Sunday, December 18, 2016

ट्रॅक्‍स अँड साईन्स : 'सिंहाचा वाटा'

भारत हा जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश आहे जिथे बृहतमार्जारकुलातले वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी सापडतात. देशाच्या पश्‍चिम टोकाला जुनागडजवळचा गीर हा सिंहांचा देश आहे. पश्‍चिम घाटांच्या सदाहरित अरण्यांपासून ते मध्य भारतातली, विदर्भातली पानझडींची वने, पश्‍चिम बंगालमधले सुंदरबनाचे पाणथळ प्रदेश ते आसाममधल्या अरण्यांपर्यंत वाघांचा वावर आहे. सिंहांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशांमध्ये वाघ नाही आणि तुर्कस्तानापासून ते बर्फाळ सैबेरियापर्यंत आणि आग्नेय आशियातल्या जावा आणि बाली बेटांमध्ये पसरलेल्या भूप्रदेशात सिंह नाही. भारतातल्या जैवविविधतेचे महत्त्व या एकाच मुद्‌द्‌याने अधोरेखीत व्हावे.
हे आज आठवायचे कारण म्हणजे गीरच्या अभयारण्याभोवतीच्या ईको-सेन्सेटिव्ह झोनचा (पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनाशील भूभाग -ईएसझेड) आकार कमी करण्याच्या प्रस्तावावरून सुरू असलेली चर्चा. गीर हे आशियायी सिंहांचे (शास्त्रीय नावः पॅंथेरा लिओ पर्सिका) शेवटचे वसतीस्थान. या गीर अभयारण्याभोवतीचा सिंहांच्या वावराच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला भूभाग आक्रसत गेला तर त्याचे विपरीत परिणाम होतील, अशी भिती वन्यजीव अभ्यासकांना वाटते आहे. यातून अनर्थ घडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्राण्यापक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या एका मित्राबरोबर अशाच गप्पा मारताना त्यानी केलेलं एक विधान असंच लक्षात राहीलं होतं. प्राण्यांना हद्दी कळत नाहीत, असं तो कुठल्यातरी संदर्भात बोलताना म्हणाला होता. होतं काय, अभयारण्याच्या सीमांना लागून अगदी तस्संच दिसणारं आणि वागणारं रान असतं. फरक असतो तो त्या जमिनीच्या आणि त्यावरच्या झाडांच्या, गवताच्या मालकीचा. अभयारण्यात ती मालकी सरकारची असते, आणि त्यापलीकडे कोणा एका व्यक्तीची, संस्थेची असते. नकाशावर या सीमा छान आखलेल्या पण असतात. प्रश्‍न इतकाच असतो की ज्या प्राण्यांना सुरक्षितपणे वावरता यावं म्हणून नकाशांवर अभयारण्यांच्या सीमा रेखाटल्या जातात त्यांना माणसांची भाषा वाचता येत नाही, पर्यायाने अभयारण्य कुठे संपतं ते त्यांना कळत नाही आणि अभयारण्याला लागून असलेलं अभयारण्यासारखंच रान त्यांना आपल्यासाठी नाही, हेही त्यांना समजत नाही; आणि ते माणसांच्या जमिनीवर "आक्रमण' करतात. अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या वनांना लागून असणाऱ्या जमिनींचा अनिर्बंध "विकास' झाला, माणसांचा वावर वाढला, त्या जमिनी वापरण्याच्या पद्धतीत, तिथल्या पीक पद्धतीत, तिथल्या बांधकामांत, नैसर्गिक स्त्रोतांच्या वापराच्या प्रमाणात आजूबाजूच्या पर्यावरणाशी विसंगत ठरणारे बदल झाले; तर त्याचे परिणाम संरक्षित वनांनाही भोगावे लागतात. अभयारण्यांच्या शेजारच्या जमिनींवरही म्हणून काही निर्बंध असावेत असा विचार स्वीकारला गेला. हा ईएसझेड.
वनांच्या आजूबाजूलाही प्राण्यांचा वावर असतो. काहीवेळा दोन अरण्यांना जोडणारे वनांचे पट्टे असतात. प्राण्यांच्या वावराचा विचार केला तर हे पेट्‌ट्‌ही खूप महत्त्वाचे ठरतात. या सगळ्या जमिनी प्राण्यांच्या भवतालाचा भाग असतो आणि म्हणून तो जपला जावा, असं वन्यजीव अभ्यासकांना वाटतं. गीरच्या संदर्भात अलिकडे आलेल्या बातम्यांनुसार स्थानिक वनखात्याला गीर भोवतालचा ईएसझेड आठ ते अठरा किलोमिटरवरून अवघ्या अर्ध्या किलोमिटवर आणायचाय. त्यामुळे सिंहप्रेमी अभ्यासक अस्वस्थ आहेत. असं घडलं तर गीरच्या परिसरातला सिंहांचा वावर आक्रसेल, असं त्यांचं मत आहे.
गीरच्या सिंहांचाही एक इतिहास आहे. आशियायी सिंहांसाठी काही भूभाग राखून ठेवण्याची मूळ कल्पना भारताच्या इतिहासात ज्याच्या नावासमोर (दडपशाही, हुकूमशाहीतच्या अर्थाने) "शाही' हा शब्द जोडला जातो त्या लॉर्ड कर्झनची. जुनागडच्या महाराजांनी कर्झनच्या कल्पनेनुसार सासण-गीरच्या परिसरात सिंहांच्या शिकारीला बंदी करून जंगलच्या राजाला अभय दिलं. ही घटना विसाव्या शतकाच्या सुरवातीची. त्याकाळात गीर परिसरात ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या बरोबरीने शेकडो सिंहांची शिकार केल्याच्या अनेक नोंदी सापडतात. गीरमध्ये अवघे वीस सिंह उरले आहेत अशी 1913च्या आसपासची एक नोंद मला या संदर्भात वाचताना मिळाली. गीरला अभयारण्याचा दर्जा मिळाला 1965 मध्ये. म्हशी किंवा रेड्यांच्या भक्ष्याचे आमिष दाखवून तिथे "लायन शो' व्हायचे. वीस-बावीस वर्ष ते चालू होते.
सिंहांसाठी माहिती असलेलं गीर आज देशातला जैवविविधतेचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. एका नोंदीनुसार साडेतेवीसशेपेक्षा जास्त लहानमोठे प्राणी, तीनशे जातींचे पक्षी, पस्तीसएक सपरटे आणि दोन हजारांच्या आसपास किटकांच्या प्रजाती आज गीरमध्ये नांदत आहेत. इथे एक मगर प्रजनन केंद्रही आहे.
भारतातली अरण्यं आक्रसत चालली आहेत, असे अनेक अभ्यास दर्शवतात. वनक्षेत्र किती असावं याचे काही निकष आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडीयाने 2013मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशातल्या 21 टक्‍क्‍यांपेक्षा थोडी जास्त जमीन वनांखाली होती. यात वनांखालची सर्वाधिक जमीन होती मिझोराममध्ये. आणि सगळ्यात कमी होती पंजाब आणि हरियानात. त्या आकडेवारीप्रमाणे गुजराथमध्ये जवळपास साडेसात टक्के आणि महाराष्ट्रात साडेसोळा टक्के जमीनी वनांखाली होत्या. गीरच्या सभोवतालचा ईको-सेन्सेटिव्ह झोन कमी करण्याच्या निर्णयाबद्दल वन्यजीव अभ्यासकांच्या मनात असलेल्या भितीला कदाचित ही पार्श्‍वभूमी आहे.
दुसऱ्या एका बातमी नुसार गेल्या काही महिन्यांपासून गीर आणि गिरनार या दोन अभयारण्यांना युनेस्कोची मान्यता मिळावी असे प्रयत्न चालले आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे म्हणे. पाठोपाठ या दोन्ही बातम्या वाचल्यानंतर त्याची संगती लावणं जरा कठीणच आहे. अभयारण्याला लागून असणाऱ्या परिसरातला "विकास' पूरक राहीला नाही तर पर्यटकांना आकर्षित करण्यासारखं काय राहील कोण जाणे.. पर्यटन वाढवून रोजगार निर्माण करून अभयारण्याच्या परिसरातल्या माणसांच्याही जगण्याची दर्जा वाढवण्यात गैर काहीच नाही. पण हे करत असताना ज्या सिंहांसाठी पर्यटकांनी यावं असं आपल्याला वाटतंय त्या सिंहांच्या वाट्याचा विचारही करायला हवा.

Tuesday, December 13, 2016

ट्रॅकस्‌ अँड साईन्सः एलेफंटाईन ईश्‍यू

नागालॅंड आणि हिमाचलचे वनाधिकारी गेल्या महिन्यापासून एका भलत्याच पेचप्रसंगाला तोंड देत आहेत. एकमेकांपासून जवळपास हजारबाराशे मैलांवर असलेल्या या दोन राज्यांत साम्य शोधायला गेलं तर बऱ्याच गोष्टी सापडतील. म्हणजे दोन्हीकडे जंगलं आहेत. डोंगर आहेत. नद्या आहेत. पण हे साम्य या ढोबळ मुद्‌द्‌यावरच संपतं. तर झालं काय, हिमाचलच्या वनखात्याने मणीपूर, अरूणाचल प्रदेश आणि नागालॅंडच्या वनखात्याला आपल्याकडची माकडं देऊ केली. हिमाचलच्या वेगवेगळ्या भागांत उच्छाद मांडणाऱ्या या कपीकुलोत्पन्नांना लांबवर पाठवून देण्यावाचून बहुदा त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नसणार. मग हिमाचलातल्या जंगल खात्याच्या रावसाहेबांनी अनुक्रमे मणीपूर, अरूणाचल प्रदेश आणि नागालॅंडच्या जंगल खात्याच्या रावसाहेबांबरोबर पत्रव्यवहार केला. कसंही करा पण त्यांना आमची माकडं घ्याच, अशी गळच घातली. या आधी त्यांनी आणखी कोणकोणत्या राज्यांना भेटीदाखल आपल्याकडची माकडं देण्याचा प्रयत्न केला याची माहिती उपलब्ध नसली तरी या तिन्ही राज्यांनी हिमाचलने देऊ केलेली ही अनोखी भेट स्वीकारण्याची तयारी दर्शवली. हिमाचलमधल्या दोन एक लाख माकडांपैकी तीस हजार माकडं ईशान्येकडच्या तीन राज्यांत रिलोकेट करायची, अशी कल्पना होती. पत्रव्यवहार सुरू होता. काही मिटींगापण झाल्या. आणि अचानक मामला थंडावला. नागालॅंडच्या जंगल खात्याच्या रावसाहेबांनी हिमाचलला रिटर्न गिफ्ट देऊ केली. नागालॅंडच्या वोखा जिल्ह्यात जवळपास दिडशे हत्ती आहेत. तुमच्याकडच्या शेतकऱ्यांना सतावणारी माकडं आम्ही घेतो, त्या बदल्यात आमच्याकडच्या शेतकऱ्यांना सतावणारे काही हत्ती तुम्ही घ्या. असा साधा सोपा प्रस्ताव नागालॅंडनी हिमाचलसमोर मांडला. आणि एकदम एक "एलेफंटाईन ईश्‍यू'च तयार झाला. हिमाचल हा काही हत्तींचा देश नाही. त्यामुळे तिथल्या वनाधिकाऱ्यांचा हॅम्लेट झाला आहे. अजूनतरी यावर काही तोडगा निघाल्याचं ऐकिवात नाही. हिमाचलमधला माकडांचा प्रश्‍न गंभीर आहे. जवळपास तेवीसशे गावांतल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणे माकडांच्या त्रासाला कंटाळून शेतीच पडीक ठेवलीय. माकडांच्या हल्ल्यात शेकड्यानी माणसं जखमी झाली आहेत, आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला लाखावारी रुपयांचा खर्च आहे. गेल्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने उपद्रवी माकडं मारायची परवानगी दिली. सहा महिन्यांकरीता ही परवानगी होती. पण जनमत साक्षात महाबली हनुमंताच्या वंशजांविरूद्ध शस्त्र उचलण्याच्या विरोधात होते. त्यामुळे उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी रोख पैशाचे आमिष असूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
हिमाचलमध्ये माकडांनी मांडलेला उच्छाद किंवा नागालॅंडमध्ये हत्तींकडून होणारी पिकांची नासधूस हा काही आजचा प्रश्‍न नाही. मनुष्यप्राणी आणि अन्य प्राणी यांच्यातला हा संघर्ष सजीवसृष्टीइतकाच जुना आहे. तो जगात अनेक ठिकाणी आहे. विशेषतः माकडांनी वाढत्या मानवी वस्त्यांना कधीच आपलेसे केल्याचे तज्ज्ञ सांगतात. अन्य प्राण्यांच्या बाबतीत बोलायचे तर राखीव ठेवलेली अरण्ये कमी पडायला लागली; गवताळ रानांपासून ते घनदाट सदाहरीत अरण्यांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे अधिवास धोक्‍यात आले, भक्ष्य कमी झाले, पाणवठे लवकर सुकायला लागले तसे यातले काही प्राणी मानवी वस्तीकडे वळले. यातही बिबट्यासारख्या काही प्राण्यांच्या टिकून राहण्याच्या आकांक्षेने मानवी अतिक्रमणांवरही मात केली. बिबट्या उसाच्या फडात रहायला शिकला. उसाच्या फडात बिबट्याची पिल्लं सापडायला लागली. हत्ती नव्या जागा शोधायला लागले. विणीच्या हंगामासाठी स्थलांतर करणारे पक्षी नेहमीच्या जागांकडे फिरकेनासे झाले. वाघांच्या बाबतीत मात्र अगदी उलट घडत गेलं. एकटं रहाण्याकडे स्वभावतः कल असलेला वाघ जसा अधिवासांबरोबर आक्रसत गेला, तसेच माळढोकसारखे पक्षीही संपत गेले. ते इतके कमी झाले की दुर्मीळ प्राण्यापक्षांच्या यादीत जाऊन बसले. हे झालं मोठ्यांचं. जैवसाखळीत तितकेच महत्त्वाचे असलेल्या कित्येक छोटे मोठे प्राणी पक्षी, सरपटे, मासे, कोळी, कृमी, झाडं, झुडपांना या अतिक्रमणासमोर शरणागती पत्करावी लागली. बरेचसे दुर्मीळ झाले, काही चित्रांतच जाऊन बसले. लहानपणी सगळ्यात आधी भेटणारी चिमणी शहरांतून आता हद्दपारच झाली आहे आणि रामायणातल्या जटायूशी नातं सांगणारी गिधाडंही.
विजिगीषू वृत्तीने बाहेर पडणाऱ्या या प्राण्यांचा माणसाशी संबंध आल्यावर काही अपघातही घडले. पण तरीही मानवी वस्तीत शिरणाऱ्या माकडं, नीलगायी, रानडुकरं यांना व्हर्मिन म्हणजे उपद्रवी ठरवून मारून टाकणे, हा उपाय नक्कीच नाही. गेली कित्येक वर्ष जगभरातली शहाणी माणसं माणूस आणि प्राण्यांमधल्या संघर्षावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. या संघर्षाला खूप बाजू आहेत, बोचणाऱ्या कडा आहेत, माणसाच्याही जगण्याच्या लढाईचे संदर्भ आहेत. पुन्हा जगाच्या एका बाजूला सापडलेली उत्तरं दुसऱ्या बाजूला उपयोगी ठरतील याची शाश्‍वती असूच शकत नाही. पृथ्वीवर, इथल्या अरण्यांवर, पाण्यावर, तिथल्या हवेवर आपल्या इतकाच अधिकार असणाऱ्या प्राण्यापक्षांना, झाडाझुडपांनाही आपल्याबरोबर सामावून घेण्याचा विचार माणसालाच करावा लागणार आहे. त्यावरचे उपाय सापडेपर्यंत शोधावे लागणार आहेत, अन्यथा सर्वांभूती परमेश्‍वर पहाणाऱ्या संतांचा वारसा सांगायचा कशाला?

Monday, November 21, 2016

ट्रॅक्‍स अँड साईन्स: गोष्ट एका खाणीची

शिराली माईन. लांबलचक पसरलेली. मॅंगेनीझचा विटकरी रंग अंगाखांद्यावर मिरवणारी. मॅकेन्नाज्‌ गोल्डची आठवण करून देणारी. अगदी पहिल्यांदा जेव्हा दांडेलीला गेलो तेव्हा जंगलाच्या अगदी ऐन मध्यावर आ वासून पडलेल्या या खाणीकडे जाणारा रस्ताच तेवढा पाहिला होता. कवळा केव्हजकडे जाताना. झाली यालाही वीसबावीस वर्ष. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरच एक मोठा बांबू किंवा लोखंडी बार आडवा लावलेला. शेजारी रखवालदारासाठी एक आडोसा. त्यानंतर आगंतुकांना मज्जाव. नाही म्हणायला रस्त्याला लागून असणाऱ्या टेकाडावरच्या ऍस्बेस्टॉसच्या पत्र्यांच्या घरात लुकलुकणारे एकदोन दिवे.
""तिकडे खाण आहे एक, मोठ्ठी,'' कोणीतरी माहिती दिली.
""खाण? जंगलात? इतक्‍या आत?''
""आहे,'' कोणाच्या तरी प्रश्‍नाला कोणीतरी उत्तर दिले.
विषय तेवढ्यावरच राहिला.
मधल्या काळात दांडेलीला आणखी एक दोनदा जाणं झालं. कोल्हापूरच्या सुनिल करकऱ्यांबरोबर. सुनिलचा जंगलांचा आणि प्राणीपक्षांचा अभ्यास मोठा. विशेषतः ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्सचा. जंगलात प्रत्यक्ष एखादा प्राणी पहाणं जितकं थरारक आहे, तितकाच जंगल वाचण्याचा अनुभवही थरारक असतो. त्यासाठी या ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्सच्या अभ्यासाची खूप मदत होते. अगदी रानवाटांवर उमटलेल्या पाऊलखुणांपासून ते झाडांच्या बुंध्यांवरच्या ओरखड्यांपर्यंत प्रत्येक खूण काहीतरी सांगत असते. कधी ती एखाद्या पट्टेरी वाघाच्या हालचालींची कहाणी असते तर कधी हत्तींच्या, अस्वलांच्या येण्याजाण्याची, कधी प्रत्यक्ष मिथिलेच्या राजकन्येला मोहात पाडणाऱ्या सुवर्णमृगाची कांती मिरवणाऱ्या चितळांच्या निवाऱ्याची.
बहुतेक सगळेजण पहातात तसा मीही वाघ पहिल्यांदा पाहिला तो चित्रात. चांदोबात किंवा त्याच्याही आधी लहान मुलांसाठी मोठ्या टायपात छापलेल्या पुस्तकात. पण पहिल्यांदा वाघ "अनुभवला' तो या शिराली माईन्स्‌च्या परिसरात. त्यावेळी जेव्हा दांडेलीला गेलो तेव्हा या खाणी बंद झाल्या होत्या. एका न्यायालयीन निर्णयानंतर कर्नाटकाच्या वनखात्याने ही कारवाई केली होती. शिराली माईन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता तो अडथळा नव्हता, रखवालदाराचा आडोसाही नव्हता आणि टेकाडावरची अॅस्बेस्टॉसची पत्र्याची घरेही नव्हती. कधीकाळी ती जिथे होती तिथे आता झाडोरा उगवून आला होता. वाघ "पहाण्याचा' तो ऑफ-लाईन अनुभव तिथल्या निसर्गासाठी किती महत्त्वाचा होता ते हळुहळु उलगडत गेलं.
पहाटेची वेळ होती. दवांत भिजलेल्या रानवाटांचा ओलसर वास अजूनही ताजा होता. कधीकाळी खाणीत येणाऱ्या ट्रकांनी आणि इतर अवजड यंत्रानी व्यापलेल्या त्या रस्त्याचं "वापरलेपण' निसर्ग आता पुसून टाकत होता. वाटेच्या दोन्ही बाजूला वाढलेलं गवत आणि त्याच्या मागच्या झाडाझुडपांमध्ये लपलेल्या प्राण्यापक्षांच्या हालचालींच्या खाणाखुणा शोधताना एकदम कुणाला तरी तो पहिल्यांदा दिसला. आदल्या रात्री सुनिलनी दिलेलं ट्रॅक्‍स ऍन्ड साईन्सवरचं लेक्‍चर बहुतेकांच्या बॅकअपमध्ये चांगलं ताजं होतं, त्यामुळे काहीतरी वेगळं शोधायची प्रत्येकाचीच घाई होती. निसर्गात ढवळाढवळ करायची नाही, अशी तंबी सुनिलसरांनी दिली होती. या शोधात कुणाला तरी तो ठसा दिसला. चांगला तळहाताएवढा अगदी छान उठून दिसणारा पावलाचा ठसा होता तो. वाघाचाच. शंकाच नको. काल रात्रीच स्लाईड पाहिल्या होत्या. ""सर.... वाघ.....'', कुणीतरी ओरडलं आणि आपापल्या शोधविश्‍वात असलेल्या त्या पंचवीस-तीस जणांची एकदम धावपळ झाली.

ओल्या लाल मातीवर उमटलेला तो ठसा अजूनही डोळ्यासमोर आहे. मग आजूबाजूला आणखी एखादा ठसा सापडतो का, त्याची शोधाशोध सुरू झाली. मग एक लेक्‍चरच सुरू झालं. आधी हा ठसा सौ. वाघांचा आहे की श्री. बिबट्या यांचा यावर खल झाला. कारण मादी वाघ आणि पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या यांच्या पायाचे ठसे बऱ्याचदा नवख्या निरिक्षकाला गोंधळात टाकतात. पगमार्कस्‌ किंवा प्राण्यांच्या पावलांच्या ठशांचे शास्त्र हा ट्रॅक्‍स अॅन्ड साईन्समधला एक विलक्षण भाग आहे. ठसा जर सुस्पष्ट असेल तर त्या प्राण्याच्या शारिरिक स्थितीपासून ते त्याच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीपर्यंत काही अंदाज तज्ज्ञ बांधू शकतात.
ठसा अजूनही वाळून कडक झालेला नव्हता. त्यावरून तो आदल्या रात्रीचा असावा, असा अंदाज व्यक्त झाला. त्याचे फोटोबिटो काढून झाले. आता सगळ्यांचीच झोप उडाली होती. काही तासांपूर्वी आपण आत्ता जिथे उभे आहोत तिथे आजूबाजूला एका वाघीणीचा वावर होता. ती आत्ता या क्षणी तिथे नाही पण आपण तिच्या वाटेवर उभे आहोत. ती अजून जवळपास असू शकते किंवा नसूही शकते. बरोबर पिल्लं असल्याच्या काही खाणाखुणा निदान आजूबाजूला दिसलेल्या नाहीत त्यामुळे ती एकटीच असावी, असल्या काहीतरी चर्चा डोक्‍यात ठेवून आम्ही शिराली पॉइंटकडे मोर्चा वळवला.
शिराली पॉइंट ही त्या परिसरातली सगळ्यात उंच जागा. कर्नाटकाच्या वनखात्याने तिथे जरा साफसफाई करून एक छानसा ऑब्झर्वेशन पॉइंट उभा केलाय. आजूबाजूच्या चित्रात न खुपणारा. तिथून पश्‍चिमेला दिसतात हिरव्या रंगाच्या असंख्य छटांमध्ये मिसळून जाणाऱ्या निळ्या रंगाच्या असंख्य छटा. एखाद्या सर्जनशील कलाकाराला थेट आव्हान देणाऱ्या. थोडं चढून आपण त्या खाणीच्या माथ्यावर येतो आणि अवचित समोर हा हिरव्या-निळ्या रंगांचा पसारा उलगडतो.
तिथे जरा टेकून, पाठपिशव्यांमधल्या माकडखाण्याच्या पिशव्यांची तोंड मोकळी होतात न होतात तेवढ्यात सुनिलची हाक आली, "अरे.. हे पहा.. काय ते..' माकडखाणं बाजूला ठेवून घोळका पुन्हा सुनिलच्या दिशेला. गवतात एका ठिकाणी चार लेंडकं पडली होती. "वाघाची शी..' सुनिलनी आणखी माहिती पुरवली. "शीऽऽऽऽ...' असा एक सामुदायिक चित्कार निघाला. मग प्राण्यांच्या वावराच्या खाणाखुणांच्या शास्त्रात प्राण्याची विष्ठा सापडणे कसे महत्त्वाचे आहे, त्यातून त्या प्राण्याचा अधिवास, सवयींबद्दल कितीतरी गोष्टी समजतात, यावर सुनिलचं एक लेक्‍चर झालं. कोणीतरी उत्साहाने ते स्कॅटस्‌ कॅमेरा रोलच्या एका डबीत भरले, कॅम्पसाईटला गेल्यावर त्यांची नोंद करायला म्हणून.
शिराली माईन्स्‌च्या परिसरातला वाघाचा हा वावर खूप काही सांगून जाणारा होता. निसर्गातल्या अन्नसाखळीच्या सर्वात वरच्या टोकावर वाघ असतो. ज्या जंगलात वाघ आहे ते जंगल परिपूर्ण आहे असे मानले जाते. कारण वाघ तिथे रहातो याचे अनेक अर्थ असतात. वाघाचे भक्ष्य असणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या विपुलतेपासून ते त्यांना लागणाऱ्या गवताच्या विपुलतेपर्यंत. गवत आहे म्हणजे माती आहे. मातीचा पोत चांगला आहे. पाणी थांबते आहे. एक ना दोन.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत माणसानी खणून काढलेल्या, यंत्रांच्या वावरामुळे नैसर्गिक स्वरूप हरवून बसलेल्या त्या डोंगरात वाघ परत आला, हा निसर्गाच्या चिवट सर्जनक्षमतेचा परमोच्च बिंदू होता. "धर्मो रक्षति, रक्षितः' असं मनुस्मृती म्हणते. याच चालीवर "निसर्गो रक्षति, रक्षितः' असं म्हटलं गेलंय. (तुम्ही) निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग (तुमचे) रक्षण करेल.
निसर्ग स्वतःची काळजी घेतो; अगदी उजाड झालेला परिसरही पानाफुलांनी आणि प्राण्यापक्षांनी बहरून जातो याचं आणखी एक उदाहरण शिराली खाणींच्या स्वरूपात माझ्यासमोर उभं होतं. मात्र तिथे माणसाचा वावर नको. न्यायालयाच्या आदेशानंतर खाणी बंद करण्यात पुढाकार घेतलेले जी. सतीश नावाचे वनाधिकारी नंतर भेटले. शिराली माईन्स्‌च्या परिसरात वाघाच्या वावराच्या खाणाखुणा सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे "आम्ही फार काही केलं नाही. आम्ही फक्त एक्‍सटर्नल इंटरफिअरन्स थांबवला. नेचर रिज्युव्हेनेटस्‌ इटसेल्फ.'
आजही दांडेलीला भेट देणाऱ्या प्राणीप्रेमींसाठी शिराली माईन्स्‌ हा मस्ट एरिया आहे. तिथलं जंगल आता आणखी वाढलय. पुन्हा दांडेलीला जाणं झालं नाही, पण शिराली माईन्सच्या परिसरात जवळपास दोनशे पक्ष्यांची नोंद झाल्याचे अलिकडेच वाचलं. इतक्‍या जातींचे पक्षी तिथे दिसू शकतात. दांडेलीतलं पक्षीजग खरंच समृद्ध आहे. चोचीवर केळ्याच्या आकाराचं शिंग मिरवणारा धनेश, लांबलचक काळपट सोनेरी पिसं घेऊन उडणारा स्वर्गिय नर्तक आणि मुठीपेक्षाही लहान असणारा देखणा स्कार्लेट मिनिव्हेट इथे सहज दिसू शकतात. कुळगीच्या कॅम्पसाईटला काहीही न करता नुसतं बसून रहायचं म्हटलं तरी पन्नासएक पक्ष्यांची चेकलिस्ट बनू शकते. आता भूतकाळात जमी झालेल्या शिराली माईन्स्‌नी दांडेलीच्या पक्षीजीवनाला आणखी एक पैलू जोडलाय.
वाढत्या, प्रसंगी वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसानी निसर्गाशी लाखो वर्षांपासून भांडण मांडलं आहे. निसर्गावर मात करण्याची त्याची इच्छा आहे. माणसाचा भौतिक विकास आणि निसर्गाचं नैसर्गिक असणं हातात हात घालून कसं चालेल, यावर खूप लिहिलं बोललं गेलंय, जातंय, जाईल. या मुद्‌द्‌याला थेट उत्तरं मिळतील न मिळतील. निसर्ग नाउमेद होत नाही. माणूस थांबतो तिथे निसर्ग आपलं काम सुरू करतो; नव्या उमेदीनं. काय आणि किती गमावलंय यात गुंतून न पडता पुढचा रस्ता शोधतो. मला हे दाखवून दिलं, शिराली माईन्स्‌च्या कधीच न दिसलेल्या वाघीणीनी.