Tuesday, September 17, 2024

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्सः आभाळ पाठीवर घेणारे हत्ती


रानटी हत्तीचा माझा पहिला अनुभव 'दृक'पेक्षा 'श्राव्य' अधिक आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी दांडेलीच्या जंगलात मी पहिल्यांदा हत्ती 'ऐकला'. रानावर प्रेम करणाऱ्यांसाठी, पक्षी पाहण्यात रस असणाऱ्यांसाठी दांडेली हा स्वर्ग आहे. दांडेलीपासून दहाबारा किलोमीटरवर कुळगी नावाच्या गावात एक कॅम्पसाइट आहे. सातआठ तंबूनिवास, एक खुलं सभागृह, एक नेचर इंटरप्रिटेशन सेंटर -तिथे वन्यप्राण्यांवरच्या काही उत्तम चित्रफिती पहाण्याची सोयही आहे. अलिकडे ही कॅम्पसाइट आणखी अपग्रेड झालीय, तंबू एसी झालेत वगैरे.
रान, रानातल्या वाटा, दिवसाच्या प्रत्येक बदलत्या प्रहरागणिक नवं रूप धारण करणारं रान अनुभवायचं असेल तर दांडेलीइतकी उत्तम जागा नाही. घनदाट हिरवाईत स्वतःला लपेटून घ्यायचं आणि कुळगीच्या कॅम्पसाइटला दिवसभर नुसतं बसून राहायचं. फारशी हालचाल न करता एक चेकलिस्टभर पक्षी सहज अनुभवता येतात. उंचच उंच वारूळे, लाल मुंग्यांची घरटी, नाजूकपणे विणलेली जायंट वुड स्पायडरची जाळी, मधूनच एखादा सिग्नेचर स्पायडर अशा मंडळींची ओळख करून घेत थोडी पायपीट करायची तयारी असेल, तर काही प्राणीही नजरेस पडू शकतात. आणि तुमचं 'टायगर लक' जोरावर असेल तर या जंगलात एखादा खराखुरा ब्लॅक पॅंथरही दर्शन देऊन जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; किंवा नाकावर भलं थोरलं पिवळं शिंग घेऊन उडणारा मलबार हॉर्नबिलसुद्धा.
कोल्हापूरातले माझे मित्र सुनील करकरे गेली कित्येक वर्षे निसर्गात रस असणाऱ्या मंडळींना घेऊन वेगवेगळ्या अभयारण्यात जातात; त्यांना प्राण्यांविषयी, निसर्गाविषयी सांगतात... सजग करतात. रान वाचायला शिकवतात. रानाचे, प्राण्यांचे फोटो काढतात. त्यांच्याबरोबर पहिल्यांदा दांडेलीला गेलो तेव्हा ते डब्ल्यूडब्ल्यूएफबरोबर काम करत होते. कुळगीच्या या कॅम्पसाइटच्याजवळ एक छोटेसे वॉटरहोल होतं. अजूनही असेल. अगदी चित्रातल्यासारखं. चारही बाजूंनी घनदाट रानानी वेढलेलं. तिथे एक मचाण होतं. पहिल्याच दिवशी संध्याकाळी एकदोन तासांसाठी आम्ही त्या मचाणावर डेरा जमवला होता.
जंगलात ऐकू येणारे आवाज, आजूबाजूला होणारी अगदी छोटीशीही खसफस, दिवस मावळताना पाण्यावर येणारे प्राणी, मधूनच त्या गचपणातून सूर मारल्यासारखे उडणारे पक्षी (माणसाच्या आजूबाजूला दिसणारे खंड्या वगैरेंसारखे काही ठळक अपवाद वगळले तर रानातल्या पक्ष्यांची ओळख व्हायला आताशा सुरुवात झाली होती), त्यांच्या सवयी आणि त्यातून उलगडत जाणारं सभोवतालचं रान अशा सगळ्याबद्दल सुनीलनं कायकाय सांगितलं होतं त्या सगळ्याची मनोमन उजळणी करत आम्ही कुळगीच्या त्या मचाणावर बसलो होतो. इतका वेळ मचाणावर बसण्याचा तसा हा पहिलाच अनुभव. आणि समोर काही म्हणजे काहीच घडत नव्हतं. चित्रातल्या सारखा दिसणारा तो जलाशय चित्रातल्यासारखाच स्तब्ध होता. लांबवरच्या सुपा धरणाच्या मागच्या डोंगरांत सूर्य मावळत होता तशी आल्या वाटेने कॅम्पसाइट गाठायची वेळ जवळ येत चालली होती.
अचानक आजूबाजूला प्रचंड कोलाहल सुरू झाला. झाडांतून प्रचंड हालचालीचे, बांबू मोडल्याचे आवाज यायला लागले. 'हत्ती...', कोणीतरी कुजबुजलं. अंगभर एक शिरशिरी येऊन गेली. गडद होत जाणाऱ्या अंधारातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाबरोबर डोळे ताणताणून शोधण्याचा प्रयत्न केला. दिसलं काहीच नाही. खूपवेळ नुसतेच आवाज ऐकून आम्ही कॅम्पसाइटला परत आलो. मग पुष्कळशी प्रश्‍नोत्तरे, हत्तींबद्दल.
नंतर आणखी तीनचारवेळा दांडेलीत जाणं झालं. हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दांडेलीत हत्तींच्या वावराच्या खाणाखुणा खूप दिसल्या -त्यांच्या पाऊलखुणा, साली खाण्यासाठी सोललेली झाडं, दांडेलीत भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून विशेषतः हत्तींपासून उभ्या पिकाचं रक्षण करण्याकरता उभी केलेली, सौरउर्जा खेळवलेली कुंपणं, आणखी खूप काही. पण दांडेलीत मला हत्ती प्रत्यक्ष कधी पहायला मिळाला नाही. तो पाहिला नंतर खूप वर्षांनी बांदीपूरमध्ये.
***
असंख्य समजुतींमधून, प्रतिकांमधून, चित्रांतून, शिल्पांमधून, काव्ये, पुराणे, गाणी, लोककथा, चालीरिती, परंपरा या सगळ्यांतून गेली हजारो वर्षं हत्ती आपल्या आजूबाजूला वावरतो आहे. भारताबाहेरही श्रीलंका, इंडोनेशिया, जावा बेटांपर्यंत पोचलेला, अग्रपूजेचा मान असलेला आपला बुद्धिदाता श्री गजानन 'गजवदन'च आहे. हत्तीचे आणि माणसाचे संबंध कायमच गुंतागुंतीचे राहिले आहेत. हजारो वर्षांपासून माणसाच्या सान्निध्यात राहिलेल्या, युद्धांपासून ते अनेक अवजड कामांत माणसाला साथ देणाऱ्या, माणसाच्या ऐश्‍वर्यांचं आणि सत्तेचं प्रतिक असणाऱ्या हत्तींचा सगळ्यात मोठा शत्रू माणूसच आहे.
कोट्यवधी वर्षांपूर्वी सशाच्या आकाराच्या मॅरिथेरियमपासून आजच्या हत्तींचा प्रवास सुरू झाला असं शास्त्रज्ञ सांगतात. गजकुळाच्या कधीकाळी तीनएकशे शाखा असाव्यात. एकेकाळी हत्ती जगभर पसरलेले होते, असे आजवरच्या संशोनातून दिसून आले आहे. उत्क्रांतीच्या खेळात आता फक्त आफ्रिकेतले लोक्‍झोडोन्ता आफ्रिकाना आणि आशियातले एलीफस मॅक्‍झिमस ही दोनच कुळे उरली आहेत. आफ्रिकी हत्ती मुख्यतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे मध्य आणि पश्‍चिम आफ्रिकेत आढळतात तर पाकिस्तान सोडून दक्षिण आणि आग्नेय आशियातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये हत्ती आढळतात. आशियायी हत्तींच्या तीन उपजाती आहेत. एलीफस मॅक्‍झिमस इंडिकस म्हणजे भारतीय हत्ती, सुमात्रा आणि आजूबाजूच्या प्रदेशातले एलीफस मॅक्‍झिमस सुमात्रन आणि श्रीलंकेत सापडणारे एलीफस मॅक्‍झिमस मॅक्‍झिमस. जमिनीवर रहाणारा हा सगळ्यात मोठा प्राणी आहे. ताकद आणि वजनाचा विचार केला तर खोल समुद्रात रहाणारे काही देवमासे आणि उंचीचा विचार करता जिराफ एवढेच प्राणी काय ते हत्तीपेक्षा मोठे आहेत.
रामायणात, महाभारतात कालीदास -भवभूतींच्या वाङ्‌मयात, अन्य लिखाणात हत्तींचे अनेक उल्लेख आहेत. राज्याभिषेक, विवाहादी प्रसंगांमध्ये, युद्धांत, महाभारतातल्या द्युतात शृंगारलेल्या हत्तींचे, हस्तिदंताने मढवलेल्या सिंहासनांचे, दागिन्यांचे उल्लेख येतात. भारतीय युद्धात, दुर्योधनाने केलेल्या निर्भत्सनेमुळे संतापून पांडवांवर तुटून पडलेल्या द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडले गेले, त्या प्रसंगातला हत्तीचा उल्लेख मानवी स्वभावाचे ताणेबाणे दाखवणारा एक भाषिक अलंकारच झाला. नरो वा कुंजरो वा... पराक्रम गाजवणाऱ्या द्रोणाचार्यांना रोखण्यासाठी 'शस्त्र न धरी करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' म्हणणाऱ्या श्रीकृष्णाने भीमाकडून अश्‍वत्थामा नावाचा एक हत्ती मारवला. द्रोणपुत्र अश्‍वत्थामा मारला गेल्याचे कर्णोपकर्णी सैन्यात पसरले. बातमीची शहानिशा करण्यासाठी द्रोणाने असत्य कथन न करणाऱ्या धर्मराजाला विचारले. आचार्यांच्या प्रश्‍नाला ज्येष्ठ पांडवाने उत्तर दिले, अश्‍वत्थामा हतः। नरो वा कुंजरो वा। अश्‍वत्थामा मारला गेला, माणूस की हत्ती ते माहिती नाही. कृष्णाच्या योजनेप्रमाणे 'अश्‍वत्थामा हतः' इतक्‍याच उद्‌गारांनंतर सुरू झालेल्या शंखनादात 'नरो वा कुंजरो वा' हरवून गेलं; पुत्रवियोगाच्या दुःखाने द्रोणांनी धनुष्य खाली ठेवले आणि धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. भारतीय युद्धाला आणखी एक वळण देणारा हा प्रसंग. असत्य किंवा संदिग्ध कथनाच्या पापाकरता धर्मराजाला काही क्षणांसाठी का होईना पण नरकाचे दर्शन होते अशी कथा पुढे महाभारतात येते. संदिग्ध कथनातला हा हत्ती तिथून थेट भाषेत स्थिरावला.
युद्धांमध्ये हत्तींच्या वापराचे उल्लेख जगभर सापडतात. सव्वाबावीसशे वर्षांपूर्वी मध्य आशियातल्या एका महायुद्धात चौथ्या टॉलेमीनी आशियायी हत्ती वापरल्याची नोंद आहे. जग जिंकायला बाहेर पडलेल्या सिकंदराची घोडदौड रोखणाऱ्या राजा पौरसाच्या सैन्यातल्या हत्तींची गोष्ट सर्वश्रुत आहेच.
चालुक्‍य वंशातील राजा सोमेश्‍वर याच्या मानसोल्लास ग्रंथात गजदलाची प्रशंसा केलेली आहे, असा उल्लेख बाळ सामंत यांच्या गजराज या हत्तींवरच्या पुस्तकात मिळाला.
राजा सोमेश्‍वर लिहितो -
वारणै र्भटूजातीर्य कालिङ्‌गवन जान्मिथी ।
शिसितैः सज्जितेः शूरर्लभ्यते विजयो युधी ।।
मुख्यं दन्तिबल राज्ञां समरे विजर्यषिणाय।
तस्मान्निजबले कार्या बाहतो वारणोत्तमा ।।
कलिंगवनात जन्मलेल्या, उत्तम जातीच्या, सुशिक्षित व सुसज्ज अशा शूर हत्तींच्या साहाय्याने युद्धात विजय प्राप्त होतो. युद्धात विजयाची आकांक्षा असणाऱ्या राजांच्या सैन्यात गजदल मुख्य असते. म्हणून त्यांनी स्वतःच्या सैन्यात पुष्कळ उत्तम हत्ती ठेवावेत.
तरीही हत्ती आणि माणसामधलं अगदी पौराणिक काळापासूनचं नातं चमत्कारीकच आहे. हत्तींच्या अचाट ताकदीचा उपयोग माणसानी करून घेतला. कांस्ययुगापासून हत्तींकडून कामं करवून घेणाऱ्या माणसांचे संदर्भ सापडतात. पण श्‍वानांसारखा किंवा घोड्यांसारखा हत्ती पूर्णपणे कधीच माणसाळला नाही. त्या अर्थानी हत्ती आणि माणसात कायमच एक अंतर राहिलं.
***
सोंड हे हत्तीचं वैशिष्ट्य. आफ्रिकी आणि आशियाई हत्तींच्या सोंडेच्या टोकावळच्या रचनेत थोडा फरक असतो. लोक्‍झोडोन्ता आफ्रिकानामध्ये सोंडेच्या टोकावर बोटांसारख्या दोन मांसल रचना असतात आणि एलीफस मॅक्‍झिमसच्या सोंडेच्या टोकावर अशी एकच रचना असते. सोंडेच्या या टोकानी हत्ती अगदी टाचणी एवढी बारीक वस्तूही उचलू शकतो असे प्राणिशास्त्रज्ञ सांगतात. चाळीस हजार स्नायू एकत्र मिळून हत्तीची सोंड बनते. माणसाशी तुलना करायची तर माणसाच्या आख्ख्या शरिरात सहाशेपेक्षा थोडे जास्त स्नायू असतात. हत्ती सोंडेनी श्वास घेतो, आजूबाजूच्या अन्य गंधांचं ज्ञान त्याला सोंडेमुळे होतं. सोंडेनी तो पाणी पितो, मातीचा वास घेतो, धूळ उडवतो, दंगामस्ती करतो, सोंडेत तो चारपाच लिटर पाणी साठवू शकतो. पण युद्धात हीच सोंड त्याच्या घातालाही कारणीभूत होऊ शकते. महाभारताच्या 'उपसंहार' खंडात चिंतामणराव वैद्य म्हणतात -... हत्तींना फौजेत मानाचे स्थान होते. पण त्याची सोंड नरम असल्याने तो भाग सहज तोडण्यासारखा असे. त्यामुळे हत्तीच्या गंडस्थळापासून सोंडेच्या शेवटापर्यंत लोखंडी चिलखत घातलेले असे ..
***
माझ्या पिढीतल्या अनेकांची हत्तीशी प्रत्यक्ष पहिली गाठ पडली असणार ती सर्कशीत. फुटबॉल खेळणारे, सर्कससुंदरीच्या इशाऱ्यासरशी त्यांच्या आकाराच्या मानानी इवल्याश्‍या स्टूलावर चारही पाय ठेवून उभे रहाणारे, काम नसताना सर्कशीच्या शिकारखान्यात गवत उडवत झुलत रहाणारे, पाय मोकळे केल्यासारखे गावातून फेरफटका मारताना सर्कसची जाहिरात करणारे हत्ती. आत्ता पन्नाशी आणि साठीच्या दरम्यान असलेल्या पिढीला आणखी एक आठवण असणार; 'चल, चल, चल मेरे साथी; ओ मेरे हाथी...' असं म्हणत हत्तींची आख्खी पलटण हिंडवणारे त्यावेळचे बॉलीवूडमधले ज्येष्ठ हत्तीमित्र रा.रा. राजेश खन्ना यांची.
पुण्याच्या पेशवे पार्कात सुमित्रा आणि अनारकली नावाच्या दोन हत्तीणी होत्या. त्यावेळी 'बच्चेकंपनी' या सदरात मोडणाऱ्या अवघ्या पुणेकरांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा या हत्तीणींवर जीव होता. पेशवे पार्कात त्यावेळी या हत्तीणींच्या पाठीवर बसून एक छोटासा फेरफटकाही मारता येत असे. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत अग्रभागी चालण्याचा मान अनेक वर्षे आधी सुमित्रेचा आणि नंतर अनारकलीचा होता. पुण्यासारख्याच कोल्हापूरकरांच्या, सांगलीकरांच्या आणखी कुठल्या कुठल्या गावांतल्या रहिवाशांच्या आठवणी हत्तींशी जोडलेल्या असतील. सांगली देवस्थानच्या सुंदर गजराजाच्या किंवा त्याच्या नंतर आलेल्या बबलू हत्तीच्या आठवणी अजून ताज्या असतील. बातमीदारीच्या निमित्ताने केव्हातरी सांगलीला गेलो असताना श्रृंगार करून बाजारपेठेतून दिमाखात फेरफटका मारणारा, हक्कानी केळ्यांचा घड स्विकारणारा सांगलीच्या देवस्थानचा हत्ती माझ्याही स्मरणात आहे.
हंपीच्या देवळातला एक अनुभव आहे. हंपीच्या विरुपाक्ष मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सामोरा आला मंदिरातला हत्ती; एखाद्या शुभंकरासारखा, आशीर्वाद दिल्यासारखी सोंड उंचावून.
हत्तीच्या शेपटीचा पुसटसा फटकाही चांगला खरचवटून जातो हे कळण्याचाही योग नंतर एकदा यायचा होता.
***
दक्षिणेकडच्या बहुतेक सगळ्या अभयारण्यांमध्ये हत्ती आढळतात. त्यांच्या त्या साम्राज्यात त्यांना पहाण्याचा आनंद काही आगळाच असतो हे कळलं बांदीपूरमध्ये. 'तुम्ही हत्तींच्या प्रदेशात आहात. रस्त्यावर फार वेळ रेंगाळू नका,' बांदीपूर अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यावर स्वागत होतं ते अशा अर्थाच्या सूचनेनीच. न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा रस्ता सूर्यास्तानंतर माणसांच्या राज्यातल्या वाहतुकीला बंद असतो.
जंगलात नेहमी फिरणाऱ्या मित्रांकडून हत्तींचे त्यांनी अनुभवलेले, ऐकलेले खूप किस्से सांगतात. जॉर्ज ऑर्वेलसह जुन्या काळातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून अनेकानी त्यांच्या आठवणीतले हत्ती लिहून ठेवले आहे. ऑर्वेल सुरवातीच्या काळात ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी असतानाचा त्यांनी एका हत्तीला गोळ्या घातल्या होत्या. 'शूटींग ॲन एलेफंट' या प्रसिद्ध निबंधात त्यांनी हा प्रसंग नोंदवून ठेवला आहे. स्थानिक लोकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल फारसं ममत्व नव्हतं. शिवाय केवळ एका मजूराला मारून टाकले म्हणून त्या हत्तीला गोळ्या घालण्याची ऑर्वेल त्यांची कृतीही काहीशी वादग्रस्त ठरली होती. ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटी-फोरसारख्या आपल्या कादंबऱ्यांमधून कालातीत ठरणारी राजकीय टिपणी करणाऱ्या ऑर्वेल यांचा हा अनुभव मुळातून वाचण्यासारखा आहे.
हत्तींविषयी वाचताना असंख्य उल्लेख सापडतात. समुद्रमंथनातून मिळालेला ऐरावत, भोंडल्याच्या खेळात फेर धरलेल्या मुलींच्या मधे पाटावर चितारलेला किंवा हौसेनी घडवलेला मातीचा हत्ती, मेघदूत रचणाऱ्या कवीकुलगुरू कालिदासाने आषाढाच्या पहिल्याच दिवशी पर्वतशिखरांशी झुंजणाऱ्या काळ्याकभिन्न मेघांना दिलेली मत्त हत्तींची उपमा, अन्य संस्कृत रचनांमध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, 'हस्तिप्रधानो विजयी राज्ञाम्‌' हे कौटिल्याचे वचन, गौतम बुद्धांच्या मातेला स्वप्नात दिसलेला शुभ्र हत्ती, गाथा सप्तशतीमध्ये येणारे हत्तींचे उल्लेख, हरप्पा मध्ये सापडलेल्या हत्तींच्या प्रतिमा, अजंठा, भारहूत इथल्या शिल्पांमधल्या गजप्रतिमा, गजांतलक्ष्मीची कल्पना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी रायगडासारख्या बेलाग किल्ल्यावर झुलणारे हत्ती पाहून अचंबित झालेला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्‍झेंडन, दक्षिण भारतातले गजपर्व, म्हैसूरमधल्या दसऱ्याच्या शाही सोहळ्यातले शृंगारलेले हत्ती, नवी वास्तू हत्तीसारखी मजबूत व्हावी म्हणून वास्तूशांतीच्यावेळी हत्तीच्या पायाखालची माती पुजण्याची रीत, हत्तीच्या सोंडेसारख्या धारांनी बरसणारा हस्ताचा पाऊस, रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक मधला 'व्हेन आय वॉज इन्‌ दि आर्मी ऑफ... ' असं सांगत शिस्तीच्या स्वतःच्याच कल्पनांमध्ये रममाण होणारा रिटायर्ड फौजी -कर्नल हाथी, हस्तीदंताच्या हव्यासापायी जगभर माणसानी मांडलेला गजमेध, कृष्णमेघ कुंटेंनी सांगितलेली कुडकोम्बन नावाच्या लांब सुळ्यांच्या हत्तीची गोष्ट, जगातली सध्याची सर्वात वयस्क हत्तीण - चेंगन्नूरच्या महादेव मंदिरातली अठ्ठ्यांशी वर्षांची चेनकल्लूर दाक्षायणी, हत्तीनी भाषेला दिलेल्या 'पांढरा हत्ती', 'साठमारी', 'खायचे आणि दाखवायचे दात', 'दि एलिफंट इन द रूम', 'ॲन एलिफंट नेव्हर फर्गेटस्‌', 'हॅव अ मेमरी लाइक ॲन एलिफंट', 'हत्ती गेला शेपूट राहिले,' 'दुःख हत्तीच्या पावलांनी येते..', 'हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी' सारख्या म्हणी, संज्ञा आणि वाक्‌प्रचार, अधिवास आक्रसत चालल्याने माणसाशी संघर्ष मांडणारे हत्ती, तळकोकणातल्या अशा संघर्षाला केंद्रस्थानी ठेवत बदलत्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे पहाणारी अजय कांडर यांची 'हत्ती इलो' ही दीर्घ कविता, कोलंबोतल्या गंगरामाया विहारात पाहिलेला जमिनीला टेकण्याइतके लांब सुळे असलेला हत्ती अशा वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या असंख्य प्रतिमा डोळ्यासमोर येत गेल्या. मग लक्षात आलं, हत्ती समजावून घेताना आपलीच अवस्था लिळाचरित्रातल्या हत्ती पहाणाऱ्या सात आंधळ्यांसारखी झालीय. प्राणिशास्त्रातून दिसणारा हत्ती, उत्क्रांतीच्या प्रवासात दिसणारा हत्ती, संस्कृतीचा, इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून येणारा हत्ती, महाकाव्यांमधून, भाषिक प्रतिमांमधून दिसणारा हत्ती... हत्तींची ही कहाणी; खरंतर साठा उत्तरी पण पाचा उत्तरीच पूर्ण होणारी! 
(प्रथम प्रसिद्धी -सकाळ साप्ताहिक)

No comments: