Wednesday, September 18, 2024

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्सः ग्रीष्म फुलताना...

माझ्या ऑफिसच्या वाटेवर एक ताम्हण उभी आहे. दरवर्षी त्या झाडाचं अस्तित्व मला नव्यानं जाणवतं. एरवी वर्षभर अगदी रोज जातायेताना ते झाड तसं नजरेत येत नाही. पण उन्हं तापायला लागली, की अचानक ती ताम्हण उमलून येते. फांद्यांच्या टोकांवर सुरेख जांभळ्या रंगाचे तुरे दिसायला लागतात; आख्खं झाड जणू बोलायला लागलेलं असतं. आणि हे उमलणंही कसं -जादूची कांडी फिरवल्यासारखं, म्हणजे कालपर्यंत माझं तिच्याकडे लक्षच गेलेलं नसतं, काही म्हणजे काहीच जाणवलेलं नसतं आणि एकदम एखाद्या दुपारी लक्षात येतं, की ताम्हण फुललीय, अंगभर फुलांचे तुरे लेवून ती उभी आहे.
या झाडाशी माझं एक चमत्कारिक नातं आहे, असं मला प्रत्येकवेळी जाणवतं. ही ताम्हण फुललेली पाहिली, की का कोण जाणे पण माझ्या मनात खोल कुठेतरी "सगळं काही छान आहे..." अशी एक भावना लहरून जाते, अत्यंत शुष्क, कोरड्या उन्हाळ्यात क्षणभर दिलासा देऊन जाणाऱ्या अनामिक गारव्यासारखी!
ग्रीष्माचं सौंदर्य आगळंच. उन्हं तापायला लागतात तसा चैत्रातला नव्या पालवीचा कोवळेपणा नजरेआड व्हायला लागलेला असतो. चढत जाणाऱ्या ग्रीष्माबरोबर दूर रानावनातच नव्हे तर अगदी आपल्या आजूबाजूला, अंगणात, रस्त्याकडेला, आपल्याला वेढून टाकत रस-रंग-गंधाची उधळण सुरू झालेली असते. बघणाऱ्याची नजरबंदी करणारा पुष्पोत्सव ही ग्रीष्माची खासियत. गुलमोहर, नीलमोहर, स्पॅथोडिया किंवा आफ्रिकन ट्युलिप, बहावा, पळस, ताम्हण, शिरीष, पांगारा, काटेसावर, कांचन, आईन, चाफा, मोगरा, निशिगंध, मधुमालती, रातराणी, सायली, जाई, जुई, बोगनवेल, गोल्डन बेल (टॅबुबिया), ग्लिरिसिडीया, रेन ट्री, सिल्व्हर ओक, पेल्टोफोरम आणि आणखी कितीतरी आपलाआपला पुष्पसंभार सांभाळत अंगाची लाही करणाऱ्या ग्रीष्माला पंचेंद्रियांना सुखावणारी किनार जोडत असतात.
ग्रीष्माच्या या सौंदर्याने कधी झपाटलं कोण जाणे... हा पुष्पोत्सव वसंतातला की ग्रीष्मातला, असा एक प्रश्‍न नेहमी पडतो. वैशाखातला हा सगळा रंगोत्सव सरत्या वसंतातला, असा साधारणतः आपला समज असतो. पण, वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. श्री.द. महाजन सरांनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे, संस्कृत साहित्यातून घेतलेली चैत्र-वैशाख वसंत ऋतू हीच कल्पना चुकीची आहे. उत्तर भारतात लिहिल्या गेलेल्या संस्कृत साहित्यातील ऋतुचक्र दक्षिण भारतात, महाराष्ट्रात चुकत जातं. ऋतू पृथ्वी आणि सूर्य यांच्या परस्पर संबंधांवर आधारित आहेत आणि आपले मराठी महिने हे चांद्रमास आहेत. त्यामुळे आपल्याकडे फेब्रुवारी ते एप्रिल वसंत ऋतू आणि एप्रिल ते जून ग्रीष्म ऋतू हेच योग्य आहे, असं महाजन सर लिहितात.
ऋग्वेदात ऋतूचा 'हंगाम' या अर्थी उल्लेख आहे, आणि वसंत, ग्रीष्म व शरद या तीनच ऋतूंचा उल्लेख आहे, अशी नोंद विश्‍वकोशातही आहे. आर्य पूर्वेकडे जात असताना ऋतूंची संख्या पाच झाली असावी. हेमंत आणि शिशिराचाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. तैतिरीयसंहितेत मात्र सहा ऋतूंचा उल्लेख आढळतो, असंही ही नोंद पुढे सांगते.
तर, ग्रीष्माच्या या सौंदर्याने कधी झपाटले कोण जाणे... बहुधा हे वारं कोकणातलं. ऐन उन्हाळ्यात कोकणात झालेल्या एका फेरीत डोंगरउतारांवर फुललेला पळस सारखा खुणावत होता. तापल्या उन्हात कोकणात कोसळणाऱ्या त्या सह्याद्रीच्या रांगावरच्या पिवळ्या, तपकिरी, काळसर हिरव्या गर्दीत झळाळता केशरी रंग अचानक एका वळणावर डोळ्यात भरला. मग पुढच्या प्रवासात पेटलेल्या पलित्यांसारख्या त्या केशरी पुंजक्‍यांनी पाठच धरली, सुटता सुटेचना... गाडीत बसल्याबसल्या, ती फुलं कसली असतील यावर विचार करण्याखेरीज करायला दुसरं काहीच नव्हतं. (त्यावेळी मोबाईल फोन हे 'श्रीमंती चोचले' होते; आणि इंटरनेट असं गावगन्ना पसरलेलं नव्हतं. माझ्या माहितीतलं इंटरनेटचं एकमेव कनेक्‍शन ही माझ्या त्यावेळच्या साहेबांची मिरासदारी होती, कारण ते त्यांच्या टेबलावरच्या कॉम्प्युटरला होतं.) अस्वस्थावस्थेच स्वतःलाच विचारल्यासारखं गाडीच्या चक्रधराला विचारलं, 'कसली फुलं ती?' तोही पुणेकरच... 'माहीत' आणि 'नाही', हे दोन शब्द संपूर्ण शब्दकोशात कुठेही एकत्र आलेले नाहीत याची खात्री करून मगच शब्दकोश विकत घेणारं शहर हे... त्यानी गाडी चालवता चालवताच "कोणती हो" करत इकडेतिकडे पाहिलं. "ती लाल-शेंदरी.. तीऽऽऽऽ तिकडे दिसतायत ती..." करत मी चक्रधराला फुलं दाखवली... म्हणजे मी दाखवली असा माझा समज आहे. "हां, ती होय... ती गुलमोहराची एक जात असतीय." पुढचा प्रवासभर मी गप्प!
कोकणात ज्यांना भेटायचं होतं त्यांच्या घरी गेल्यावर पत्ता लागला.. "तो पळस, चिक्कार फुलतो या दिवसात".
तो एक चाळाच झाला. पुढच्या काही प्रवासांत, सकाळी उठून कॉमन ट्रीज्‌पासून ते बीएनएसएसच्या द बुक ऑफ इंडियन ट्रीज्‌ आणि भारतातल्या झाडांवरची इतर पुस्तके वाचल्याशिवाय म्हणजे आपला दिवसच मावळत नसल्याच्या थाटात लोकांना मी पळस दाखवू लागलो. उत्साहाच्या भरात एकदोनदा मी शेवरी आणि काटेसावरही पळस म्हणून दाखवली. मग कधीतरी खराखरा झाडतज्ज्ञ असलेल्या एका मित्रानं मला त्या सगळ्यातला फरक समजावून सांगितला. (इन्सिडन्टली, द बुक ऑफ इंडियन ट्रीज्‌च्या कव्हरवर फुललेल्या पळसाचा सुंदर फोटो आहे.)
पुढे पळसाची ओळख आणखी घट्ट झाली. 'कशासाठी पोटासाठी...' करत आगगाडी खंडाळ्याचा घाट उतरत असताना कर्जतच्या अलीकडे पळसदरी नावाचं एक छोटं स्टेशन आहे. माझ्या आजीच्या बोलण्यात या परिसराचा उल्लेख बऱ्याचदा असायचा. तिच्या सासरी- माहेरी पत्रावळ्या लावण्यासाठी पळसाची पानं तिथून यायची म्हणे. (गम्मत म्हणजे माझी आजी पळस्प्याची.) पळसाशी ओळख झाल्यावर एका मुंबई प्रवासात हा संदर्भ पुन्हा अधोरेखित झाला. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावर आणि चिंचवडला जुन्या पुणे-मुंबई हायवेवर, असे दोन एकुटवाणे उभे असलेले पळसही चांगले परिचयाचे झाले होते. ते फुलल्यावर एक-दोघा मित्रांना आवर्जून नेऊन पळस दाखवल्याचंही आठवतंय.
'या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे...' अशी रसरशीत निसर्गकविता लिहिणाऱ्या ना.धों. महानोरांचे गावही पळसखेडे असावे हा निव्वळ योगायोग नसावा, असंही कुणीतरी व्यक्त केलेलं मत वाचल्याचंही आठवतंय.
खूप वर्षांपूर्वी अमरावतीला जाताना बडनेऱ्याच्या अलीकडे लाल फुलांनी डवरलेली कितीतरी झाडं खूप वेळ सोबत करीत होती. या फुलांपासून कुंकू बनवतात म्हणून ही कुंकवाची झाडं, अशी माहिती बरोबर प्रवास करणाऱ्या पत्रकार मित्राकडून मिळाली. आत्ता परवा पुन्हा विदर्भातल्या एका जाणकार मित्राकडे कुंकवाच्या झाडांची चौकशी केली तर त्यानी अशी झाडंच नसतात असं छातीठोकपणे सांगितलं. वर, 'जरा नीट आठवून बघ', असा सल्लाही दिला. नंतर विश्‍वकोशात पळस शोधताना कुंकुम वृक्ष सापडला, पण त्याच्या फुलांपासून कुंकू करतात की नाही कोण जाणे. पळसाच्या फुलांपासून मात्र रंग तयार करतात.
वैदिक काळापासून पळस जगण्याशी, त्यातल्या काही रूढी-परंपरांशी जोडला गेला आहे. वैदिक वाङ्‌मयापासून ते उत्तररामचरित, ऋतुसंहार, गीतगोविंद आणि इतरही प्राचीन संस्कृत साहित्यात पळसाचे अनेक संदर्भ आढळतात. लालभडक पलाशपुष्पे बुद्धाला वंदन करणाऱ्या भिक्षुसंघासारखी दिसत असल्याचा उल्लेख हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत आहे. आणखी एका गाथेत अरण्यात पेटलेला वणव्याला फुललेला पळस समजल्याने अडचणीत सापडलेल्या हरणाचा उल्लेख आहे. पुराणकथांनुसार, शंकराने शापलेला अग्नी म्हणजे पळस. रानाला वणवा लागल्याचा भास उत्पन्न करणाऱ्या फुललेल्या पळसाचं वर्णन इंग्रजीतही 'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट' असंच करतात. पोपटाच्या चोचीसारख्या किंवा मुंगसाच्या कानांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी लगडणारा त्रिपर्णी पळस अस्सल भारतीय असल्याचे वनस्पती अभ्यासक सांगतात. फुललेल्या पळसावर असंख्य पक्षी येतात, असंही पक्षिप्रेमी मित्रांकडून ऐकलंय.
काटेसावर किंवा शाल्मलीची लाल फुलंही अशीच मोहात पाडणारी.
कोकणातल्या डोंगर उतारांवरचा पळस जसा मोहवतो तशीच खुणावते देशावरच्या लांबचलांब माळरानांवर टपोरी पिवळी फुलं घेऊन उभी राहणारी वेडी बाभूळ. दुपार अंगावर घेत फलटण, माण भागातून प्रवास करताना अवचित अशी फुललेली बाभूळ भेटून जाते. एरवी शहरी माणसाशी तिचं नातं म्हणजे फक्त वेळीअवेळी पायात मोडणाऱ्या काट्यांशी जोडलेलं. ऋतुचक्रतला 'चैत्रसखा वैशाख' लिहिताना दुर्गा भागवत म्हणतात -"दख्खनच्या माळरानातली ती काही खुरटी, काही मोठी बाभळीची झाडे बहरून गेलेली पाहिली की, 'वद जादुगारिणी तेव्हा मारलीस फुंकर कसली! ओसाड माळ हा सारा पुष्पांनी भरुनी गेला' या रेंदाळकरांच्या पद्यपंक्ती माझ्या मनात घुमू लागतात. ते प्रेमगीत आहे हे मी विसरते. जणू काही माळरानच प्रफुल्ल बाभळीला उद्देशून हे उद्‌गार काढीत आहेस वाटते."
खरंतर हा सगळा ग्रीष्मोत्सवच मोहवून टाकणारा. त्या ताम्हिणीसारखंच माझं नातं जुळलंय रोजच्या रस्त्यावरच्या बहाव्याशी. असाच एक टॅबुबिया -गोल्डन बेल -होता चतुःश्रुंगीच्या रस्त्यावर. त्याचा तो फुलून येणारा झळाळता सोनेरी पुष्पसंभार लांबूनच लक्ष वेधून घ्यायचा. आता तो रस्ता मोठा झालाय आणि टॅबुबिया नाहिये तिथे बहुधा, असलाच तर फुलत नाही आता तो पूर्वीसारखा.
बहावा अंगभर फुलं ल्यायला सुरवात करतो ना तीही पाहण्यासारखी असते. उन्हं तापायला सुरवात झाली, की बहावा फुलायला लागतो. फुलांचे ते लटकते हार दिसायला सुरवात होते. हार वाढत जातात आणि एकदिवस एकदम ते झाड सोन्याची झळाळी घेऊन सामोरं येतं. भुईतनं उगवलेल्या त्या सुवर्णवृक्षावर नावालाही हिरवा रंग उरलेला नसतो. बहाव्याच्या फुलांना वास नाही, पण त्यांची ती झळाळी तापल्या उन्हातही सुखावून जाते. "बहाव्याच्या फुलांच्या सौंदर्याची मला अपार आसक्ती वाटते... त्यांचे घोस झाडावर लोंबताना पाहिले, की निसर्गाच्या पिवळ्या रंगाचा सारा मुलायमपणा त्या झाडावर साकार झाल्यासारखा वाटतो...,' असं दुर्गा भागवत ऋतुचक्रमध्ये म्हणतात. असा वेड लागल्यासारखा फुललेल्या ऋग्वेदातल्या या राजवृक्षाला पाहताक्षणी दाद गेली नाही तर पाहणाऱ्याला काही दिसलंच नाही, असं खुशाल समजावं.
बहावा बहरला, की दीडएक महिन्यात पाऊस येतो अशी एक पारंपरिक समजूत आहे. पण हल्लीचा पाऊस बहाव्याचं ऐकतोच असं नाही!
गदिमांचं एक छान गाणं आहे. कुठल्यातरी सिनेमासाठी त्यांनी मुळात ते लिहिलं; पण त्या सिनेमावाल्यांनी ते घेतलंच नाही. नंतर खूप वर्षांनी दुसऱ्याच एका सिनेमात घेतलं ते, अशी काहीतरी गोष्ट आहे त्या गाण्याची. गाणं असं आहे, 'हळूवार नखलिले फूल। त्यातून उसळली भूल।। मी वेडी जाणत नव्हते। ते फूल अफूचे होते।।'  ग्रीष्मातलं प्रत्येक फूल हे असं 'अफू'चं असतं. त्यांच्या रंगांतून, गंधातून आसमंताला भुरळ घालणारी भूल उसळत असते.
मणीभवन म्हणजे एकेकाळचं महात्मा गांधींचं मुंबईतलं निवासस्थान. गावदेवी भागात हे मणीभवन ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्याचं नाव आहे लॅबर्नम रोड. आज त्या रस्त्यावर बहाव्याऐवजी पेल्टोफोरमची पिवळ्या रंगाच्या आणखी एका जातकुळीशी नातं सांगणाऱ्या फुलांची झाडं उभी आहेत. पण त्या रस्त्याने राष्ट्रपित्याबरोबरच आरग्वधाची -अमलताश, गोल्डन शॉवर, बहाव्याचीही -आठवण जपलीय.
उन्हाळाभर साथ देणारा आणखी एक सोबती म्हणजे गुलमोहर. लाल चुटूक ते पिवळसर केशरी रंगापर्यंतच्या अनेक छटांच्या फुलांची छत्री घेऊन गुलमोहर उभा असतो -रस्त्याकडेला, बागांमध्ये, टेकड्या चढणाऱ्या पायवाटांवर, क्वचित एखाद्या माळरानावर एकुटवाणा.
अगदी सवयीचा झालेला गुलमोहर मूळचा मादागास्कर मधला (तेच न्यू यॉर्कमधल्या सेंट्रल पार्क झूमधून थेट आफ्रिकेत पाठवलेल्या ॲलेक्‍स सिंह, मार्टी झेब्रा, मेलमन जिराफ आणि ग्लोरिया हिप्पोच्या सिनेमातलं मादागास्कर). ब्रिटिश आणि पोर्तुगीजांबरोबर तो आधी मॉरिशसमध्ये आला, आणि तिथून थेट मुंबईत. गुलमोहर फुलल्याची भारतातली पहिली नोंद आहे मुंबईच्या शिवडीतली, १८४०मधली.
बहाव्याच्याच कुळातला गुलमोहर पहिल्यांदा भेटला तो लहान शाळेत -म्हणजे आजच्या भाषेत प्राथमिक शाळेत. (कागदोपत्री आमची शाळा प्राथमिक आणि माध्यमिक असली तरी बोली मराठीत ती लहान नूमवि आणि मोठी नूमवि अशीच होती. आज हे उल्लेख जास्त जिव्हाळ्याचे वाटतात.) फुलांच्या पाकळ्या आणि त्यातल्या नख्यांच्या अंगठ्या करणं हा त्यावेळचा एक खेळ होता. आणि फुलातलं पुंकेसर दाताखाली चावलं की एक हलकीशी आंबट चव लागायची.
वीस-बावीस वर्षांपूर्वी पुणे -कोल्हापूर रस्त्यावरचे बरेचसे गुलमोहर ओळखीचे झाले होते. प्रत्येक झाड पाहताना आपण घराच्या किती जवळ आलोय याचा हिशेब नकळत व्हायचा.
***

महाराष्ट्राचं राज्यफूल असणारी 'प्राइड ऑफ इंडिया' ताम्हण किंवा जारूल, तो पिवळाजर्द बहावा, गुलमोहराची ती लाल छत्री, दूरवर जंगलात कुठेतरी फुललेला पळस, मुक्तहस्तानी धुंद करणारा; सुगंध वाटणारा मोगरा, रातराणी, मधुमालती किंवा अगदी निर्गंध बोगनवेल या सगळ्या ग्रीष्मसख्यांनी मला एक निष्काम कर्मयोग शिकवला, असं मला नेहमी वाटतं.
हिंदी कवी नीरज यांची एक रचना आहे -
नंगी हरेक शाख, हरेक फूल है यतीम, फिर भी पलाश सुखी है इस तेज धूप में।
कोणी पाहो, न पाहो, कोणी कौतुक करो न करो; आपण जिथे उभे आहोत तिथे आपली वेळ आली की आपण फुलायचं, जे आपल्याजवळ आहे ते दोन्ही हातांनी मुक्तपणे उधळायचं, निसर्गातलं आपलं काम आपण करायचं. आणि ते ही वेळेवर...
कळतं... पण दर वेळेला वळतंच असं नाही!

Tuesday, September 17, 2024

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्सः आभाळ पाठीवर घेणारे हत्ती


रानटी हत्तीचा माझा पहिला अनुभव 'दृक'पेक्षा 'श्राव्य' अधिक आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी दांडेलीच्या जंगलात मी पहिल्यांदा हत्ती 'ऐकला'. रानावर प्रेम करणाऱ्यांसाठी, पक्षी पाहण्यात रस असणाऱ्यांसाठी दांडेली हा स्वर्ग आहे. दांडेलीपासून दहाबारा किलोमीटरवर कुळगी नावाच्या गावात एक कॅम्पसाइट आहे. सातआठ तंबूनिवास, एक खुलं सभागृह, एक नेचर इंटरप्रिटेशन सेंटर -तिथे वन्यप्राण्यांवरच्या काही उत्तम चित्रफिती पहाण्याची सोयही आहे. अलिकडे ही कॅम्पसाइट आणखी अपग्रेड झालीय, तंबू एसी झालेत वगैरे.
रान, रानातल्या वाटा, दिवसाच्या प्रत्येक बदलत्या प्रहरागणिक नवं रूप धारण करणारं रान अनुभवायचं असेल तर दांडेलीइतकी उत्तम जागा नाही. घनदाट हिरवाईत स्वतःला लपेटून घ्यायचं आणि कुळगीच्या कॅम्पसाइटला दिवसभर नुसतं बसून राहायचं. फारशी हालचाल न करता एक चेकलिस्टभर पक्षी सहज अनुभवता येतात. उंचच उंच वारूळे, लाल मुंग्यांची घरटी, नाजूकपणे विणलेली जायंट वुड स्पायडरची जाळी, मधूनच एखादा सिग्नेचर स्पायडर अशा मंडळींची ओळख करून घेत थोडी पायपीट करायची तयारी असेल, तर काही प्राणीही नजरेस पडू शकतात. आणि तुमचं 'टायगर लक' जोरावर असेल तर या जंगलात एखादा खराखुरा ब्लॅक पॅंथरही दर्शन देऊन जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; किंवा नाकावर भलं थोरलं पिवळं शिंग घेऊन उडणारा मलबार हॉर्नबिलसुद्धा.
कोल्हापूरातले माझे मित्र सुनील करकरे गेली कित्येक वर्षे निसर्गात रस असणाऱ्या मंडळींना घेऊन वेगवेगळ्या अभयारण्यात जातात; त्यांना प्राण्यांविषयी, निसर्गाविषयी सांगतात... सजग करतात. रान वाचायला शिकवतात. रानाचे, प्राण्यांचे फोटो काढतात. त्यांच्याबरोबर पहिल्यांदा दांडेलीला गेलो तेव्हा ते डब्ल्यूडब्ल्यूएफबरोबर काम करत होते. कुळगीच्या या कॅम्पसाइटच्याजवळ एक छोटेसे वॉटरहोल होतं. अजूनही असेल. अगदी चित्रातल्यासारखं. चारही बाजूंनी घनदाट रानानी वेढलेलं. तिथे एक मचाण होतं. पहिल्याच दिवशी संध्याकाळी एकदोन तासांसाठी आम्ही त्या मचाणावर डेरा जमवला होता.
जंगलात ऐकू येणारे आवाज, आजूबाजूला होणारी अगदी छोटीशीही खसफस, दिवस मावळताना पाण्यावर येणारे प्राणी, मधूनच त्या गचपणातून सूर मारल्यासारखे उडणारे पक्षी (माणसाच्या आजूबाजूला दिसणारे खंड्या वगैरेंसारखे काही ठळक अपवाद वगळले तर रानातल्या पक्ष्यांची ओळख व्हायला आताशा सुरुवात झाली होती), त्यांच्या सवयी आणि त्यातून उलगडत जाणारं सभोवतालचं रान अशा सगळ्याबद्दल सुनीलनं कायकाय सांगितलं होतं त्या सगळ्याची मनोमन उजळणी करत आम्ही कुळगीच्या त्या मचाणावर बसलो होतो. इतका वेळ मचाणावर बसण्याचा तसा हा पहिलाच अनुभव. आणि समोर काही म्हणजे काहीच घडत नव्हतं. चित्रातल्या सारखा दिसणारा तो जलाशय चित्रातल्यासारखाच स्तब्ध होता. लांबवरच्या सुपा धरणाच्या मागच्या डोंगरांत सूर्य मावळत होता तशी आल्या वाटेने कॅम्पसाइट गाठायची वेळ जवळ येत चालली होती.
अचानक आजूबाजूला प्रचंड कोलाहल सुरू झाला. झाडांतून प्रचंड हालचालीचे, बांबू मोडल्याचे आवाज यायला लागले. 'हत्ती...', कोणीतरी कुजबुजलं. अंगभर एक शिरशिरी येऊन गेली. गडद होत जाणाऱ्या अंधारातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाबरोबर डोळे ताणताणून शोधण्याचा प्रयत्न केला. दिसलं काहीच नाही. खूपवेळ नुसतेच आवाज ऐकून आम्ही कॅम्पसाइटला परत आलो. मग पुष्कळशी प्रश्‍नोत्तरे, हत्तींबद्दल.
नंतर आणखी तीनचारवेळा दांडेलीत जाणं झालं. हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दांडेलीत हत्तींच्या वावराच्या खाणाखुणा खूप दिसल्या -त्यांच्या पाऊलखुणा, साली खाण्यासाठी सोललेली झाडं, दांडेलीत भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून विशेषतः हत्तींपासून उभ्या पिकाचं रक्षण करण्याकरता उभी केलेली, सौरउर्जा खेळवलेली कुंपणं, आणखी खूप काही. पण दांडेलीत मला हत्ती प्रत्यक्ष कधी पहायला मिळाला नाही. तो पाहिला नंतर खूप वर्षांनी बांदीपूरमध्ये.
***
असंख्य समजुतींमधून, प्रतिकांमधून, चित्रांतून, शिल्पांमधून, काव्ये, पुराणे, गाणी, लोककथा, चालीरिती, परंपरा या सगळ्यांतून गेली हजारो वर्षं हत्ती आपल्या आजूबाजूला वावरतो आहे. भारताबाहेरही श्रीलंका, इंडोनेशिया, जावा बेटांपर्यंत पोचलेला, अग्रपूजेचा मान असलेला आपला बुद्धिदाता श्री गजानन 'गजवदन'च आहे. हत्तीचे आणि माणसाचे संबंध कायमच गुंतागुंतीचे राहिले आहेत. हजारो वर्षांपासून माणसाच्या सान्निध्यात राहिलेल्या, युद्धांपासून ते अनेक अवजड कामांत माणसाला साथ देणाऱ्या, माणसाच्या ऐश्‍वर्यांचं आणि सत्तेचं प्रतिक असणाऱ्या हत्तींचा सगळ्यात मोठा शत्रू माणूसच आहे.
कोट्यवधी वर्षांपूर्वी सशाच्या आकाराच्या मॅरिथेरियमपासून आजच्या हत्तींचा प्रवास सुरू झाला असं शास्त्रज्ञ सांगतात. गजकुळाच्या कधीकाळी तीनएकशे शाखा असाव्यात. एकेकाळी हत्ती जगभर पसरलेले होते, असे आजवरच्या संशोनातून दिसून आले आहे. उत्क्रांतीच्या खेळात आता फक्त आफ्रिकेतले लोक्‍झोडोन्ता आफ्रिकाना आणि आशियातले एलीफस मॅक्‍झिमस ही दोनच कुळे उरली आहेत. आफ्रिकी हत्ती मुख्यतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे मध्य आणि पश्‍चिम आफ्रिकेत आढळतात तर पाकिस्तान सोडून दक्षिण आणि आग्नेय आशियातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये हत्ती आढळतात. आशियायी हत्तींच्या तीन उपजाती आहेत. एलीफस मॅक्‍झिमस इंडिकस म्हणजे भारतीय हत्ती, सुमात्रा आणि आजूबाजूच्या प्रदेशातले एलीफस मॅक्‍झिमस सुमात्रन आणि श्रीलंकेत सापडणारे एलीफस मॅक्‍झिमस मॅक्‍झिमस. जमिनीवर रहाणारा हा सगळ्यात मोठा प्राणी आहे. ताकद आणि वजनाचा विचार केला तर खोल समुद्रात रहाणारे काही देवमासे आणि उंचीचा विचार करता जिराफ एवढेच प्राणी काय ते हत्तीपेक्षा मोठे आहेत.
रामायणात, महाभारतात कालीदास -भवभूतींच्या वाङ्‌मयात, अन्य लिखाणात हत्तींचे अनेक उल्लेख आहेत. राज्याभिषेक, विवाहादी प्रसंगांमध्ये, युद्धांत, महाभारतातल्या द्युतात शृंगारलेल्या हत्तींचे, हस्तिदंताने मढवलेल्या सिंहासनांचे, दागिन्यांचे उल्लेख येतात. भारतीय युद्धात, दुर्योधनाने केलेल्या निर्भत्सनेमुळे संतापून पांडवांवर तुटून पडलेल्या द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडले गेले, त्या प्रसंगातला हत्तीचा उल्लेख मानवी स्वभावाचे ताणेबाणे दाखवणारा एक भाषिक अलंकारच झाला. नरो वा कुंजरो वा... पराक्रम गाजवणाऱ्या द्रोणाचार्यांना रोखण्यासाठी 'शस्त्र न धरी करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' म्हणणाऱ्या श्रीकृष्णाने भीमाकडून अश्‍वत्थामा नावाचा एक हत्ती मारवला. द्रोणपुत्र अश्‍वत्थामा मारला गेल्याचे कर्णोपकर्णी सैन्यात पसरले. बातमीची शहानिशा करण्यासाठी द्रोणाने असत्य कथन न करणाऱ्या धर्मराजाला विचारले. आचार्यांच्या प्रश्‍नाला ज्येष्ठ पांडवाने उत्तर दिले, अश्‍वत्थामा हतः। नरो वा कुंजरो वा। अश्‍वत्थामा मारला गेला, माणूस की हत्ती ते माहिती नाही. कृष्णाच्या योजनेप्रमाणे 'अश्‍वत्थामा हतः' इतक्‍याच उद्‌गारांनंतर सुरू झालेल्या शंखनादात 'नरो वा कुंजरो वा' हरवून गेलं; पुत्रवियोगाच्या दुःखाने द्रोणांनी धनुष्य खाली ठेवले आणि धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. भारतीय युद्धाला आणखी एक वळण देणारा हा प्रसंग. असत्य किंवा संदिग्ध कथनाच्या पापाकरता धर्मराजाला काही क्षणांसाठी का होईना पण नरकाचे दर्शन होते अशी कथा पुढे महाभारतात येते. संदिग्ध कथनातला हा हत्ती तिथून थेट भाषेत स्थिरावला.
युद्धांमध्ये हत्तींच्या वापराचे उल्लेख जगभर सापडतात. सव्वाबावीसशे वर्षांपूर्वी मध्य आशियातल्या एका महायुद्धात चौथ्या टॉलेमीनी आशियायी हत्ती वापरल्याची नोंद आहे. जग जिंकायला बाहेर पडलेल्या सिकंदराची घोडदौड रोखणाऱ्या राजा पौरसाच्या सैन्यातल्या हत्तींची गोष्ट सर्वश्रुत आहेच.
चालुक्‍य वंशातील राजा सोमेश्‍वर याच्या मानसोल्लास ग्रंथात गजदलाची प्रशंसा केलेली आहे, असा उल्लेख बाळ सामंत यांच्या गजराज या हत्तींवरच्या पुस्तकात मिळाला.
राजा सोमेश्‍वर लिहितो -
वारणै र्भटूजातीर्य कालिङ्‌गवन जान्मिथी ।
शिसितैः सज्जितेः शूरर्लभ्यते विजयो युधी ।।
मुख्यं दन्तिबल राज्ञां समरे विजर्यषिणाय।
तस्मान्निजबले कार्या बाहतो वारणोत्तमा ।।
कलिंगवनात जन्मलेल्या, उत्तम जातीच्या, सुशिक्षित व सुसज्ज अशा शूर हत्तींच्या साहाय्याने युद्धात विजय प्राप्त होतो. युद्धात विजयाची आकांक्षा असणाऱ्या राजांच्या सैन्यात गजदल मुख्य असते. म्हणून त्यांनी स्वतःच्या सैन्यात पुष्कळ उत्तम हत्ती ठेवावेत.
तरीही हत्ती आणि माणसामधलं अगदी पौराणिक काळापासूनचं नातं चमत्कारीकच आहे. हत्तींच्या अचाट ताकदीचा उपयोग माणसानी करून घेतला. कांस्ययुगापासून हत्तींकडून कामं करवून घेणाऱ्या माणसांचे संदर्भ सापडतात. पण श्‍वानांसारखा किंवा घोड्यांसारखा हत्ती पूर्णपणे कधीच माणसाळला नाही. त्या अर्थानी हत्ती आणि माणसात कायमच एक अंतर राहिलं.
***
सोंड हे हत्तीचं वैशिष्ट्य. आफ्रिकी आणि आशियाई हत्तींच्या सोंडेच्या टोकावळच्या रचनेत थोडा फरक असतो. लोक्‍झोडोन्ता आफ्रिकानामध्ये सोंडेच्या टोकावर बोटांसारख्या दोन मांसल रचना असतात आणि एलीफस मॅक्‍झिमसच्या सोंडेच्या टोकावर अशी एकच रचना असते. सोंडेच्या या टोकानी हत्ती अगदी टाचणी एवढी बारीक वस्तूही उचलू शकतो असे प्राणिशास्त्रज्ञ सांगतात. चाळीस हजार स्नायू एकत्र मिळून हत्तीची सोंड बनते. माणसाशी तुलना करायची तर माणसाच्या आख्ख्या शरिरात सहाशेपेक्षा थोडे जास्त स्नायू असतात. हत्ती सोंडेनी श्वास घेतो, आजूबाजूच्या अन्य गंधांचं ज्ञान त्याला सोंडेमुळे होतं. सोंडेनी तो पाणी पितो, मातीचा वास घेतो, धूळ उडवतो, दंगामस्ती करतो, सोंडेत तो चारपाच लिटर पाणी साठवू शकतो. पण युद्धात हीच सोंड त्याच्या घातालाही कारणीभूत होऊ शकते. महाभारताच्या 'उपसंहार' खंडात चिंतामणराव वैद्य म्हणतात -... हत्तींना फौजेत मानाचे स्थान होते. पण त्याची सोंड नरम असल्याने तो भाग सहज तोडण्यासारखा असे. त्यामुळे हत्तीच्या गंडस्थळापासून सोंडेच्या शेवटापर्यंत लोखंडी चिलखत घातलेले असे ..
***
माझ्या पिढीतल्या अनेकांची हत्तीशी प्रत्यक्ष पहिली गाठ पडली असणार ती सर्कशीत. फुटबॉल खेळणारे, सर्कससुंदरीच्या इशाऱ्यासरशी त्यांच्या आकाराच्या मानानी इवल्याश्‍या स्टूलावर चारही पाय ठेवून उभे रहाणारे, काम नसताना सर्कशीच्या शिकारखान्यात गवत उडवत झुलत रहाणारे, पाय मोकळे केल्यासारखे गावातून फेरफटका मारताना सर्कसची जाहिरात करणारे हत्ती. आत्ता पन्नाशी आणि साठीच्या दरम्यान असलेल्या पिढीला आणखी एक आठवण असणार; 'चल, चल, चल मेरे साथी; ओ मेरे हाथी...' असं म्हणत हत्तींची आख्खी पलटण हिंडवणारे त्यावेळचे बॉलीवूडमधले ज्येष्ठ हत्तीमित्र रा.रा. राजेश खन्ना यांची.
पुण्याच्या पेशवे पार्कात सुमित्रा आणि अनारकली नावाच्या दोन हत्तीणी होत्या. त्यावेळी 'बच्चेकंपनी' या सदरात मोडणाऱ्या अवघ्या पुणेकरांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा या हत्तीणींवर जीव होता. पेशवे पार्कात त्यावेळी या हत्तीणींच्या पाठीवर बसून एक छोटासा फेरफटकाही मारता येत असे. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत अग्रभागी चालण्याचा मान अनेक वर्षे आधी सुमित्रेचा आणि नंतर अनारकलीचा होता. पुण्यासारख्याच कोल्हापूरकरांच्या, सांगलीकरांच्या आणखी कुठल्या कुठल्या गावांतल्या रहिवाशांच्या आठवणी हत्तींशी जोडलेल्या असतील. सांगली देवस्थानच्या सुंदर गजराजाच्या किंवा त्याच्या नंतर आलेल्या बबलू हत्तीच्या आठवणी अजून ताज्या असतील. बातमीदारीच्या निमित्ताने केव्हातरी सांगलीला गेलो असताना श्रृंगार करून बाजारपेठेतून दिमाखात फेरफटका मारणारा, हक्कानी केळ्यांचा घड स्विकारणारा सांगलीच्या देवस्थानचा हत्ती माझ्याही स्मरणात आहे.
हंपीच्या देवळातला एक अनुभव आहे. हंपीच्या विरुपाक्ष मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सामोरा आला मंदिरातला हत्ती; एखाद्या शुभंकरासारखा, आशीर्वाद दिल्यासारखी सोंड उंचावून.
हत्तीच्या शेपटीचा पुसटसा फटकाही चांगला खरचवटून जातो हे कळण्याचाही योग नंतर एकदा यायचा होता.
***
दक्षिणेकडच्या बहुतेक सगळ्या अभयारण्यांमध्ये हत्ती आढळतात. त्यांच्या त्या साम्राज्यात त्यांना पहाण्याचा आनंद काही आगळाच असतो हे कळलं बांदीपूरमध्ये. 'तुम्ही हत्तींच्या प्रदेशात आहात. रस्त्यावर फार वेळ रेंगाळू नका,' बांदीपूर अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यावर स्वागत होतं ते अशा अर्थाच्या सूचनेनीच. न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा रस्ता सूर्यास्तानंतर माणसांच्या राज्यातल्या वाहतुकीला बंद असतो.
जंगलात नेहमी फिरणाऱ्या मित्रांकडून हत्तींचे त्यांनी अनुभवलेले, ऐकलेले खूप किस्से सांगतात. जॉर्ज ऑर्वेलसह जुन्या काळातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून अनेकानी त्यांच्या आठवणीतले हत्ती लिहून ठेवले आहे. ऑर्वेल सुरवातीच्या काळात ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी असतानाचा त्यांनी एका हत्तीला गोळ्या घातल्या होत्या. 'शूटींग ॲन एलेफंट' या प्रसिद्ध निबंधात त्यांनी हा प्रसंग नोंदवून ठेवला आहे. स्थानिक लोकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल फारसं ममत्व नव्हतं. शिवाय केवळ एका मजूराला मारून टाकले म्हणून त्या हत्तीला गोळ्या घालण्याची ऑर्वेल त्यांची कृतीही काहीशी वादग्रस्त ठरली होती. ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटी-फोरसारख्या आपल्या कादंबऱ्यांमधून कालातीत ठरणारी राजकीय टिपणी करणाऱ्या ऑर्वेल यांचा हा अनुभव मुळातून वाचण्यासारखा आहे.
हत्तींविषयी वाचताना असंख्य उल्लेख सापडतात. समुद्रमंथनातून मिळालेला ऐरावत, भोंडल्याच्या खेळात फेर धरलेल्या मुलींच्या मधे पाटावर चितारलेला किंवा हौसेनी घडवलेला मातीचा हत्ती, मेघदूत रचणाऱ्या कवीकुलगुरू कालिदासाने आषाढाच्या पहिल्याच दिवशी पर्वतशिखरांशी झुंजणाऱ्या काळ्याकभिन्न मेघांना दिलेली मत्त हत्तींची उपमा, अन्य संस्कृत रचनांमध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, 'हस्तिप्रधानो विजयी राज्ञाम्‌' हे कौटिल्याचे वचन, गौतम बुद्धांच्या मातेला स्वप्नात दिसलेला शुभ्र हत्ती, गाथा सप्तशतीमध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, हरप्पा मध्ये सापडलेल्या हत्तींच्या प्रतिमा, अजंठा, भारहूत इथल्या शिल्पांमधल्या गजप्रतिमा, गजांतलक्ष्मीची कल्पना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी रायगडासारख्या बेलाग किल्ल्यावर झुलणारे हत्ती पाहून अचंबित झालेला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्‍झेंडन, दक्षिण भारतातले गजपर्व, म्हैसूरमधल्या दसऱ्याच्या शाही सोहळ्यातले शृंगारलेले हत्ती, नवी वास्तू हत्तीसारखी मजबूत व्हावी म्हणून वास्तूशांतीच्यावेळी हत्तीच्या पायाखालची माती पुजण्याची रीत, हत्तीच्या सोंडेसारख्या धारांनी बरसणारा हस्ताचा पाऊस, रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक मधला 'व्हेन आय वॉज इन्‌ दि आर्मी ऑफ... ' असं सांगत शिस्तीच्या स्वतःच्याच कल्पनांमध्ये रममाण होणारा रिटायर्ड फौजी -कर्नल हाथी, हस्तीदंताच्या हव्यासापायी जगभर माणसानी मांडलेला गजमेध, कृष्णमेघ कुंटेंनी सांगितलेली कुडकोम्बन नावाच्या लांब सुळ्यांच्या हत्तीची गोष्ट, जगातली सध्याची सर्वात वयस्क हत्तीण - चेंगन्नूरच्या महादेव मंदिरातली अठ्ठ्यांशी वर्षांची चेनकल्लूर दाक्षायणी, हत्तीनी भाषेला दिलेल्या 'पांढरा हत्ती', 'साठमारी', 'खायचे आणि दाखवायचे दात', 'दि एलिफंट इन द रूम', 'ॲन एलिफंट नेव्हर फर्गेटस्‌', 'हॅव अ मेमरी लाइक ॲन एलिफंट', 'हत्ती गेला शेपूट राहिले,' 'दुःख हत्तीच्या पावलांनी येते..', 'हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी' सारख्या म्हणी, संज्ञा आणि वाक्‌प्रचार, अधिवास आक्रसत चालल्याने माणसाशी संघर्ष मांडणारे हत्ती, तळकोकणातल्या अशा संघर्षाला केंद्रस्थानी ठेवत बदलत्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे पहाणारी अजय कांडर यांची 'हत्ती इलो' ही दीर्घ कविता, कोलंबोतल्या गंगरामाया विहारात पाहिलेला जमिनीला टेकण्याइतके लांब सुळे असलेला हत्ती अशा वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या असंख्य प्रतिमा डोळ्यासमोर येत गेल्या. मग लक्षात आलं, हत्ती समजावून घेताना आपलीच अवस्था लिळाचरित्रातल्या हत्ती पहाणाऱ्या सात आंधळ्यांसारखी झालीय. प्राणिशास्त्रातून दिसणारा हत्ती, उत्क्रांतीच्या प्रवासात दिसणारा हत्ती, संस्कृतीचा, इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून येणारा हत्ती, महाकाव्यांमधून, भाषिक प्रतिमांमधून दिसणारा हत्ती... हत्तींची ही कहाणी; खरंतर साठा उत्तरी पण पाचा उत्तरीच पूर्ण होणारी! 
(प्रथम प्रसिद्धी -सकाळ साप्ताहिक)

मोदकाख्यान


मोदक डेज्‌ आर हिअर अगेन.... आपल्या खाद्ययात्रेतला हा एक राजस पदार्थ. बुद्धिदात्या गणरायाचा आवडता. 
आठ-पंधरा दिवसांपूर्वी व्हॉट्‌सॲपवर एक पोस्ट फिरत होती. मोदकांचा आस्वाद घेण्यातला आनंद तितक्‍याच रसभरीत शब्दांत सांगणारी ही पोस्ट ज्यांनीज्यांनी वाचली असेल त्यांनात्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली असणार. हे व्हॉट्‌सॲप नावाचं प्रकरण मात्र एकदम भारी आहे. एकविसाव्या शतकात जगण्यासाठी अन्न-वस्त्र-निवाऱ्या इतकंच आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या आयुधांपैकी एक असलेल्या स्मार्ट फोनात असणाऱ्या असंख्य ॲपांपैकी एक -एवढीच या व्हॉट्‌सॲपची ओळख नाहीये. व्हॉट्‌सॲपनं आपली आयुष्य क्रांतीच्या भलत्याच वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवली आहेत. मुख्य म्हणजे या व्हॉट्‌सॲपनी आपल्याला एकदम 'फॉरवर्ड' बनवलं आहे. (इथे 'फॉरवर्ड'चा अर्थ 'प्रगत' किंवा 'पुढारलेला' असा नसून, हातातल्या फोनवर जे येईल ते 'पुढे ढकलणारा असा घ्यावा.) तर उकडीच्या मोदकांबद्दलची ती पोस्ट अशीच फिरत फिरत माझ्यापर्यंत आली तेव्हा मूळ पोस्टकर्त्यांची ओळख पुसली गेली होती. फक्त (त्या मूळ लेखकाचं) नशीब इतकंच की पोस्ट कुणा दुसऱ्याच्या नावावर खपवलेली नव्हती. 
'अंतर्बाह्य सौंदर्याने भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो.' बस्स... हे लिहिणारा किंवा लिहिणारी अंतर्बाह्य मोदकांच्या प्रेमात असणार. 
मोदक करणे हे एकूणच कौशल्याचं काम. नजाकतीनं करण्याचं. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून, ते सावलीत वाळवून, दळून ते त्याची उकड काढेपर्यंतची एक स्टेप. उकड काढण्यासाठी पाणी तयार करताना मोहन घालणं हा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. मोहन म्हणजे पाण्यात तेल किंवा तूप घालायचं का तेला-तुपात पाणी, हे कळण्यापासून तयारी लागते. मग छान पिवळ्या रंगाचा गूळ आणि ओल्या खोबऱ्याचं सारण जमायला हवं. उकड काढल्यावर हाताला तेल आणि पाणी लावून ती मळायची. इतकं सगळं जर सुरळीत पार पडलं, तर मग गाडी मोदक वळण्याकडे वळते. बरं हे वळण पुन्हा सरळ नाहीच. मळलेल्या उकडीचा गोळा घेऊन त्यात एक खळगा करायचा. ही मोदकाची पारी. मोदक उकडीचा असो किंवा कणकेचा, पारी पातळ हवी. पारी जाड झाली तर मोदकाची चव जाते. पण पारी पातळ आहे म्हणून मोदक फुटता कामा नये. मग त्या पारीत सारण भरून कळ्या किंवा मुखऱ्या करून तो मोदक बंद करायचा आणि मोदकपात्रात केळीच्या पानाच्या तुकड्यावर ठेवून वाफवायचा. मोदकाच्या पारीच्या कळ्या आणि मोदकाचं नाक ही स्वतंत्र कौशल्यं आहेत. नाहीतर एवढा घाट घालूनही मोदक 'जमले नाहीत'चा शिक्का बसतो तो वेगळाच. 
*** 

पद्मपुराणातल्या सृष्टीखंडात महर्षी व्यास मोदकाची कथा सांगतात. या आख्यायिकेनुसार मोदकाची निर्मिती प्रत्यक्ष देवांनी केली आहे. सर्वप्रथम पूजा कोणाची करावी या संजयाच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना व्यास महर्षी मोदकाची कथा सांगतात. एकदा सर्व देवांनी विशेष श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला, आनंददायक असा मोदक देवी पार्वतीकडे दिला. त्या मोदकाचे नाव महाबुद्धी. देवांनी निर्मिलेला हा मोदक विशेष होता. त्याच्या केवळ वासाने अमरत्व प्राप्त होईल; हा मोदक सेवन करणारा सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ, सर्व शस्त्रास्त्रविद्यापारंगत आणि सर्व तंत्रात निपुण होईल; तसाच तो लेखक, चित्रकार आणि ज्ञानविज्ञानतत्त्ववेत्ता होऊन सर्वज्ञ होईल अशी त्या मोदकाची ख्याती होती. स्कंद आणि गणेश ही शंकर आणि पार्वतीची दोन मुले. दोघांही मुलांनी पार्वतीकडे तो मोदक मागितल्यावर, मोदक मिळवण्यासाठी पार्वतीने दोन्ही मुलांना शंभर सिद्धी प्राप्त करण्याची अट घातली. हे ऐकताच स्कंद मोरावर बसून जगातल्या सर्व तीर्थांमध्ये स्नान करून एका क्षणात परत आला. बुद्धिमान गणेशाने मात्र आईवडिलांनी श्रद्धेने प्रदक्षिणा घातली आणि तो त्यांच्यासमोर उभा राहिला. पार्वती म्हणाली, 'सर्व तीर्थांत केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व प्रकारची यज्ञयागादिक व्रते, नाना प्रकारचे यमनियम, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाएवढेही होऊ शकत नाही. तेव्हा, गणेश शंभर पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याने आईवडिलांची पूजा केली आहे. त्यालाच मी हा मोदक देते.' यामुळेच गणेशाला यज्ञयागात, वेदशास्त्रादी स्तवनात, नित्य पूजाविधानात प्राथम्य मिळेल, असा वरही शंकर-पार्वतीनी गणेशाला दिला. गजाननाला मोदक प्रिय झाला तो तेव्हापासून. आणि गणपतीच्या अनेक नावांमध्ये आणखी एका नावाचीही भर पडली -मोदकप्रिय. अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केल्यानंतर प्रकट झालेल्या अमृतकुंभासाठी देव आणि दानवांमध्ये एक युद्ध झाले. युद्धाच्या धामधुमीत अमृतकुंभातले चार थेंब जमिनीवर सांडले. त्यापैकी एक थेंब पडला उज्जैनला क्षिप्रा नदीत. महाकालेश्‍वराच्या या अमृतक्षेत्री असलेल्या गजाननाच्या सहा मंदिरांमधलं एक मंदिर या मोदकप्रियाचंही आहे. 
ब्रह्मांडपुराण, नारदपुराणातल्या गणपती व्रतांमध्ये आणि अन्य काही व्रतांमध्ये नैवैद्याच्या संदर्भाने मोदक येतो. "यो मोदकसह्स्रेण यजति। स वाञ्छितफलमवाप्नोति। या मोदकप्रियाला हजार मोदकांचा नैवेद्य दाखवणाऱ्या भक्ताला इष्टफल प्राप्ती होते, असं गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. दुर्गा भागवतांच्या एका लेखात विष्णुपुराणात नोंदवलेल्या भोजनातल्या पदार्थांचे संदर्भ आहेत. त्यात साखरेचे पायस, शाली नावाच्या उत्तम तांदळाचा भात, लाडू, स्वादिष्ट वडे, घारगे, मांडे यांच्या जोडीला मोदकही आहेत. 
भारतीय पुराणांचे अभ्यासक मोदकाचे विविध अर्थ सांगतात. मोद म्हणजे आनंद देतो तो मोदक. चतुर्हस्त गणेशाच्या पारंपरिक रूपात एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात परशु, तिसऱ्या हातात मोदक असतो; आणि चौथा हात आशीर्वादासाठी उंचावलेला असतो. अभ्यासकांच्या मते हा मधुर मोदक तत्त्वज्ञानाचं प्रतिक आहे. 
पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण भारतात मोदक, कडबू, कानवले, कौळकटे, कुडुमु, पीठा, इलायडा अशा विविध नावांनी पिढ्यांकडून पिढ्यांकडे आलेल्या मोदकाचे पुराणातले उल्लेख त्याचे प्राचिनत्व दाखवत असले, तरी भारतवर्षात सर्वत्र पुजल्या जाणाऱ्या सगळ्यात प्रिय देवतेला सगळ्यात प्रिय असणाऱ्या नैवेद्याचा नेमका प्रवास हे कोडंच आहे. पण पुराणांतरी देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या कोलेस्टोरल फ्री अवतारासह मोदकांच्या नानाविध रुपांपर्यंत आला आहे. 
*** 

मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ माणसाच्या एकंदर खाद्यसंस्कृतीला गेल्या चारएक हजार वर्षांपासून माहिती आहेत. 'डम्पलिंग्ज्‌'च्या रूपानं. आफ्रिकेतले, दक्षिण अमेरिकेतले आदीम रहिवासी, सुदूर पूर्वेकडचे चीन, जपान, इंडोनेशियादी प्रदेशांपासून ते युरोपातल्या पुढारलेल्या अभिजनांच्या खाद्यसंस्कृतीपर्यंत सगळीकडे या डम्पलिंग्ज्‌'चा वावर आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज जगाच्या विविध भागातली ही डम्पलिंग्ज्‌ अवघ्या खाद्यब्रह्माला भुरळ घालताहेत. 
व्याख्याबिख्यांची आडवळणं अगदी घ्यायचीच म्हटली तर त्या त्या भौगोलिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या तांदूळ, गहू, ओटस्‌, मका, सोयाबीन, बार्ली, ज्वारी अशा धान्यांच्या पिठांच्या किंवा ब्रेडच्या किंवा बटाट्याच्या आवरणात भाज्या, फळं, कडधान्य, सुकामेवा, मांस, मासे अशा नाना पदार्थांचं सारण भरून उकडलेले, वाफावलेले, तळलेले, भाजलेले मोदक म्हणा, मोमोज्‌ म्हणा, करंज्या म्हणा, कचोऱ्या म्हणा किंवा 'सम्बुसा' अशा नावानी मध्य आशियात उगम पावून आता अक्षरशः जगभर पसरलेले सामोसे म्हणजे 'डम्पलिंग्ज्‌'. गोलाकार, लांबट, ठेंगणे-ठुसके, टोकदार नाकाचे, चंद्रकोरीच्या आकाराचे, त्रिकोणी, चौकोनी. तुपाच्या धारेबरोबर, वेगवेगळे सॉसेस, चटण्या-लोणच्यांबरोबर, सूपांमध्ये डुबवून किंवा नुसतेच खायचे. (वाचतावाचता मिळालेली आणि आत्ता सामोश्‍यांवरून सहज आठवलेली नोंद म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या सामोशाची. गिनिज बुकातल्या एका नोंदीप्रमाणे लंडनमधल्या बल्लवांनी बनवलेला हा सामोसा साडेतीनशेपेक्षा जास्त पौंडाचा होता. आपल्याकडेही दर गणेशात्सवात हौशी मंडळींनी पाच-पन्नास किलो वजनाचा मोदक करून तो नैवेद्य 'श्रीं'ना अर्पण केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात.) 
'मोमो' मी पहिल्यांदा पाहिले ते मिझोरामची राजधानी ऐझॉलमध्ये. संपादकांच्या एका परिषदेच्यानिमित्तानी तिथे जाणं झालं होतं. सर्वशिक्षा अभियानाचा भाग म्हणून तिथल्या सरकारनी चालवलेल्या एका शाळेत आम्ही गेलो होतो. त्या शाळेच्या दारात एका छोट्या स्टोवर एक पसरट भांडं ठेवून मोमोज्‌ विकणारी ती मुलगी बसली होती. त्या 'उकडलेल्या करंज्या' खाण्याचा काही धीर झाला नाही, पण तिच्या भोवती उभं राहून कसल्याशा पानावर घेऊन, आरडाओरडा करत मोमोज्‌ खाणाऱ्या मुलांकडे पाहता त्या मोमोज्‌ची लोकप्रियता लक्षात येत होती. मोमोज खरं तर मूळचे तिबेटमधले. पण 'चिंडीयन' पदार्थांसारखं आपल्यापुरतं आपण त्यांचं भारतीयीकरण करून टाकलं आहे. हा तसा मूळचा मांसाहारी पदार्थ. पण आता पनीर, चीझ आणि भाज्या वापरून केलेल्या मोमोज्‌च्या शाकाहारी व्हर्जन्स्‌वरही खाद्यप्रेमींनी पसंतीची मोहोर उठवली आहे. उकळत्या पाण्याच्या वाफेवर मोमोज्‌ उकडताना त्याचा अर्क पाण्यात उतरतो. अनेक ठिकाणी ते पाणी भाज्या वगैरे घालून सूप म्हणूनही सर्व्ह करतात. 
*** 

भारतीय पुराणांमध्ये साक्षात देवांनी अमृतापासून बनवलेला पदार्थ म्हणून येणारा मोदक चिनी इतिहासात मात्र भलत्याच संदर्भानी येतो. चिनी डम्पलिंग्ज्‌च्या नोंदी इसवीसन पूर्व सव्वादोनशे वर्षांपर्यंत मागे जातात. त्याकाळातल्या हूग लिआंग नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याला विष भरलेलं डम्पलिंग खायला घातलं होतं, अशी एक कथा सापडते. जिऍओझी हा चीनधला सर्वात लोकप्रिय मोदकप्रकार. आपल्याकडे जसे थंडीच्या दिवसांत धुंदुरमासात किंवा भोगीच्या जेवणात स्निग्ध पदार्थ आवर्जून खाल्ले जातात, तसे चीनमध्ये विंटर सॉल्स्टिसच्या दिवशी (२१ किंवा २२ डिसेंबरला) आणि नववर्षदिनाच्या आधीच्या संध्याकाळी जिऍओझी हवेतच हवेत. 
आपल्या मोदकांसारखेच जगाच्या अनेक भागांमध्ये डम्पलिंगज् तिथल्या तिथल्या संस्कृतीचा भाग आहेत. मक्‍याच्या पिठाचे आफ्रिकेतले फूफू, बन्कू, केन्के, तिह्लो, मेल्क्को; चीन मधले गौटी, वान्टान किंवा 'चिंडीयन' फूडमधले खवैय्येप्रिय स्प्रिंग रोल्स; चीनमधून इंडोनेशियात गेलेले सिओम; जपानी डॅंगो, निकुमान करंज्यांसारखे ग्योझा; शंकरपाळ्यासारखे दिसणारे इटालियन रॅव्हिओली; अमेरिकेतले टॉर्टिला किंवा चिकन, टर्की, स्ट्रॉबेरी, ॲपल, हॅम किंवा बटरबीन डम्पलिंग्ज्‌; अफगाणिस्तान, कझागिस्तान, उझबेकीस्तानातले मंटी किंवा मंटू; योमारी पुन्हीच्या, म्हणजे पौर्णिमेच्या, दिवशी नेपाळमध्ये होणारे योमारी; ब्रिटनमधले नॉरफोक, कॉस्टवोल्ड डम्पलिंगज्, रशियन पेलेमनी, ब्राझीलमधले बोलिंहा डी कार्न; चिली, जमैका, पेरूमधले मोदकांच्याच कुळातले हे डम्पलिंग्ज्‌ जगभरातल्या खाद्यप्रेमींच्या प्राधान्य यादीत असतात. 
मोदकांचा आस्वाद तब्ब्येतीत घ्यावा असं आपण म्हणतो, तसंच जॉर्जियन सिन्कालीचंही आहे. सिंन्काली खाण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. मुख्य म्हणजे सिन्काली खाताना काट्याचमच्यांचा वापर करणे शिष्टसंमत नाही. दिसण्यात अगदी आपल्या मोदकांची बहीण शोभेल अशा सिन्कालीचं नाक खात नाहीत. नाकाला धरून सिन्काली उचलायची पण नाक मोडून बशीत ठेवायचं. खाल्लेल्या सिन्कालींचा हिशेब मग या मोडून ठेवलेल्या नाकांवरून लावला जातो. 
*** 

जव्हार भागातल्या एका आदिवासी पाड्यावर मोदकाशी जवळीक सांगणारा एक पदार्थ खाल्ल्याचं आठवतं. एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला त्याच्या संस्थेने आर्थिक मदत दिलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करायची होती. त्याच्याबरोबर मीही हिंडत होतो. एका रात्री त्या पाड्यावर मुक्कामाला असताना पाहुण्यांसाठी म्हणून खास हा पदार्थ बनवला होता. घरधनी त्याला काहीतरी म्हणत होता, आता आठवत नाही. पण तांदळाच्या पिठीच्या गोळ्यात गुळाचे खडे घालून केलेले ते 'मोदक' खाताना मधेच लागणारी गुळाची चव अजून जिभेवर आहे. 
*** 

जर्मनातल्या वायमार जवळचं हायशीलहॅम गाव डम्पलिंगप्रेमींची पंढरी आहे. इथलं थुरिंगयान डम्पलिंग वर्ल्ड हे जगातलं बटाट्यांच्या डम्पलिंगचं एकमेव म्युझियम आहे. बटाटे गोळा करण्यापासून, ते बटाटे किसून त्याची डम्पलिंगज् करण्याच्या यंत्रसामुग्रीपासून त्या सगळ्या प्रक्रियेपर्यंत अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव या संग्रहालयात घेता येतो. आणि संग्रहालयाचे वेगळेपण म्हणजे इथे असलेल्या काही वस्तू चाखताही येतात. पर्यटकांना एका अवाढव्य डम्पलिंगमधून फेरफटका मारता येतो, मुलांसाठी डम्पलिंग क्रॉल्स बॉक्‍सेस आणि डम्पलिंग पिरॅमिडस्‌ आहेत. इथे डम्पलिंगवर चर्चासत्र होतात. कदाचित मोठ्या आकाराच्या डम्पलिंगसाठी छोट्या आकाराचे बटाटे वापरावेत की नाही, असे विषय असतीलही या चर्चासत्रांत; पण तुम्हाला हौस असेल तर एखादी डम्पलिंग रेसिपी घेऊन इथे तुम्हाला तुमचं पाककौशल्यही आजमावता येऊ शकतं. (पर्यटकांनी बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रेमळ आग्रह संचालकांना करू नये. केल्यास आधी नम्रपणे नकार मिळेल. त्यानंतरही आग्रह कायम राहील्यास अपमान होऊ शकतो, असा सल्लावजा धमकी देणारी खास पुणेरी लडीवाळ (!) भाषेतली पाटी इथे आहे की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.) स्वतः काही बनवण्याचा आणि खाण्याचा उत्साह (पक्षीः धमक) नसेल तर अगदी पारंपरिक बटाटा डम्पलिंगपासून त्याच्या आधुनिक अवतारांवर तावही मारण्याची सोयही इथे आहे. 
चीनमध्येही जिऍक्‍झिन राईस डम्पलिंग म्युझियम आहे. जिऍक्‍झिन प्रांतात प्रसिद्ध असणाऱ्या ड्रॅगन बोट उत्सवाच्या निमित्ताने बनणाऱ्या राईस डम्पलिंगची सुरुवात कशी झाली आणि तिथून ती संपूर्ण चीनमध्ये कशी पसरली ही या म्युझियमची मूळ कल्पना. इथेही पर्यटकांना त्यांचे पाककौशल्य आजमावण्याची, किंवा उत्तम राईस डम्पलिंगचा आस्वाद घेण्याची संधी असते. 
चीनमधल्या हान राजवटीपासूनचा डम्पलिंगचा इतिहास मांडणारं आणखी एक डम्पलिंग म्युझियम लिऑनिंग प्रांतातल्या डीलियन येथे सुरू झाल्याची एक बातमी मध्यंतरी पहाण्यात आली होती. 
गणेशोत्सवाच्या अलीकडे मोदक करण्याचे वर्ग घेणं आता नवीन नाही; पण आपल्या परंपरेतल्या मोदककुळातल्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांना जगातल्या त्यांच्या आते-मामे-चुलत भावंडांशी जोडून एखादं टुरिस्ट आकर्षण निर्माण करणं, हा कदाचित उद्याचा यशस्वी स्टार्टअप असू शकेल. 
*** 

मला विचाराल तर मोदक म्हणजे उकडीचाच. कणकेचे तळलेले मोदकही खायला चांगले लागतात; विशेषतः त्यातलं साखर आणि सुक्‍या खोबऱ्याचं सारण जमलं असेल तर. पण 'पक्वान्न' या शब्दातला रूबाब कणकेच्या मोदकांजवळ नाही. आणि उकडीचा मोदक खाणं हापण एक सोहळा असतो. म्हणजे उचलला मोदक आणि टाकला तोंडात, असं करण्यात हशील नाही. मोदक गंध-स्वादादी पंचेन्द्रियांनी खावा. मोदकपात्रातल्या हिरव्या केळीच्या पानावरून गरम वाफाळता मोदक ताटात यावा. पांढराशुभ्र. पारी अशी पातळ असावी, की आतल्या गूळ आणि ओल्या खोबऱ्याच्या सारणाचा तांबूसपणा जाणवून नजर तृप्त व्हावी. मग मोदकाचं टोकदार नाक अलगद मोडून त्यावर गरम तुपाची धार धरावी आणि मग आख्ख्या मोदकाचा एकच घास करावा.... आणि तृप्तीचा तो क्षण जपून ठेवावा... 
***

गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत केलेल्या प्रार्थनेप्रमाणे मोदकाख्यान मांडण्याच्या या अगदी छोट्याशा प्रयत्नांती सर्व सु-रस यात्राप्रेमींसाठी एकच सदिच्छा.... वाञ्छितफलमवाप्नोति। 

(प्रथम प्रसिद्धीः सकाळ सप्तरंग, २७ ऑगस्ट २०१७)