आज केवळ अधिकारपद आणि अंगावरच्या वर्दीमुळे नव्हे, तर एरवी निबर असणारी शासकीय यंत्रणा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याच्या संवेदनशीलतेमुळे समाजाच्या आदराचा विषय बनलेले हे अधिकारी अगदी काल परवा पर्यंत तुमच्याआमच्या सारखेच चेहरा नसलेल्या अफाट जनसमुदायाचा एक भाग होते. यांच्यापैकी काहींच्या गावांची नावेही आपल्यापैकी अनेकांनी ऐकलीही असण्याची शक्यता नाही त्यामुळे ही गावे कधी नकाशावरही पाहिली असण्याची शक्यता नाही. "राजमुद्रा"चे नायक अशा "माहित नसलेल्या महाराष्ट्रा"तले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यातल्या तुर्क पिंपरीचे पांडुरंग पोले आहेत. सोलापूर जिल्हयातल्या कुरबावीचे राजेंद्र रुपनवर आहेत. पुणे जिल्ह्यातल्या रांजण वळतीचे प्रशांत लोखंडे आहेत. आणि यातली प्रत्येक कथा एक नवलकथा आहे.
आजच्या तरुणाला खुणावणारी आव्हाने "राजमुद्रा"तल्या प्रत्येकानेच पेलली आहेत. केंद्रीय सेवा परीक्षांमध्ये यश हा या तरुणांच्या प्रवासातला केवळ एक टप्पा आहे, कारण अधिकारपदावर पोचल्यानंतरचा या तरुणांचा प्रवास अधिक थक्क करणारा आहे. भारतीय विदेश सेवेतले ज्येष्ठ अधिकारी आणि वाचनप्रेमी मराठी मंडळींना लिखाणातून भेटत रहाणारे भारताचे मालदीवमधले उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे "राजमुद्रा"च्या प्रस्तावनेत या टप्प्याबद्दल नेमक्या शब्दात लिहीतात. मुळे म्हणतात, ''मला जाणवलेलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे अधिकारी ठराविक साच्याचे अधिकारी झाले नाहीत. एकदा सेवेत रूजू झाले की अपवाद वगळता सगळ्या पार्श्वभूमीतून आलेले अधिकारी जणू कुणी तरी त्यांच्यावर इस्त्री मारली असावी तसे ताठर होऊन जातात. यांना किती लवकर खुर्चीची, सत्तेची, अधिकाराची, पैशाची मग्रुरी येते ते त्यांच्या वागणुकीत व चेहऱ्यावर दिसते. इंग्रजांच्या काळातील प्रशासनाविषयीची भीती आजही जनतेच्या मनातून हटलेली नाही हे त्यामुळेच. या पुस्तकातले अधिकारी मला फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या दिंडीतले खरे वारकरी वाटतात.'' मुळे यांच्या दृष्टीतून "राजमुद्रा" म्हणजे "माणसांच्या पिकाची सुरुवात'' आहे.
"राजमुद्रा" वाचताना या बारा मराठमोळ्या अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वगाथेतले हे समान सूत्र सतत जाणवत रहाते. कम्युनिटी पोलीसिंगच्या क्षेत्रात नव्या कल्पना आणून त्या सगळ्या जगाला स्वीकारायला लावणारे आंध्र प्रदेश केडरचे आय्पीएस् अधिकारी महेश भागवत, त्यांचा आसरा आणि पोलीस मी कोसमची पुस्तकाच्या सुरुवातीलाच ओळख होते. त्यानंतर उलगडत जाते एकेका प्रवासाची अविश्वसनीय कहाणी. भागवतांबरोबरच टीमवर्कच्या माध्यमातून प्रत्येक समस्येवर मात करणारे तमिळनाडूतील आय्एएस् अधिकारी आनंद पाटील, सतत होणाऱ्या बदल्यांना भीक न घालता आपल्या भूमिकेवर ठाम रहाणारे पंजाबातले आय्एएस् अधिकारी नीलकंठ आव्हाड, "लिडींग फ्र्रॉम द फ्रंट" ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणारे मूळचे बिहार केडरमधले पण सध्या महाराष्ट्रात, पुण्यात असणारे आय्पीएस् अधिकारी संजय लाठकर यांना भोळे "राजमुद्रा"च्या नायकांची "पहिली पिढी" असे संबोधतात. त्यांच्या बरोबरीने अरूणाचल प्रदेशचे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे आय्एएस् अधिकारी प्रशांत लोखंडे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सामाजिक लेखापरीक्षण करणारे आय्एएस् अधिकारी प्रविण गेडाम, कष्ट आणि सातत्य या पुंजीवर आय्पीएस् होणारे राजकुमार व्हटकर, मॅक्मिलन इंडियाच्या "नॉकआऊट चॅलेंज" या यशस्वी व्यक्तिमत्वांवरील पुस्तकात देशातल्या अनेक नामवंतांसह स्थान मिळवणारे ओरिसातले आय्एएस् अधिकारी नितीन जावळे, बुद्धिमत्ता ही कोणा एकाची खाजगी मालमत्ता नाही हे स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध करणारे जम्मू-काश्मिर केडरचे आय्एएस् अधिकारी पांडुरंग पोले, भारतीय परराष्ट्र सेवेतले सुगंध राजाराम चौगुले आणि राजेश स्वामी आणि रेल्वे सुरक्षा सेवेतले राजेंद्र रुपनवर वाचकांना भेटतात.
संस्कारांचा आणि जिद्दीचा वारसा घेऊन आलेल्या या अधिकाऱ्यांनी चाकोऱ्या ओलांडण्याचे धाडस केले आहे. सरकारी योजनाच, पण त्या राबवताना लोकसहभाग आणि पारदर्शकता या सूत्राचा आधार घेत त्यांनी एरवी टीकेचे लक्ष्य बलणाऱ्या प्रशासकीय प्रणालीला विश्वासर्हता मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याबरोबरच आपल्या नव्या कल्पनाही धडाडीने राबवल्या आहेत.
"राजमुद्रा"च्या नायकांच्या प्रवासातले कित्येक प्रसंग वाचकाला आपले वाटू शकतात. दहावीच्या परिक्षेत जेमतेम पन्नास टक्क्यांवर पोचणारे गुण असोत, इंग्रजी भाषेच्या वारुवर मांड ठोकण्यासाठी लागणारे कष्ट असोत अथवा साधनांचा अभाव असणाऱ्या व्यवस्थेशी मांडलेला संघर्ष असो. जिद्द, प्रतिकूलतेवर मात करण्याची विजिगिषू वृत्ती आणि स्वतःतला माणूस जपण्याची धडपड यातून "राजमुद्रा"चे नायक त्यांच्या आजूबाजूच्या व्यवस्थेपेक्षा वेगळे ठरतात.
पुस्तकाविषयी लिहीताना भोळेंनी म्हटल्या प्रमाणे, प्रशासकीय सेवेत निवड होईपर्यंत आयुष्यातील संघर्ष आणि त्यानंतर विकासात्मक प्रशासनाच्या अनुषंगाने दिलेले योगदान हा या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा गाभा आहे, हे जाणवत रहाते.
मर्यादांचे भान ठेवून देखील नागरीसेवा समाजपरिवर्तनाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलू शकतात अशी भूमिका घेऊन काम करणाऱ्या पुण्यातल्या द युनिक ऍकॅडमीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर वय, शिक्षण, अनुभव, आवडीनिवडी, कामाचे क्षेत्र अशा सीमारेषा ओलांडून काही करू पहाणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर ही "राजमुद्रा' एक आश्वासक ठसा ठेवेल.
(प्रथम प्रसिद्धी "सकाळ" पुणे -सप्टेंबर 2010)