Tuesday, December 13, 2016

ट्रॅकस्‌ अँड साईन्सः एलेफंटाईन ईश्‍यू

नागालॅंड आणि हिमाचलचे वनाधिकारी गेल्या महिन्यापासून एका भलत्याच पेचप्रसंगाला तोंड देत आहेत. एकमेकांपासून जवळपास हजारबाराशे मैलांवर असलेल्या या दोन राज्यांत साम्य शोधायला गेलं तर बऱ्याच गोष्टी सापडतील. म्हणजे दोन्हीकडे जंगलं आहेत. डोंगर आहेत. नद्या आहेत. पण हे साम्य या ढोबळ मुद्‌द्‌यावरच संपतं. तर झालं काय, हिमाचलच्या वनखात्याने मणीपूर, अरूणाचल प्रदेश आणि नागालॅंडच्या वनखात्याला आपल्याकडची माकडं देऊ केली. हिमाचलच्या वेगवेगळ्या भागांत उच्छाद मांडणाऱ्या या कपीकुलोत्पन्नांना लांबवर पाठवून देण्यावाचून बहुदा त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नसणार. मग हिमाचलातल्या जंगल खात्याच्या रावसाहेबांनी अनुक्रमे मणीपूर, अरूणाचल प्रदेश आणि नागालॅंडच्या जंगल खात्याच्या रावसाहेबांबरोबर पत्रव्यवहार केला. कसंही करा पण त्यांना आमची माकडं घ्याच, अशी गळच घातली. या आधी त्यांनी आणखी कोणकोणत्या राज्यांना भेटीदाखल आपल्याकडची माकडं देण्याचा प्रयत्न केला याची माहिती उपलब्ध नसली तरी या तिन्ही राज्यांनी हिमाचलने देऊ केलेली ही अनोखी भेट स्वीकारण्याची तयारी दर्शवली. हिमाचलमधल्या दोन एक लाख माकडांपैकी तीस हजार माकडं ईशान्येकडच्या तीन राज्यांत रिलोकेट करायची, अशी कल्पना होती. पत्रव्यवहार सुरू होता. काही मिटींगापण झाल्या. आणि अचानक मामला थंडावला. नागालॅंडच्या जंगल खात्याच्या रावसाहेबांनी हिमाचलला रिटर्न गिफ्ट देऊ केली. नागालॅंडच्या वोखा जिल्ह्यात जवळपास दिडशे हत्ती आहेत. तुमच्याकडच्या शेतकऱ्यांना सतावणारी माकडं आम्ही घेतो, त्या बदल्यात आमच्याकडच्या शेतकऱ्यांना सतावणारे काही हत्ती तुम्ही घ्या. असा साधा सोपा प्रस्ताव नागालॅंडनी हिमाचलसमोर मांडला. आणि एकदम एक "एलेफंटाईन ईश्‍यू'च तयार झाला. हिमाचल हा काही हत्तींचा देश नाही. त्यामुळे तिथल्या वनाधिकाऱ्यांचा हॅम्लेट झाला आहे. अजूनतरी यावर काही तोडगा निघाल्याचं ऐकिवात नाही. हिमाचलमधला माकडांचा प्रश्‍न गंभीर आहे. जवळपास तेवीसशे गावांतल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणे माकडांच्या त्रासाला कंटाळून शेतीच पडीक ठेवलीय. माकडांच्या हल्ल्यात शेकड्यानी माणसं जखमी झाली आहेत, आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला लाखावारी रुपयांचा खर्च आहे. गेल्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने उपद्रवी माकडं मारायची परवानगी दिली. सहा महिन्यांकरीता ही परवानगी होती. पण जनमत साक्षात महाबली हनुमंताच्या वंशजांविरूद्ध शस्त्र उचलण्याच्या विरोधात होते. त्यामुळे उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी रोख पैशाचे आमिष असूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
हिमाचलमध्ये माकडांनी मांडलेला उच्छाद किंवा नागालॅंडमध्ये हत्तींकडून होणारी पिकांची नासधूस हा काही आजचा प्रश्‍न नाही. मनुष्यप्राणी आणि अन्य प्राणी यांच्यातला हा संघर्ष सजीवसृष्टीइतकाच जुना आहे. तो जगात अनेक ठिकाणी आहे. विशेषतः माकडांनी वाढत्या मानवी वस्त्यांना कधीच आपलेसे केल्याचे तज्ज्ञ सांगतात. अन्य प्राण्यांच्या बाबतीत बोलायचे तर राखीव ठेवलेली अरण्ये कमी पडायला लागली; गवताळ रानांपासून ते घनदाट सदाहरीत अरण्यांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे अधिवास धोक्‍यात आले, भक्ष्य कमी झाले, पाणवठे लवकर सुकायला लागले तसे यातले काही प्राणी मानवी वस्तीकडे वळले. यातही बिबट्यासारख्या काही प्राण्यांच्या टिकून राहण्याच्या आकांक्षेने मानवी अतिक्रमणांवरही मात केली. बिबट्या उसाच्या फडात रहायला शिकला. उसाच्या फडात बिबट्याची पिल्लं सापडायला लागली. हत्ती नव्या जागा शोधायला लागले. विणीच्या हंगामासाठी स्थलांतर करणारे पक्षी नेहमीच्या जागांकडे फिरकेनासे झाले. वाघांच्या बाबतीत मात्र अगदी उलट घडत गेलं. एकटं रहाण्याकडे स्वभावतः कल असलेला वाघ जसा अधिवासांबरोबर आक्रसत गेला, तसेच माळढोकसारखे पक्षीही संपत गेले. ते इतके कमी झाले की दुर्मीळ प्राण्यापक्षांच्या यादीत जाऊन बसले. हे झालं मोठ्यांचं. जैवसाखळीत तितकेच महत्त्वाचे असलेल्या कित्येक छोटे मोठे प्राणी पक्षी, सरपटे, मासे, कोळी, कृमी, झाडं, झुडपांना या अतिक्रमणासमोर शरणागती पत्करावी लागली. बरेचसे दुर्मीळ झाले, काही चित्रांतच जाऊन बसले. लहानपणी सगळ्यात आधी भेटणारी चिमणी शहरांतून आता हद्दपारच झाली आहे आणि रामायणातल्या जटायूशी नातं सांगणारी गिधाडंही.
विजिगीषू वृत्तीने बाहेर पडणाऱ्या या प्राण्यांचा माणसाशी संबंध आल्यावर काही अपघातही घडले. पण तरीही मानवी वस्तीत शिरणाऱ्या माकडं, नीलगायी, रानडुकरं यांना व्हर्मिन म्हणजे उपद्रवी ठरवून मारून टाकणे, हा उपाय नक्कीच नाही. गेली कित्येक वर्ष जगभरातली शहाणी माणसं माणूस आणि प्राण्यांमधल्या संघर्षावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. या संघर्षाला खूप बाजू आहेत, बोचणाऱ्या कडा आहेत, माणसाच्याही जगण्याच्या लढाईचे संदर्भ आहेत. पुन्हा जगाच्या एका बाजूला सापडलेली उत्तरं दुसऱ्या बाजूला उपयोगी ठरतील याची शाश्‍वती असूच शकत नाही. पृथ्वीवर, इथल्या अरण्यांवर, पाण्यावर, तिथल्या हवेवर आपल्या इतकाच अधिकार असणाऱ्या प्राण्यापक्षांना, झाडाझुडपांनाही आपल्याबरोबर सामावून घेण्याचा विचार माणसालाच करावा लागणार आहे. त्यावरचे उपाय सापडेपर्यंत शोधावे लागणार आहेत, अन्यथा सर्वांभूती परमेश्‍वर पहाणाऱ्या संतांचा वारसा सांगायचा कशाला?