Monday, May 21, 2012

पुणेकरांचे एव्हरेस्ट मॉडेल



जगातल्या सर्वोच्च शिखरावर काल महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा रोवला गेला आहे. पुणे पंचक्रोशीतल्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल बारा साहसवीरांनी एकाच दिवशी एव्हरेस्ट सर केले हा एव्हरेस्टच्या इतिहासातलाही दुर्मिळ दिवस ठरावा. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा पराक्रम आहे. गेल्या अर्धदशकाहून अधिक काळ भारतीय गिर्यारोहकांच्या एव्हरेस्ट मोहिमा सुरू आहेत. गिरीेप्रेमी आणि सागरमाथा या संस्थांनी या क्षेत्रातील भारतीयांच्या कामगिरीचा आणखी एक सुवर्णअध्याय लिहिला आहे. गिर्यारोहकांची संख्या आणि ते सगळे एकाच गावातले असणे याही पलीकडे जाणारे या मोहिमांचे वैशिष्ठ्य म्हणजे या नागरी मोहिमा आहेत. साहस, उत्सफूर्तता आणि उपक्रमशीलता यांना एका सूत्रात बांधणाऱ्या या मोहीमा सर्वार्थाने लोकाश्रयावर झालेल्या आहेत. गेल्या शनिवारी (दि. 19 मे 2012) सकाळी या तरूणांनी जेव्हा एव्हरेस्टवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला त्यावेळी या मोहिमांशी तन-मन-धनाने जोडल्या गेलेल्या हजारो पुणेकरांच्या मनात एव्हरेस्टवर पाऊल ठेवल्याची भावना निर्माण झाली असणार. हे श्रेय सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आहे. लांब कुठेतरी अनगड पर्वतरांगांमध्ये चालणाऱ्या या खेळात या गिर्यारोहकांनी अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकाचाही सहभाग मिळवला. एव्हरेस्ट सर करण्याच्या स्वप्नीशी हा सामान्य माणूसही जोडला गेला. राव पुरसे नसतील तर गावाला बरोबर घेऊन अगदी एव्हरेस्टही गाठता येते, हे या "डोंगरातल्या माणसांनी" आणखी एकदा दाखवून दिले आहे.

गावाला जोडून घेण्याच्या गिरीप्रेमींच्या या एव्हरेस्ट मॉडेलचाही या निमित्ताने अभ्यास व्हावा. साहसाला उत्सफूर्ततेच्या पातळीवरून सार्वत्रिक सहभागाच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले आहे. साहस आणि उत्सफूर्तता निव्वळ जल्लोषाच्या पातळीवर राहाणार नाही याची काळजी घेण्याचा शहाणपणाही इथे आहे. प्रामाणिक पारदर्शकता आणि सुस्पष्ट ध्येय एवढा एकच मुद्दा या प्रयत्नांमध्ये सातत्याने दिसत रहातो. अडचणींनी डगमगून न जाता ठरवलेल्या वेळापत्रकात बदल न करण्याचा या गिर्यारोहकांचा निश्‍चयच त्यांना एव्हरेस्टवर घेऊन गेला आहे.

तेन्झिंग नोर्गे आणि एडमंड हिलरींच्या कितीतरी आधी, 1924मध्ये एव्हरेस्ट सर करण्याचा पहिला प्रयत्न करणारे ब्रिटीश गिर्यारोहक जॉर्ज मेलरी यांचा एक किस्सा सांगतात. एव्हरेस्टच्या त्या अयशस्वी मोहीमेत अँड्रयू आयर्विन या आपल्या सहकाऱ्यासह बेपत्ता झालेल्या मेलरींना मोहीमेच्या आधी "कशाला एवढा खटाटोप'', अशी विचारणा करणाऱ्या कुणा एकाला मेलरींनी दिलेले उत्तर, हा प्रश्‍न विचारणाऱ्यांना आजही ऐकवले जाते. मेलरी म्हणाले होते, "बीकॉज इट इज देअर'' ---कारण ते (शिखर) तिथे आहे म्हणून. एव्हरेस्ट विजयाच्या निमित्ताने वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्यांसमोर प्रश्‍न उभे करणाऱ्यांना ही आठवण आवर्जून सांगायला हवी.

लोकांच्या सहकार्यावर उभे राहिलेले गिरीप्रेमींचे मोहीम व्यावस्थापनाचे हे एव्हरेस्ट मॉडेल अन्य समाजोपयोगी कामांसाठी उपयोगी ठरेल का हे या निमित्ताने पहायला हवे. कल्याणकारी राज्याच्या दिशेने सुरू झालेला विकासाचा प्रवास जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे ज्या वळणावर येऊन उभा आहे, त्या वळणावर ही गरज विशेषत्वाने अधोरेखीत होते आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत विकासाच्या, बदलाच्या असंख्य प्रयत्नांना साथ दिली आहे, देत आहे. महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले होते. एखाद्या कामाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्यांची महाराष्ट्रात वानवा नाही. प्रसंगी 'एकला चालो रे...' अशी भुमिका घेऊन आपले काम करत रहाणाऱ्यांचीही संख्याही मोठी आहे. कोकणाच्या किनाऱ्यापासून सातपुड्याच्या पर्वत रांगांपर्यंतचा महाराष्ट्राचा कोणताही भाग याला अपवाद नाही. आस्मानी आणि सुलतानी या दोन्ही मुद्‌द्‌यांशी झगडत बदल घडवून आणणारे असंख्य हात आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांनी डोंगर राखले आहेत, पाणी जिरवले आहे, गावाचा चेहरा बदलायचा प्रयत्न केला आहे, गरीबाला आत्मसन्मान देणारी आर्थिक पत निर्माण केली आहे, माणसांना शिकवले आहे. मात्र आजही यातले अनेक प्रयोग केवळ प्रकाशाच्या पुंजक्‍यांच्या स्वरूपात उभे आहेत. कारणे अनेक असतील. कुठे नेतृत्वाच्या कुवतीचा प्रश्‍न असेल, कुठे बदल समजावून घेण्याचा वेग कमी पडत असेल. मूल्यव्यवस्था बदलते आहे. समाजासमोरच्या आव्हानांचे स्वरूपही बदलते आहे. अशा वेळी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला आपल्या मुद्द्‌याबरोबर जोडण्याचा प्रयत्न करणारी, आपल्या प्रयत्नांशी सुसंगत असणारी आणि साहस, उत्सफूर्तता आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीवर आधारलेली नवी भाषा निर्माण करण्याचा प्रयत्न करता येईल का, याचा विचारही एव्हरेस्टविरांच्या विजयाच्या आनंदात सहभागी होताना करायला हवा.