Monday, November 21, 2016

ट्रॅक्‍स अँड साईन्स: गोष्ट एका खाणीची

शिराली माईन. लांबलचक पसरलेली. मॅंगेनीझचा विटकरी रंग अंगाखांद्यावर मिरवणारी. मॅकेन्नाज्‌ गोल्डची आठवण करून देणारी. अगदी पहिल्यांदा जेव्हा दांडेलीला गेलो तेव्हा जंगलाच्या अगदी ऐन मध्यावर आ वासून पडलेल्या या खाणीकडे जाणारा रस्ताच तेवढा पाहिला होता. कवळा केव्हजकडे जाताना. झाली यालाही वीसबावीस वर्ष. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरच एक मोठा बांबू किंवा लोखंडी बार आडवा लावलेला. शेजारी रखवालदारासाठी एक आडोसा. त्यानंतर आगंतुकांना मज्जाव. नाही म्हणायला रस्त्याला लागून असणाऱ्या टेकाडावरच्या ऍस्बेस्टॉसच्या पत्र्यांच्या घरात लुकलुकणारे एकदोन दिवे.
""तिकडे खाण आहे एक, मोठ्ठी,'' कोणीतरी माहिती दिली.
""खाण? जंगलात? इतक्‍या आत?''
""आहे,'' कोणाच्या तरी प्रश्‍नाला कोणीतरी उत्तर दिले.
विषय तेवढ्यावरच राहिला.
मधल्या काळात दांडेलीला आणखी एक दोनदा जाणं झालं. कोल्हापूरच्या सुनिल करकऱ्यांबरोबर. सुनिलचा जंगलांचा आणि प्राणीपक्षांचा अभ्यास मोठा. विशेषतः ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्सचा. जंगलात प्रत्यक्ष एखादा प्राणी पहाणं जितकं थरारक आहे, तितकाच जंगल वाचण्याचा अनुभवही थरारक असतो. त्यासाठी या ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्सच्या अभ्यासाची खूप मदत होते. अगदी रानवाटांवर उमटलेल्या पाऊलखुणांपासून ते झाडांच्या बुंध्यांवरच्या ओरखड्यांपर्यंत प्रत्येक खूण काहीतरी सांगत असते. कधी ती एखाद्या पट्टेरी वाघाच्या हालचालींची कहाणी असते तर कधी हत्तींच्या, अस्वलांच्या येण्याजाण्याची, कधी प्रत्यक्ष मिथिलेच्या राजकन्येला मोहात पाडणाऱ्या सुवर्णमृगाची कांती मिरवणाऱ्या चितळांच्या निवाऱ्याची.
बहुतेक सगळेजण पहातात तसा मीही वाघ पहिल्यांदा पाहिला तो चित्रात. चांदोबात किंवा त्याच्याही आधी लहान मुलांसाठी मोठ्या टायपात छापलेल्या पुस्तकात. पण पहिल्यांदा वाघ "अनुभवला' तो या शिराली माईन्स्‌च्या परिसरात. त्यावेळी जेव्हा दांडेलीला गेलो तेव्हा या खाणी बंद झाल्या होत्या. एका न्यायालयीन निर्णयानंतर कर्नाटकाच्या वनखात्याने ही कारवाई केली होती. शिराली माईन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता तो अडथळा नव्हता, रखवालदाराचा आडोसाही नव्हता आणि टेकाडावरची अॅस्बेस्टॉसची पत्र्याची घरेही नव्हती. कधीकाळी ती जिथे होती तिथे आता झाडोरा उगवून आला होता. वाघ "पहाण्याचा' तो ऑफ-लाईन अनुभव तिथल्या निसर्गासाठी किती महत्त्वाचा होता ते हळुहळु उलगडत गेलं.
पहाटेची वेळ होती. दवांत भिजलेल्या रानवाटांचा ओलसर वास अजूनही ताजा होता. कधीकाळी खाणीत येणाऱ्या ट्रकांनी आणि इतर अवजड यंत्रानी व्यापलेल्या त्या रस्त्याचं "वापरलेपण' निसर्ग आता पुसून टाकत होता. वाटेच्या दोन्ही बाजूला वाढलेलं गवत आणि त्याच्या मागच्या झाडाझुडपांमध्ये लपलेल्या प्राण्यापक्षांच्या हालचालींच्या खाणाखुणा शोधताना एकदम कुणाला तरी तो पहिल्यांदा दिसला. आदल्या रात्री सुनिलनी दिलेलं ट्रॅक्‍स ऍन्ड साईन्सवरचं लेक्‍चर बहुतेकांच्या बॅकअपमध्ये चांगलं ताजं होतं, त्यामुळे काहीतरी वेगळं शोधायची प्रत्येकाचीच घाई होती. निसर्गात ढवळाढवळ करायची नाही, अशी तंबी सुनिलसरांनी दिली होती. या शोधात कुणाला तरी तो ठसा दिसला. चांगला तळहाताएवढा अगदी छान उठून दिसणारा पावलाचा ठसा होता तो. वाघाचाच. शंकाच नको. काल रात्रीच स्लाईड पाहिल्या होत्या. ""सर.... वाघ.....'', कुणीतरी ओरडलं आणि आपापल्या शोधविश्‍वात असलेल्या त्या पंचवीस-तीस जणांची एकदम धावपळ झाली.

ओल्या लाल मातीवर उमटलेला तो ठसा अजूनही डोळ्यासमोर आहे. मग आजूबाजूला आणखी एखादा ठसा सापडतो का, त्याची शोधाशोध सुरू झाली. मग एक लेक्‍चरच सुरू झालं. आधी हा ठसा सौ. वाघांचा आहे की श्री. बिबट्या यांचा यावर खल झाला. कारण मादी वाघ आणि पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या यांच्या पायाचे ठसे बऱ्याचदा नवख्या निरिक्षकाला गोंधळात टाकतात. पगमार्कस्‌ किंवा प्राण्यांच्या पावलांच्या ठशांचे शास्त्र हा ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्समधला एक विलक्षण भाग आहे. ठसा जर सुस्पष्ट असेल तर त्या प्राण्याच्या शारिरिक स्थितीपासून ते त्याच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीपर्यंत काही अंदाज तज्ज्ञ बांधू शकतात.
ठसा अजूनही वाळून कडक झालेला नव्हता. त्यावरून तो आदल्या रात्रीचा असावा, असा अंदाज व्यक्त झाला. त्याचे फोटोबिटो काढून झाले. आता सगळ्यांचीच झोप उडाली होती. काही तासांपूर्वी आपण आत्ता जिथे उभे आहोत तिथे आजूबाजूला एका वाघीणीचा वावर होता. ती आत्ता या क्षणी तिथे नाही पण आपण तिच्या वाटेवर उभे आहोत. ती अजून जवळपास असू शकते किंवा नसूही शकते. बरोबर पिल्लं असल्याच्या काही खाणाखुणा निदान आजूबाजूला दिसलेल्या नाहीत त्यामुळे ती एकटीच असावी, असल्या काहीतरी चर्चा डोक्‍यात ठेवून आम्ही शिराली पॉइंटकडे मोर्चा वळवला.
शिराली पॉइंट ही त्या परिसरातली सगळ्यात उंच जागा. कर्नाटकाच्या वनखात्याने तिथे जरा साफसफाई करून एक छानसा ऑब्झर्वेशन पॉइंट उभा केलाय. आजूबाजूच्या चित्रात न खुपणारा. तिथून पश्‍चिमेला दिसतात हिरव्या रंगाच्या असंख्य छटांमध्ये मिसळून जाणाऱ्या निळ्या रंगाच्या असंख्य छटा. एखाद्या सर्जनशील कलाकाराला थेट आव्हान देणाऱ्या. थोडं चढून आपण त्या खाणीच्या माथ्यावर येतो आणि अवचित समोर हा हिरव्या-निळ्या रंगांचा पसारा उलगडतो.
तिथे जरा टेकून, पाठपिशव्यांमधल्या माकडखाण्याच्या पिशव्यांची तोंड मोकळी होतात न होतात तेवढ्यात सुनिलची हाक आली, "अरे.. हे पहा.. काय ते..' माकडखाणं बाजूला ठेवून घोळका पुन्हा सुनिलच्या दिशेला. गवतात एका ठिकाणी चार लेंडकं पडली होती. "वाघाची शी..' सुनिलनी आणखी माहिती पुरवली. "शीऽऽऽऽ...' असा एक सामुदायिक चित्कार निघाला. मग प्राण्यांच्या वावराच्या खाणाखुणांच्या शास्त्रात प्राण्याची विष्ठा सापडणे कसे महत्त्वाचे आहे, त्यातून त्या प्राण्याचा अधिवास, सवयींबद्दल कितीतरी गोष्टी समजतात, यावर सुनिलचं एक लेक्‍चर झालं. कोणीतरी उत्साहाने ते स्कॅटस्‌ कॅमेरा रोलच्या एका डबीत भरले, कॅम्पसाईटला गेल्यावर त्यांची नोंद करायला म्हणून.
शिराली माईन्स्‌च्या परिसरातला वाघाचा हा वावर खूप काही सांगून जाणारा होता. निसर्गातल्या अन्नसाखळीच्या सर्वात वरच्या टोकावर वाघ असतो. ज्या जंगलात वाघ आहे ते जंगल परिपूर्ण आहे असे मानले जाते. कारण वाघ तिथे रहातो याचे अनेक अर्थ असतात. वाघाचे भक्ष्य असणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या विपुलतेपासून ते त्यांना लागणाऱ्या गवताच्या विपुलतेपर्यंत. गवत आहे म्हणजे माती आहे. मातीचा पोत चांगला आहे. पाणी थांबते आहे. एक ना दोन.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत माणसानी खणून काढलेल्या, यंत्रांच्या वावरामुळे नैसर्गिक स्वरूप हरवून बसलेल्या त्या डोंगरात वाघ परत आला, हा निसर्गाच्या चिवट सर्जनक्षमतेचा परमोच्च बिंदू होता. "धर्मो रक्षति, रक्षितः' असं मनुस्मृती म्हणते. याच चालीवर "निसर्गो रक्षति, रक्षितः' असं म्हटलं गेलंय. (तुम्ही) निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग (तुमचे) रक्षण करेल.
निसर्ग स्वतःची काळजी घेतो; अगदी उजाड झालेला परिसरही पानाफुलांनी आणि प्राण्यापक्षांनी बहरून जातो याचं आणखी एक उदाहरण शिराली खाणींच्या स्वरूपात माझ्यासमोर उभं होतं. मात्र तिथे माणसाचा वावर नको. न्यायालयाच्या आदेशानंतर खाणी बंद करण्यात पुढाकार घेतलेले जी. सतीश नावाचे वनाधिकारी नंतर भेटले. शिराली माईन्स्‌च्या परिसरात वाघाच्या वावराच्या खाणाखुणा सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे "आम्ही फार काही केलं नाही. आम्ही फक्त एक्‍सटर्नल इंटरफिअरन्स थांबवला. नेचर रिज्युव्हेनेटस्‌ इटसेल्फ.'
आजही दांडेलीला भेट देणाऱ्या प्राणीप्रेमींसाठी शिराली माईन्स्‌ हा मस्ट एरिया आहे. तिथलं जंगल आता आणखी वाढलय. पुन्हा दांडेलीला जाणं झालं नाही, पण शिराली माईन्सच्या परिसरात जवळपास दोनशे पक्ष्यांची नोंद झाल्याचे अलिकडेच वाचलं. इतक्‍या जातींचे पक्षी तिथे दिसू शकतात. दांडेलीतलं पक्षीजग खरंच समृद्ध आहे. चोचीवर केळ्याच्या आकाराचं शिंग मिरवणारा धनेश, लांबलचक काळपट सोनेरी पिसं घेऊन उडणारा स्वर्गिय नर्तक आणि मुठीपेक्षाही लहान असणारा देखणा स्कार्लेट मिनिव्हेट इथे सहज दिसू शकतात. कुळगीच्या कॅम्पसाईटला काहीही न करता नुसतं बसून रहायचं म्हटलं तरी पन्नासएक पक्ष्यांची चेकलिस्ट बनू शकते. आता भूतकाळात जमी झालेल्या शिराली माईन्स्‌नी दांडेलीच्या पक्षीजीवनाला आणखी एक पैलू जोडलाय.
वाढत्या, प्रसंगी वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसानी निसर्गाशी लाखो वर्षांपासून भांडण मांडलं आहे. निसर्गावर मात करण्याची त्याची इच्छा आहे. माणसाचा भौतिक विकास आणि निसर्गाचं नैसर्गिक असणं हातात हात घालून कसं चालेल, यावर खूप लिहिलं बोललं गेलंय, जातंय, जाईल. या मुद्‌द्‌याला थेट उत्तरं मिळतील न मिळतील. निसर्ग नाउमेद होत नाही. माणूस थांबतो तिथे निसर्ग आपलं काम सुरू करतो; नव्या उमेदीनं. काय आणि किती गमावलंय यात गुंतून न पडता पुढचा रस्ता शोधतो. मला हे दाखवून दिलं, शिराली माईन्स्‌च्या कधीच न दिसलेल्या वाघीणीनी.