कथाओं से भरे इस देश में
मैं भी एक कथा हू
एक कथा है बाघ भी
इसलिए कई बार
जब उसे छिपने को नहीं मिलती
कोई ठीक-ठाक जगह
तो वह धीरे से उठता है
और जाकर बैठ जाता है
किसी कथा की ओट में
वाघ म्हटल्यावर डोळ्यासमोर खूप गोष्टी येतात. तशी ही कविताही आठवते. हे खरंतर एक दीर्घकाव्य आहे. ‘बाघ’ नावाचं. हिंदीतले नामवंत कवी केदारनाथ सिंह यांनी वाघाचं आणि माणसाचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं नातं अशा छोट्या छोट्या रचनांमध्ये मांडलंय. वाघ तसा आपल्या आजूबाजूला असतोच -मिथकांमधून, गोष्टींमधून, प्रतिकांमधून. पण या सगळ्याच्या पलीकडं जाऊन वाघ ही एक अनुभवण्याची चीज आहे.
छायाचित्रः डी. संजय, पुणे. |
पहिल्यांदा वाघ, अॅक्च्युली वाघीण, पाहिली ताडोबाच्या जंगलात. पंधरा एक वर्षांपूर्वी. ती दृश्यभेट अकल्पित होती. वाघ... वाघ... करत मचाणावर बसून झाल्यावर, सगळ्या आशा सोडून दिलेल्या असताना झालेली! एका कुठल्यातरी छोट्या जंगलवाटेवरनं कॅम्पसाईटच्या रस्त्याला वळताना ती थेट समोरच आली. दोन बछड्यांसह आरामात फिरायला निघाल्यासारखी. जीपची घरघर ऐकल्यावर तिनं एक क्षणभर थांबून अंदाज घेतला आणि जीपमधल्या सगळ्या एक्साइटमेंटकडं चक्क दुर्लक्ष करून, चार पावलं आणखी चालून ती रस्त्याकडेच्या गवतात शिरली. तिचे दोन्ही बछडे तिच्या पाठोपाठ गवतात गडप झाले.
काही हात अंतरावरून असं अचानक, आयुष्यात पहिल्यांदा वाघाचं दर्शन झाल्यानंतर जे काही वाटलं ते मला आजवर शब्दांत उतरवता आलेलं नाही.
हे ‘पहिलेपण’ आठवताना मला आजीच्या गोष्टी आठवतात. पाळण्यातल्या मुलाच्या ओढीनी घरी जाणाऱ्या एका ओल्या बाळंतिणीनी वाघाशी झुंज घेतल्याची एक गोष्ट ती सांगायची. ती गोष्ट आजी जशी सांगायची तशी घडली नसणार हे आता समजतं. पण ती गोष्ट सांगताना आजी नेहमी सांगायची, वाघ नजरबंदी करतो. आजीच्या म्हणण्याचा अर्थ, वाघाचं पहिलं दर्शन शब्दांत मांडता आलं नाही, तेव्हा कळला.
हे ‘पहिलेपण’ आठवताना मला आजीच्या गोष्टी आठवतात. पाळण्यातल्या मुलाच्या ओढीनी घरी जाणाऱ्या एका ओल्या बाळंतिणीनी वाघाशी झुंज घेतल्याची एक गोष्ट ती सांगायची. ती गोष्ट आजी जशी सांगायची तशी घडली नसणार हे आता समजतं. पण ती गोष्ट सांगताना आजी नेहमी सांगायची, वाघ नजरबंदी करतो. आजीच्या म्हणण्याचा अर्थ, वाघाचं पहिलं दर्शन शब्दांत मांडता आलं नाही, तेव्हा कळला.
वाघ झपाटून टाकतो समोर आल्यावर. आणखी एक किस्सा असाच ऐकलेला. ताडोबातलाच. गेले दोन-तीन दिवस एका पाणवठ्यावर वाघ येतो आहे, असं कळल्यानं दहा-बारा कॅम्पर्सनी दुपार उतरता उतरता पाणवठ्यालगतच्या मचाणावर डेरा जमवलेला. यातल्या निम्म्या लोकांची पहिलीच वेळ वाघ पाहण्याची; किंबहुना अशा पद्धतीनं जंगलात वावरण्याचीच. त्यामुळं ते जरा एक्साइट झालेले. मचाणापासून समोर थोड्या अंतरावर तो पाणवठा आणि त्याला लगटून जाणारा रस्ता आणखी थोडा पुढं जाऊन, वळून दिसेनासा झालेला. बऱ्याच वेळानं पाणवठ्यापलीकडून चितळाचा आवाज ऐकू आला. या अलार्म कॉलमुळं मचाणावरची अनुभवी मंडळी सतर्क झाली. मचाणावर आणखी थोडी एक्साइटमेंट. काही क्षणांची उत्सुकता.. आणि मचाणासमोरचा रस्ता जिथं वळत होता तिथून आत जाणाऱ्या पायवाटेवरून तो आला. त्यानं आणखी दोन पावलं पुढं टाकली. मचाणावर थोडी खपफस. वाघानी मचाणावरचे ते दबके आवाज बहुधा टिपले असावेत. कारण तो थबकला. नाक वर करून त्यानी कसला तरी अदमास घेतला, आणि तो आला तसाच मागं वळला. हे सगळं नाट्य घडायला काही सेकंद लागले. तितका वेळ ते सौंदर्य मचाणावरच्या दहा-बारा दुणे वीस किंवा चोवीस डोळ्यांसमोर होतं, प्रत्येकाच्या हातात कॅमेरा होता; पण एकालाही फोटो घ्यायचं सुचलं नव्हतं.
तुम्ही वाघाला पाहायच्या आधी वाघानी तुम्हाला किमान पंचवीस वेळा पाहिलेलं असतं, असं म्हणतात. जंगलात वाघ ‘बघायला’ म्हणून जाणाऱ्यांना वाघ दिसतो ही खरं एकतर वाघाची चूक असते किंवा दुर्दैव! जंगलात नेहमी फिरणाऱ्या लोकांकडं चौकशी करून पाहा; अगदी रस्त्याच्या पलीकडं किंवा बाजूला गवतात, बांबूच्या बेटांत बसलेला वाघ दिसता दिसत नसल्याचे अनेक किस्से त्यांच्या अनुभवाच्या पोतडीत असतील.
आपल्या लोककथांपासून ते ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...’ पर्यंतच्या बालकथांपर्यंत वाघ आहे. वाघ आणि सिंह भारतीय परंपरेतल्या प्राचीन शिल्पकृतीतही आढळतात, पण त्यात वाघाची प्रतिमा सर्वांत प्राचीन आहे, असं दुर्गाबाई भागवतांनी एका ठिकाणी लिहिलं आहे.
भारत हा पृथ्वीतलावरचा एकमेव देश आहे, जिथं वाघ (जीवशास्त्रीय परिभाषेत - पॅंथेरा टायग्रीस) आणि सिंह (पॅंथेरा लिओ) दोघंही आढळतात. पश्चिम गुजरातेतल्या गीरच्या भागात सिंहांची वस्ती आहे. आशियायी सिंहांची ती आता जगातली एकमेव वस्ती आहे. पंजाब, राजस्थानच्या वाळवंटाचा काही भाग आणि कच्छ वगळता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम किनाऱ्यापासून पूर्वोत्तर भारतातल्या घनदाट जंगलांपर्यंत भारतात सगळीकडं वाघ आहेत. किंबहुना वाघाचा हा जो सार्वत्रिक आढळ आहे, त्याच्याच जोरावर भारताचा राष्ट्रीय प्राणी ठरवण्याच्या शर्यतीत वाघानं सिंहावर मात केली. वन्यजीव मंडळानं जुलै १९६९ मध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह असावा असं ठरवलं होतं; पण तीन-साडेतीन वर्षांतच सिंहाची जागा वाघानं घेतली. हा निर्णय झाला त्यावेळी व्याघ्रसंरक्षणाचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात होता.
ऋग्वेदात वाघाचा उल्लेख नाही; पण हरप्पा आणि मोहें-जो-दारो येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या सिंधू संस्कृतीतल्या एका मोहरेवर वाघाचं चित्र आहे. त्यावरून सिंधू नदीकाठच्या लोकांना वाघ माहिती असावा असा निष्कर्ष काढता येतो, असं विश्वकोशातल्या नोंदीत म्हटलं आहे. अथर्ववेदात मात्र वाघ आणि सिंह या दोन्ही प्राण्यांचे उल्लेख येत असले तरी वाघाला त्यात प्राधान्य दिलेलं आहे, असं वाचायला मिळतं. लोककथा, धार्मिक कल्पना, मिथकं या सगळ्यांतून वाघ आपल्याशी घट्ट जोडला गेला आहे. उपलब्ध संशोधनानुसार वाघ मूळचा उत्तर यूरेशियातला. तिथून तो दक्षिणेकडं सरकला. पूर्व तुर्कस्तानापासून ते रशिया, चीन, भारतासह आग्नेय आशियापर्यंत वाघ पसरला. संशोधकांच्या मते, हा विस्तार भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वाघाची सवय अधोरेखित करतो. भारतात वाघाचा प्रवेश (पूर्वीच्या) ब्रह्मदेशातून झाला असावा, असं संशोधक मानतात.
वाघाच्या दिसण्याला राजसस्पर्श देणाऱ्या वाघाच्या कातड्यानीच त्याचा मोठा घात केला, असं म्हणावं लागेल. त्याशिवाय वाघाच्या भोवती गुंफलेल्या पुरुषत्वाच्या कल्पना आहेतच. असंख्य गैरसमज आणि मानवी हव्यासापोटी जगभर औषधांपासून ते दागिन्यांपर्यंत असंख्य गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या वाघाच्या कातडीचा, इतर अवयवांचा अगदी रक्त आणि चरबीचा व्यापार अब्जावधी डॉलरच्या घरात जातो असं सांगणारे अनेक अहवाल आहेत. चार वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१३मध्ये दिल्ली पोलिसांनी तस्करांच्या एका टोळीकडून अठरा किलो वजनाच्या वाघाच्या कवट्या, हाडं, नखं आणि दात जप्त केले होते. वाघांच्या नऊ उपजातींपैकी बाली वाघ आणि कॅस्पियन वाघांचा माणसानी कधीच निर्वंश केला आहे. व्याघ्रसंवर्धनाचे प्रयोग होत असले तरी भारतीय वाघांसह जावा, सुमात्रा आणि सायबेरियातले वाघ अजूनही वेगवेगळ्या कारणांनी धोक्यात आहेत.
असा वाघ आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली व्याघ्रगणनेची एक छोटी बातमी. दर चार वर्षांनी होणारी ही व्याघ्रगणना यावर्षी होते आहे. त्या गणनेचा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वीच संपला. जंगलातल्या वाघांची ही मोजणी वन्यजीव व्यवस्थापनात अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. वाघ हा जीवशास्त्रीय उतरंडीच्या सर्वांत वरच्या टोकावर आहे असं मानलं जातं. एखाद्या जंगलात वाघ आहे, याचा अर्थ ते जंगल सर्वार्थानी परिपूर्ण आहे. निसर्गाच्या साखळीतला कोणताही प्राणी पृथ्वीच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होणं, त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास आक्रसत जाणं हे विनाशाच्या दिशेनं पडलेलं आणखी एक पाऊल असतं, हे मनुष्यप्राण्यांपैकी निदान काही जणांना उमगलं आहे. वाघ समजावून घ्यायचा असेल, तर हरणं समजावून घ्यावी लागतील, असं टायगर बॉयलॉजिस्ट मेल सनक्विस्ट यांनी म्हटलं आहे. हरणं समजावून घ्यायची याचा अर्थ झाडं, माती, गवत आणि भूप्रदेशाचा अभ्यास. वाघाचा सगळ्याच पर्यावरणाशी असा थेट संबंध आहे.
यंदाची व्याघ्रगणना जराशी वेगळी आहे. एकतर पहिल्यांदा भारत, नेपाळ आणि बांगलादेशात मिळून एकत्रितपणे ही गणना होते आहे. यावर्षी वाघ मोजण्यासाठी आणखी आधुनिक, अँड्रॉईड-बेस्ड तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे, शिवाय नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अॅथॉरिटीनी (एनटीसीए) व्याघ्रगणनेच्या एकूण प्रक्रियांमध्ये आणखी सुसूत्रता आणली आहे.
वन्यजीव रक्षणासाठी आपल्याकडं होत असलेल्या प्रयत्नांचा इतिहास सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीपर्यंत मागं जातो. हरणांना संरक्षण देणाऱ्या बिश्नोईंसारख्या अनेक जनसमूहांनी देवरायांसारख्या कल्पनांमधून वनं आणि वन्यप्राणी जपले. आधुनिक माणसाच्या हव्यासानी, विकासाच्या कल्पनांनी मात्र या सगळ्या परंपरांवर मात केली. अजूनही पुरेसे नसले तरी हे चाक होता होईल तो उलटं फिरवण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत. इंदिरा गांधींसारख्या निसर्गप्रेमी पंतप्रधानांनी सत्तरीच्या दशकात निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भात दाखवलेली दूरदृष्टी आणि कणखरपणाची पुण्याई आज आपल्या मदतीला येते आहे.
पर्यावरण रक्षणाचे हे प्रयत्न योग्य दिशेनं जाताहेत की नाही हे तपासण्याचा एक मापदंड म्हणजे ही प्राणिगणना. वन्यजीव व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा टप्पा.
इंग्रज भारतातून चालते झाले, तेव्हा इथं लाखभर वाघ होते. माणसाच्या प्रगतीचे नवे आलेख मांडणाऱ्या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला ही संख्या सहा वरून चार आकड्यात आली. या आधीच्या व्याघ्रगणनेनुसार भारतात फक्त सव्वाबाविसशे वाघ शिल्लक होते. या संख्येच्या अचूकतेबद्दल शंका असल्या, तरी ही संख्या जगभरातल्या वाघांच्या एकूण संख्येच्या निम्मी आहे याची नोंद घ्यायला हवी. आजमितीला जगातल्या तेरा देशांमध्ये वाघ आहेत. कधीकाळी ही संख्या पस्तीस होती.
वन्यजीवतज्ज्ञ जॉर्ज शेल्लर यांनी पन्नास वर्षांपूर्वी भारतातल्या वाघांचा पहिला पद्धतशीर अभ्यास केला. या अभ्यासाकरता शेल्लर यांनी ‘बांधलेले’ लपणगृह - शेल्लरज् हाइड - आजही मध्यप्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात पाहायला मिळते. शेल्लर यांचा एक किस्सा ऐकायला मिळतो. एका रात्री लपणगृहात मुक्कामाला गेल्यावर शेल्लर यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या स्थानिक साहाय्यकाला परत जायला सांगितलं. अंधारातून परत गावात जायला तो कांकू करत होता. शेल्लर यांनी त्याच्या भीतीचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, की आपण येत असताना वाघानी आपल्याला पाहिलं आहे. येताना आपण दोघं होतो, जाताना मी एकटाच आहे हे वाघाच्या लक्षात आलं तर माझी काही खैर नाही. त्यावर शेल्लर त्याला म्हणाले, ‘तू बिनघोरपणे स्वतःशीच काहीतरी बडबड करत परत जा; वाघाला वजाबाकी येत नाही.’
गेल्या चाळीस वर्षांमध्ये वन्यजीव गणनेतही खूप बदल झाले आहेत. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसारखी घरोघर जाऊन वन्यप्राणिगणना करता येत नाही. मग एका विशिष्ट दिवशी पूर्ण चोवीस तास पाणवठ्यावर थांबून तिथं येणारे प्राणी प्रत्यक्ष मोजणं, त्यांच्या नोंदी करणं, विशिष्ट भूभागात प्राणी मोजण्याचा प्रयत्न करणं, पावलांचे ठसे घेऊन त्याद्वारे प्राण्याच्या एकूण संख्येचा अंदाज बांधणं आणि आता गेल्या काही दशकांपासून कॅमेरा ट्रॅप, जीआयएस, ड्रोन, लाँगरेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी (लोरा) सारखे तंत्रज्ञानही वन्यजीव गणनेसाठी वापरलं जातं. पावलांचे ठसे, आवाज, विष्ठेचे, केसांचे नमुने यांवरून प्राण्यांबद्दल काही अंदाज बांधता येत असले तरी ते अपुरे आहेत. या पद्धतीतल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी व्याघ्रतज्ज्ञ उल्लास कारंत यांनी १९८०पासून कॅमेरा ट्रॅपच्या वापरावर भर दिला.
यंदाच्या व्याघ्रगणनेसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी मॉनिटरिंग सिस्टिम फॉर टायगर-इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अॅण्ड इकॉलॉजिकल स्टेटस (एम-स्ट्रर्लपेस) हे अॅप बनवलं आहे. वाघांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा, त्यांचं भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या, त्यांचे अधिवास, मानवी हस्तक्षेपाच्या खाणाखुणा या अॅपच्या सहाय्यानं नोंदवल्या जातील. अॅपमध्ये आधीच असलेल्या माहितीच्या आधारे नव्यानं नोंदवलेल्या माहितीचे बिनचूक विश्लेषण शक्य आहे, असं वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गेल्या चार वर्षातले व्याघ्रसंवर्धनाचे प्रयत्न लक्षात घेता आता भारतातली वाघांची संख्या तीन हजारांवर पोचली असेल, असा वनअधिकाऱ्यांचा अंदाज आहे. चार वर्षांपूर्वी ती २,२२६ होती आणि २०१० मध्ये ती १,७०६ होती. अर्थात जानेवारी २०१८ च्या व्याघ्रगणनेचे तपशील हातात येण्यासाठी पूर्ण एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
भारतात सध्या एक्केचाळीस व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. वाघांची संख्या वाढली असली, तरी काही आव्हानं अजून शिल्लक आहेतच. वाघांचे अधिवास वाढलेले नाहीत. रस्ते, धरणं अन्य विकास प्रकल्पांमध्ये अडकलेल्या वाघांच्या जागांचे व्यवस्थापन, दोन अधिवासांना जोडणारे नैसर्गिक मार्ग, जंगलांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांच्या गरजा, त्यांचे आणि निसर्गाचे सहचर्य, त्यांचं जगणं, अजूनही न थांबलेल्या शिकारी, माणूस आणि वन्यप्राण्यांमधल्या वाढता संघर्ष अशा अनेक मुद्द्यांवर उत्तरं शोधावी लागणार आहेत.
आज माणूस वाघापासून इतका दुरावला आहे, की वाघाचं नैसर्गिक अस्तित्व पुन्हा अधोरेखित करावं लागणार आहे. वाघ मिथकांमध्ये जितका आदिम आहे तितकाच समकालीनही आहे; त्याच्या असण्यावर आपलं असणं अवलंबून आहे, हे पुन्हा नव्यानं समजावून घ्यावं लागणार आहे.
टायगर जिंदा है... इतकंच पुरेसं नाही; तो वाढायलाही हवा.
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक फेब्रुवारी २०१८)