पूर एक: त्यांच्याकडे किती होड्या आहेत? एकाच होडीतून ते कोणाकोणाला हलवणार? वाळव्यापलीकडच्या शिगावातल्या चौगुल्यांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तरं नव्हती. कृष्णेच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला चढत होती. धोका दाखवणारी लाल रेष कधीच दिसेनाशी झाली होती. पाण्यात अडकल्याची जाणीव चौगुल्यांच्या शब्दात स्पष्ट होती. पहाटेच्या अंधुक प्रकाशात चढणारं पाणी कापत गावाकडे येणाऱ्या लष्कराच्या नौकेनी त्यांच्या आशा पालवल्या होत्या. आता दिवस कलताना पुन्हा जीव कुरतडणारी चिंता.
पूर दोन: ज्ञानेश्वरी. वय जेमतेम २५ दिवस. आपल्या आईच्या कुशीतून बाहेरच्या जगाकडे टुकुटुकू पाहणारा इवलासा जीव. खरं तर निसर्गाच्या रौद्रभीषणतेपुढे सगळेच इवलाले झालेले. पण ज्ञानेश्वरीच्या आईचा गावाबाहेर पडायला ठाम नकार. दुसऱ्या एका उंचवट्यावर विशीतला एक तरुण चढणाऱ्या पाण्याचा अंदाज घेतोय. कुटुंबातल्या इतर सगळ्यांना लष्कराच्या नौकेबरोबर पाठवून घरच्या गुराबरोबर राहिलेला. त्यालाही गुरांना सोडून जायचं नाहीये.
पूर तीन: मुंबई बुडालेली असताना हतबुद्ध झालेल्या प्रशासनाची आवृत्ती इथंही. वेढणारं पाणी. पावसाची रीपरीप. गावाच्या मधल्या पारापर्यंत पाणी धडकलंय. आपण इथं अडकलोय हे बाहेरच्या जगाला कळलंय की नाही, हेही कळायला मार्ग नाही. कुणाला तरी पाण्यातून त्यांच्या दिशेनी सरकणारी एक नौका दिसते. सारा गाव नौकेचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात.
पूर चार: कोल्हापुरातला भारतीय लष्कराचा तळ. एका लष्करी वाहनात जिल्ह्याचा एक मोठा नकाशा डकवलेला. एरवी हे वाहन युद्धभूमीवर तातडीच्या बैठकांसाठी वापरलं जातं. नकाशात अगदी विजेचे आणि टेलिफोनचे खांबही दाखवलेले. खरं तर पाण्याबरोबरच्या या लढाईत, पाण्याबाहेर जेमतेम दिसणारी या खांबांची टोकच लष्कराच्या जिद्दी जवानांचे मार्गदर्शक बनलेत.
पूर पाच: कालच्या अंधारात पाण्यानी आठ लोकांना गिळलंय. नातवंडांचे कपडे तरी दाखवा म्हणून उरापोटी फुटणाऱ्या म्हातारीला काय सांगणार...
पुण्यातून सांगलीकडे निघालो तेव्हा मुंबईतल्या जलप्रलयाला सहा दिवस होऊन गेले होते. मुंबईच्या महापुराची वास्तव, अवास्तव चित्रं डोळ्यांसमोर होती. त्या सोबत होत्या कोकणातल्या बातम्या. दक्षिण महाराष्ट्राच्या साऱ्या जीवनरेखांनी थैमान मांडलेलं. कराडला पोचलो तेव्हा पावसाचा मारा जरा सौम्य झाला होता. वाटेत कृष्णामाई ओलांडली तेव्हाही पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय याचा अंदाज आज खरं सांगायचं तर नव्हता. कोयना फुफाटत वाहत होती, वाटेत जे काही आडवं येईल ते घेऊन.
सांगलीकडे गेलेली लष्कराची एक तुकडी आत्ता या क्षणी वाळव्याजवळच्या शिगाव भागात असल्याचं सांगलीतल्या एका पत्रकार मित्राशी बोलताना कळलं आणि दूरदर्शनवर पाहिलेली पुराची चित्रं डोक्यात घेऊन वाळव्याकडे वळलो. प्रत्यक्ष पूर अजूनही लांबच होता. पाऊस आता पूर्ण विश्रांतीच्या मूडमध्ये.
वाळव्याच्या मुख्य चौकात एक लष्करी ट्रकमधली बोट काढण्याचं काम चालू होतं. समोरच्या रस्त्याच्या टोकाला पाण्यात अर्धवट बुडालेल्या एका देवळावर बसून काही लोकं हातातला दोर आणखी पलीकडे असलेल्या विजेच्या खांबाला बांधण्याच्या प्रयत्नात होते. चिंब भिजलेला एक पोलिस पाण्यात जाऊ पाहणाऱ्या लोकांना पांगवण्याच्या प्रयत्नात होता. कंबरभर पाण्यातून एका गल्लीत शिरलो. बरोबरच्या छायाचित्रकार सहकाऱ्यानी एव्हाना त्याचं काम सुरू केलं होतं.
आणखी एका अरुंद वाटेनी पाण्यात उभ्या असलेल्या घरांच्या मधून थोडं पुढे गेल्यावर काही लोकं दिसली. होडी येतीय... होडी येतीयचा गलका ऐकून त्यांच्या बाजूला गेलो. समोरून येणाऱ्या होडीतून काही लोक उतरले. एक साठीच्या घरातला म्हातारा. कॉलेजला जाणारा एक मुलगी. तिच्या मागं नातवाला सावरणारी एक आजीबाई. चेहऱ्यावर जमिनीवर पाय ठेवल्याचा आनंद, मागं राहिलेल्यांची काळजी. पुराचा हा पहिला अनुभव.
कृष्णेची अनेक रूपं या आधी अनुभवलेली. बरीचशी लोभसवाणी. सागरेश्वराच्या डोंगरावरच्या किर्लोस्कर पॉईंटवरून दिसणारी संपन्न हिरवाई फुलवणारी कृष्णा. धोम धरणामागं गुरेघरला लगटून वाहणारी. मेणवलीला बांधीव घाटावरच्या डोहाइतकीच गंभीर. काठावर नांदणाऱ्या गावातल्या देवळारावळात, वाईच्या उत्सवात रमणारी कृष्णामाई आणि ही कोपलेली कृष्णा.
बाबा काय काय घेतलंत घरातनं, मी होडीतनं उतरलेल्या एका म्हाताऱ्याकडे चौकशी केली. उत्तरादाखल त्यांनी नुसतंच कशाचं काय, अशा अर्थानी हात उडवले आणि हातातली पिशवी छातीशी आणखी घट्ट आवळली. मिलिटरीचे लोक सकाळी गाव उठवायला आल्यावर सापडतील तेवढी सगळी कागदपत्रं गोळा करून म्हातारबुवा होडीत बसले होते. म्हाताऱ्याच्या प्रसंगावधानाला दाद द्यावी वाटली.
आम्ही बोलत बोलत गळाभर पाण्यातून गुडघाभर पाण्यात आलो होतो. आमच्या मागून एक आजीबाई बाजूला सर, बाजूला सर म्हणत आम्हाला ओलांडून जायच्या घाईत होती. तिच्या हातातलं पोर दोन दिवसांपासून तापानी फणफणलं होतं. काठावरच्या पोराची एव्हाना गडबड सुरू झाली होती. माणसांनी खच्चून भरलेली आणखी एक होडी पाण्यात अर्धवट बुडालेल्या घराच्या कठड्याला टेकत होती.
पुढचे दोन-तीन दिवस थोड्याफार फरकांनी हेच चित्र दिसत राहिलं. शक्य होतं तिथं माणसं दुभत्या जनावरांसह बाहेर पडली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी औजारांबरोबर जनावरं अगदी गच्चीवर नेऊन बांधली. माझ्या छायाचित्रकार सहकाऱ्यानी घेतलेलं एक छायाचित्र अजून आठवतं. दोन मजली इमारतीचा तळमजला पाण्यात आहे आणि वरच्या मजल्याच्या गॅलऱ्यांसह गच्चीवर फक्त जनावरं. कोल्हापूरच्या रस्त्यावर एका टप्प्यात गुरांच्या छावण्या उघडल्यासारखं चित्र होतं.
आभाळंच फाटलं? धरणांमधल्या पाणी साठवण्याचं, सोडण्याचं नियोजन चुकलं? आलमट्टीच्या पाण्याचा फुगवटा आला. पाणी पुढं सरकलंच नाही. मागून येणारं पाणी पसरतच राहिलं? जलसंधारणाच्या कामाची व्याप्ती नडली? नदीपात्रात अतिक्रमणं झाली? नद्यांनी पात्रं बदलली? प्रश्नांची उत्तरं, पुराची कारणं मिळतील तेव्हा मिळतील, कदाचित या सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं "पोलिटिकली करेक्ट' असतीलच असंही नाही.
पण गतवर्षीच्या प्रलयानी दळणवळणापासून आरोग्यापर्यंतच्या सर्व सुविधांबरोबरच एकंदरच नियोजनाविषयी प्रश्न मात्र निर्माण केले. माणसांनी माणसांना हात दिला हे खरं; पण लष्कराची मदत नसती तर? कोल्हापुरातल्या व्यावसायिकांच्या एका गटाने, जमवलेली मदत फक्त लष्कराच्याच हातात देण्याचा आग्रह धरला होता. बाकी कोणतीही यंत्रणा त्यांची मदत अगदी आत्तापर्यंत घेऊन जाऊ शकत नव्हती हे खरंच आहे. पण संकटात उपयोगी पडेल इतका विश्वासही आपण शांततेच्या काळात निर्माण करू शकत नाही? मुंबईतला अनुभवही हेच सांगतो. "सलाम मुंबई' म्हणून मुंबईकरांच्या धैर्याला दाद देताना आपल्याला या प्रश्नाचंही उत्तर शोधावं लागेल. परिस्थितीच अभूतपूर्व होती, असं म्हणणाऱ्या मंडळींनाही अभूतपूर्व परिस्थितीतही आपण किती त्वरेनी हालचाल करू शकतो, हे ठरवावे लागेल. कदाचित तयारी ठेवावी लागेल. कितीतरी साध्या गोष्टी. जिल्हा परिषदांना वारंवार सांगूनही नावा मिळालेल्या नाहीत, ही अनेक गावांतली तक्रार. ही बहुतेक सगळी गावं नदीकाठची. गावागावातल्या दळणवळणासाठी अजूनही नावा वापरणारी. यंत्रणावरच सर्व जबाबदारी ढकलण्याचा माझा प्रयत्न नाही. इथेही काही बहाद्दर निघाले. त्यांनी इतरांचं दुःख हलकं करण्याला प्राधान्य दिलं. पण काही वेळा प्रश्न फक्त पाठीवर हात देऊन 'लढ' म्हणण्याचा असतो. हा हात वेळेवर पुढे यावा इतकीच अपेक्षा पुरांनी वेढलेल्या अनेक वाड्या वस्त्यातनं जाणवत राहिली.
मुंबईच्या तुलनेत एक फरक मात्र सतत ठळक होत राहिला. दोन्हीकडे लोकांचं अपरिमित नुकसान झालं. पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतीप्रधान पट्ट्यात अनेक हातांचं कामाचं साधनच पुरानी हिसकावून घेतलं. पिकं बुडाली. जमिनी ओल्या राहिल्या. पाण्याच्या मोटारी वाहून गेल्या. शेतामळ्यांमधल्या पक्क्या नसलेल्या घरांचं मोठं नुकसान झालं.
आज एक वर्षानंतर परिस्थिती बदलली असणार. पुरानंतर चार-पाच महिन्यांनी मी पुन्हा मुद्दाम शिरोळ, सैनिक टाकळी, राजापूरवाडी, खिद्रापूर अशी चक्कर मारून आलो. जखमेवर खपली धरत होती. पण, इथं पाणी भरलं होतं. हा पूल पाण्यात होता. देवळात इथंपर्यंत पाणी शिरलं होतं. अशा अनेक आठवणी अजून ताज्या होत्या. दिवाळी होऊन गेली होती. काही घरांवर नवा रंग होता. क्वचित एखाद्या घरावर पाण्याखाली राहिल्याची खूणही दिसत होती. पण तिथंही माणसांनी कंबर कसली होती...
नव्या उभारींनी, कदाचित जगण्याची लढाई हरता येत नाही म्हणून.
(प्रथम प्रसिद्धी सकाळ 26 जुलै 2006)
1 comment:
Madhav gokhale has big canvas for social issues.media sometimes miss this as other trp subjects rocks.but some senscible journalists never forgets society,common peoples and ground zero reality.i wish this great common man of india a strong support from everywhere !
-deepak bidkar,pune,9850583518
Post a Comment