पद्मालय सोसायटी, मंडईच्या मागे किंवा पालिकेच्या नोंदीप्रमाणे घर क्रमांक 122, शुक्रवार पेठ, अभ्यंकर वाडा. मध्य पुण्यातल्या असंख्य पत्त्यांपैकी एक असणारा हा पत्ता 1942 च्या "चले जाव' चळवळीतल्या लढवय्या कार्यकर्त्यांसाठी मात्र कायमच महत्त्वाचा राहिला. या अभ्यंकर वाड्यात होता पुण्यातला "मूषक महाल'- चळवळीचे स्फुल्लिंग धगधगत ठेवणारे भूमिगत नभोवाणी केंद्र.
"ऐका ऐका स्वदेशहितरत, नभोवाणी ही स्वतंत्र भारत। सांगा त्यांना स्वर उंचावून, मरणही आम्हा न मारते।।' कवी वसंत बापट यांच्या या स्फूर्तिदायक रचनेने स्वतंत्र भारत नभोवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम सुरू होत. ब्रिटिश सरकारला "छोडो भारत'चा आदेश देणाऱ्या चळवळीचे देशभरातले नेते आणि कार्यकर्त्यांमधील दुवा असणारे नभोवाणी कार्यक्रम या अभ्यंकर वाड्यातल्या तिसऱ्या मजल्यावर पोटमाळावजा खोलीतून प्रसारित होत असत.
"चले जाव' चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे साधन म्हणून उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतून एक भूमिगत नभोवाणी केंद्र सुरू केले. त्यापाठोपाठ युसूफ मेहेरअलींनी पुण्यातूनही असेच एक भूमिगत केंद्र चालवण्याचा विचार मांडला आणि अगदी एका ट्रंकेत मावणाऱ्या छोट्या प्रक्षेपकाच्या साह्याने मराठी मुलखातले मुंबईबाहेरचे हे एकमेव भूमिगत नभोवाणी केंद्र सुरूही झाले. उपलब्ध नोंदीनुसार या नभोवाणी केंद्रासाठी त्या वेळी साडेतीनशे रुपये खर्च आला होता. नंतर गोपाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक झालेल्या ल. ग. देशपांडे यांनी हा प्रक्षेपक बनवला होता. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्य चळवळीत पडलेले ग. प्र. प्रधान, वसंत बापट, पुढे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झालेले वसंत नगरकर, मधुमालती आपटे, दिगंबर पानसे आदी कार्यकर्त्यांचा हे केंद्र चालवण्यात पुढाकार होता.
स्वतंत्र भारतातील आकाशवाणीचे पुणे केंद्र सुरू होण्याच्या तब्बल दहा वर्षे आधी पुण्यातून "चले जाव' चळवळीची बुलेटिन प्रक्षेपित करणारे हे नभोवाणी केंद्र द्विभाषिक होते. मराठीतील भाषणे आणि गाण्यांबरोबरच जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अरुणा असफअली अशा नेत्यांची हिंदीतील भाषणे या नभोवाणीवरून वाचली जायची. साने गुरुजींनी लिहिलेल्या "क्रांतीच्या मार्गावर' या छोटेखानी पुस्तकाचे वाचनही या भूमिगत केंद्रावरून होत असे. चळवळीतल्या बिनीच्या नेत्यांची भाषणेही या केंद्रावरून प्रक्षेपित होत असत.
नभोवाणी केंद्राशी संबंधित कार्यकर्त्यांचा वावर टोपणनावांनी होत असे. ""मी बनायचो शरद सप्रे आणि नगरकर असायचे दामले,'' अशी आठवण वसंत बापट यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. ब्रिटिश पोलिसांना या भूमिगत नभोवाणी केंद्राबद्दल कुणकूण लागली होती. लष्कर भागात ब्रिटिश सैनिकांचा राबता असणाऱ्या कॅपिटल चित्रपटगृहात भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांनी 24 जानेवारी 1943 रोजी बॉंबस्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर पुण्यातल्या भूमिगत नभोवाणी केंद्राशी संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आणि हे केंद्र बंद पडले. पुढे एका कार्यकर्त्याची डायरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्रिटिश सरकारला पुण्यातल्या या भूमिगत नभोवाणी केंद्राबाबत अनेक बाबी माहिती झाल्या.
अभ्यंकर वाड्याची आणखी एक आठवण म्हणजे नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या गाण्याला ऑर्गनवर साथ करणारे हरिभाऊ देशपांडे याच वाड्यात वास्तव्याला होते.
स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत पुणे शहर विस्तारले, बदलत गेले. स्वातंत्र्य लढ्याशी नाते सांगणारी शहरातील अनेक ठिकाणे विस्मृतीच्या पडद्याआड गेली. अभ्यंकर वाड्याचेही स्वरूप बदलून गेले आहे. मात्र, परिसरातल्या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारामुळे अभ्यंकर वाड्यातल्या या भूमिगत नभोवाणी केंद्राची आठवण आजही पद्मालय सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ माहितीफलकाच्या स्वरूपात जागी आहे.
(प्रथम प्रसिद्धीः सकाळ, पुणे. सोमवार दि. ९ ऑगस्ट २०१०)