नुसार गेल्या काही महिन्यांपासून गीर आणि गिरनार या दोन अभयारण्यांना युनेस्कोची मान्यता मिळावी असे प्रयत्न चालले आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे म्हणे. पाठोपाठ या दोन्ही बातम्या वाचल्यानंतर त्याची संगती लावणं जरा कठीणच आहे. अभयारण्याला लागून असणाऱ्या परिसरातला "विकास' पूरक राहीला नाही तर पर्यटकांना आकर्षित करण्यासारखं काय राहील कोण जाणे.. पर्यटन वाढवून रोजगार निर्माण करून अभयारण्याच्या परिसरातल्या माणसांच्याही जगण्याची दर्जा वाढवण्यात गैर काहीच नाही. पण हे करत असताना ज्या सिंहांसाठी पर्यटकांनी यावं असं आपल्याला वाटतंय त्या सिंहांच्या वाट्याचा विचारही करायला हवा.