Tuesday, August 7, 2018

ट्रॅक्स अँड साईन्सः पंख चिमुकले, पुन्हा रोपले

मोनार्क नावाचं एक फुलपाखरू असतं. तसं पाहिलं तर इवलासा जीव. लांबी सगळी मिळून साडेतीन-चार इंच. ही लांबी पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराची आणि आयुष्य फार फार तर सहा आठवड्यांचं. झळाळते रंग आणि हवेत तरंगल्यासारखं त्याचं जादूई उडणं ही या जिवाची वैशिष्ट्ये. मुख्यतः आढळ दक्षिण कॅनडापासून ते दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडच्या भागात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स, उत्तर आफ्रिकेसह जगाच्या अन्य भागांतही मोनार्क सापडतात. इंग्लंडच्या तिसऱ्या विल्यमच्या नावावरून या फुलपाखरांना ‘मोनार्क’ किंवा सम्राट असं नाव मिळालं असे काही संशोधकांचं म्हणणं असलं तरी खुद्द ब्रिटनमध्ये यांचा वावर क्वचितच.
अमेरिकेतल्या अलाबामा, ईडाहो, इलिनॉस, मिनेसोटा, टेक्‍सास, व्हरमॉन्ट आणि वेस्ट व्हर्जिनिया या सात राज्यांनी मोनार्कला आपल्या राज्याचं प्रतीक असण्याचा मान दिलाय. (आपल्या महाराष्ट्रानेही पंखावर झळाळती निळाई मिरवणाऱ्या ब्ल्यू मॉर्मन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे.)  
खरंतर मोनार्कला आख्ख्या अमेरिकेचाच राष्ट्रीय कीटक म्हणून जाहीर करावं अशी मागणी एकदा नव्हे दोनदा झाली. न्यूयॉर्क टाइम्स वगैरे दबदबा असणाऱ्या वर्तमानपत्रातून वाचकांच्या पत्रव्यवहारात मोनार्कच अमेरिकेचा राष्ट्रीय कीटक कसा असू शकतो यावर चर्चाही झाली. पण दोन्ही वेळा मोनार्क अयशस्वी ठरलं.
मोनार्कांचे आणखी एक विशेष म्हणजे यांच्यातली बरीचशी फुलपाखरं स्थलांतर करतात. कीटकांमधलं स्थलांतर हा काही तितकासा अचंब्याचा विषय नाही, पण मोनार्क मात्र काहीच्या काही अंतरं पार करतात. अमेरिकेच्या पूर्व भागातून मोनार्कच्या काही थव्यांनी जवळजवळ पावणेआठ हजार किलोमीटरचं अंतर कापून मेक्‍सिकोपर्यंतचा पल्ला मारल्याच्या नोंदी आढळतात.
या मोनार्क पुराणाचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात अशाच एका पिल्लू मोनार्कनी इंग्लंड-अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांत, न्यूज साईटस्‌वर, वन्यजीवांना वाहिलेल्या पोर्टल्सवर हेडलाइन स्टेटस मिळवलं होतं. हे पिल्लू मोनार्क होतं तीन दिवसांचं. म्हणजे साठीच्या वयातल्या माणसाशी तुलना केली तर साधारण साडेचार वर्षांच्या माणसाच्या पिल्लाइतकं. त्याचा जन्म झाला रोमी मॅकक्‍लॉस्की या तरुण मुलीच्या टेक्‍सासमधल्या घराच्या बागेत. काही विशिष्ट झाडांची लागवड करून फुलपाखरांना आकर्षित करणारी बटरफ्लाय गार्डन तयार करणं हा अनेक अमेरिकी घरमालकांमधला एक वाढता ट्रेंड आहे. रोमीच्या बागेतही गेली तीन वर्षे सुरवंटांचं वास्तव्य आहे. खा खा खाऊन हे सुरवंट कोषांत जातात आणि मग एक दिवस त्या कोषांची नाजूकशी, झळाळती फुलपाखरं होतात. माणसाच्या तुलनेत एक अल्पायुषी आयुष्य नव्यानी सुरू होतं.
तर गेल्या महिन्यात रोमीच्या बागेतल्या एका कोषातून हे पिल्लू मोनार्क उगवलं. पण कोषातून बाहेर येतानाचा त्याचा प्रवास जरा जास्तच जिकिरीचा होता. सुरवंटाचा काय किंवा माणसाचा काय, आपापल्या कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास तसाही सोपा नसतोच; पण आपल्या या मोनार्क पिल्लाचा प्रवास जिवावरच बेतणारा होता. कोषातून बाहेर पडताना अजून ओल्या असणाऱ्या त्याच्या पंखांपैकी एक पंख पुरता तुटून गेला होता. फुलपाखरांना मन असतं की नाही ठाऊक नाही-ऐकण्यावाचण्यात नाही असं काही कधी-पण असेल तर या मोनार्क पिल्लाला खूप दुःख झालं असणार. कारण उडण्याकरिता फुलपाखरांना दोन सारखेच बांधेसूद आणि प्रमाणबद्ध पंख असावे लागतात, आणि फाटका पंख म्हणजे उडणं नाहीच; आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा तर निसर्गाचा नियमच.
पण या मोनार्क बाळाच्या इवल्याशा भाळावर सटवाईनी लिहिलेला लेख काही वेगळाच होता.
तर रोमी मॅकक्‍लॉस्की. रोमी कॉस्च्युम डिझायनर आहे आणि हॅण्ड एम्‌रॉयडरीमध्ये म्हणजे हातानी कशिदे विणण्यात (निदान तिच्या आजूबाजूला) कोणी तिचा हात धरू शकत नाही, अशी तिची ख्याती आहे. रोमीचं आणि फुलपाखरांचं नातं जरा हळवं आहे. बोअर्ड पांडा नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटनी जेव्हा रोमीची मुलाखत घेतली तेव्हा हे नातं उलगडलं. तिच्या आईचं वीसएक वर्षांपूर्वी निधन झालं. मुलीला कायमचं सोडून जाताना आई म्हणाली होती, रोमी जेव्हा जेव्हा तू फुलपाखरू पाहशील, तेव्हा असं समज की, मीच तुला भेटायला आले आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
रोमीला एक दिवस तिच्या बागेत एका झुडपावर तीन सुरवंटं दिसली; आणि तिचं बटरफ्लाय गार्डनिंग सुरू झालं.
पंख फाटलेलं मोनार्क बाळ सापडल्यावर रोमीनी तिच्या घरातल्याच एका खोलीचं ऑपरेशन थिएटर केलं आणि त्या मोनार्कचा तुटलेला पंख चक्क ‘ट्रान्सप्लांट’ केला. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या बागेत एक मेलेलं मोनार्क फुलपाखरू सापडलं होतं. त्याचा एक पंख तिच्याकडे होता. एक टॉवेल, कपड्यांचा हॅंगर, एक टूथपिक, गोंद, कातरी, कापूस आणि चेहऱ्याला लावायची पावडर वापरून रोमीनी ‘पंखारोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी केली, आणि आश्‍चर्य म्हणजे एक दिवसाची विश्रांती आणि शुश्रुषेनंतर त्या मोनार्कनी दोन्ही पंख पसरून रोमीच्या बागेत झेप घेतली.
या ‘पंखारोपणा’चा व्हिडिओ जगभरात पाहिला गेलाय. फुलपाखराचे पंख आपल्या केसांसारखे किंवा नखांसारखे असतात. त्यामुळे फाटलेला पंख नीट कातरून घेऊन दुसरा पंख तिथे चिटकवताना मोनार्कला भूल वगैरे द्यायची गरज नव्हती आणि मुख्य म्हणजे मोनार्कचा फाटलेला पंख हा अपघात होता, ती जन्मजात शारीरिक विकृती नव्हती.
मोनार्क बाळाला हॅंगरमध्ये नीट अडकवून रोमीनी आधी त्याचा फाटका पंख नीट साफ केला. मग अगदी हलक्‍या हातानी तिनी तिच्याकडचा दुसरा पंख त्या पंखाशी जुळवून घेऊन चिटकवला. मोनार्कच्या पंखांवर असलेल्या काळ्या रेषा अगदी नीट जुळल्या नाहीत, पण हे पंखारोपण यशस्वी झालं. आता एक त्रुटी राहिली. मोनार्क फुलपाखरांमध्ये नरांच्या पंखावर खालच्या बाजूला एक ठिपका असतो. रोमीकडे असलेल्या स्पेअर पंखावर हा ठिपका नव्हता, त्यामुळे नवा पंख मिळालेल्या मोनार्कच्या एकाच पंखावर आता तो नर असल्याची खूण आहे. रोमी म्हणते, ‘‘ठिपक्‍याचं काय एवढं? त्याला आता उडता येणार आहे.’’
तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तिला अनेक प्रश्‍न विचारले. मात्र ‘उत्साहाला आवर घाला,’ असा रोमीनी त्या सगळ्यांना सांगितलंय.
‘पंखारोपणा’वर एक मॅन्युअलच लिहायचा तिचा विचार आहे, पण एक मुद्दा मात्र ती पुन्हा पुन्हा सांगते, तुमचा हात खूपच स्टेडी असायला हवा, नाहीतर करायला जाल एक आणि होईल भलतंच...
***
मोनार्क फुलपाखरांच्या घटत्या संख्येबद्दल गेली अनेक वर्षे अमेरिकाभर चर्चा चालू आहेत. स्थलांतर करणाऱ्या मधमाश्‍या, मोनार्क फुलपाखरे यांच्या संरक्षणाकरिता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीनएक वर्षांपूर्वी एक धोरण प्रसिद्ध केले होते. परागीभवनाच्या एकूण प्रक्रियेतच पर्यायाने अन्नधान्य, फळफळावळ, फुलांच्या उत्पादनात हे कीटक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आश्‍चर्य वाटेल पण ओबामांच्या या धोरणात स्थलांतर करणाऱ्या मोनार्कांसाठी मेक्‍सिको ते मिनेसोटादरम्यान जवळपास दीड हजार मैलांचा ‘बटरफ्लाय कॉरिडॉर’ तयार करण्याचा प्रस्ताव होता. जगातल्या अन्य काही देशांमध्येही असे काही प्रस्ताव आहेत. 
फुलपाखरांवर संशोधन करणाऱ्या मंडळींना विचाराल तर अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे, असं ते सांगतील. भारतातही या संदर्भात अभ्यास होत असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देशभरातल्या महामार्गांवर असंख्य फुलपाखरांचा, मधमाश्‍यांचा, सापांचा जीव जातो, याबद्दल गेली दोनअडीच दशके वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव प्रेमी सातत्याने बोलत आहेत, उपाय सुचवत आहेत. काही वर्षांपूर्वी कोणत्या तरी अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या झाडावर फुलपाखरे ज्यामुळे लांब जातील अशी गंधद्रव्ये लावण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या प्रयोगाचं पुढे काय झालं कोण जाणे...  
***
रोमीच्या गोष्टीच्या निमित्ताने फुलपाखरांविषयी आणखी वाचत गेलो. दरम्यान आणखीही काही काही वाचत होतोच. दुर्गा भागवतांच्या ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ या पुस्तकातल्या ‘एक अभावात्मक संकेत’ या लेखात फुलपाखरांविषयीचा एक वेगळाच संदर्भ मिळाला. तो संदर्भही अगदीच अनपेक्षित -भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाचा. दुर्गाबाई लिहितात, ‘‘काही संकेत अभावात्मक असतात. म्हणजे एखाद्या वस्तूचा ती प्रत्यक्षात कितीही महत्त्वाची असली तरी वाङ्‌मयात उल्लेख नसतो. [...] परंतु काही परमरुचिर वस्तूंचा अभाव संकेतबद्धतेमुळे वाङ्‌मयात येतो. अशा गोष्टीत मी प्रामुख्याने भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाची गणना करीन.’’
आपल्या वाङ्‌मयात अमाप निसर्ग वर्णने आहेत. त्यात वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, मासे, नाग-साप, वाळवी, मुंग्या, पतंग आहेत; अगदी इंद्रगोपावर म्हणजे मृगाच्या किड्यावर कवने आहेत, असं सांगून दुर्गाबाई लिहितात, ‘‘परंतु तरीही हा निसर्ग फुलपाखराच्या अभावी खुरटा वाटतो. उणा वाटतो.’’
गोंडी भाषेतली काही कवने आणि बंगाली आणि आसामी साहित्यातले काही उल्लेख वगळता अन्य साऱ्या भारतीय वाङ्‌मयाने फुलपाखरांना नाकारले, असे दुर्गाबाई म्हणतात. या लेखाचा समारोप करताना त्या लिहितात, ‘‘जीवनालाही जिथे क्षणभंगुर म्हणून आम्ही ठोकर मारली, तिथे तर मूर्तिमंत क्षणभंगुर व सुखलोलुप जे फुलपाखरू ते आम्हास कसे रुचावे? [...] भारतीयांनी नादकलेचा परम उत्कर्ष संगीतात साधला तसा दुसऱ्यांना साधता आला नाही. म्हणूनच मला वाटते ‘गुं गुं’ करणारा भ्रमर काळा-ठुसका असूनही आम्हाला प्रिय झाला. [...] पण मूर्तिमंत सौंदर्य पाकोळीच्या रूपाने भ्रमरासारखेच, ‘सरस पाहून चुंबण्या’च्या विद्येत प्रवीण असूनही, केवळ मुके, निःशब्द म्हणून आम्ही नाकारले. सर्वस्वी उपेक्षिले.
दुर्गाबाईंच्या मते पाश्‍चात्य वाङ्‌मयातल्या कल्पनांबरोबर फुलपाखरू नवशिक्षितांच्या लेखनात प्रवेश करते झाले. याच लेखात दुर्गाबाईंनी जगातल्या अन्य संस्कृतींमध्ये फुलपाखरांविषयीच्या कल्पनांबाबतही विस्ताराने लिहिले आहे. ‘फुलपाखरू पाहशील तेव्हा मीच तुला भेटायला आले आहे, असे समज,’ या रोमीच्या आईच्या शब्दांप्रमाणे फुलपाखरू म्हणजे माणसाचा आत्मा ही कल्पना युरोप, जपान, पॅसिफिक बेटे यात प्रसृत आहे. नॉर्थ अमेरिकेतल्या इंडियनातही तो समज रूढ आहे, असा उल्लेख दुर्गाबाई करतात.
असो... दुर्गाबाईंचा हा विलक्षण लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पण आपला विषय तो नाही. राजेशाही शिकारींच्या कथा अगदी कालपरवापर्यंत ऐकल्या-सांगितल्या जात असल्या, त्यातून कितीतरी रमणोत्सुक मने जुळली असली आणि त्यातून पुढे महाभारते घडली असली, तरी संस्कृत वाङ्‌मयातला पहिला श्‍लोक महाकवी वाल्मीकींना स्फुरला तो प्रेमालापात मग्न असताना व्याधाच्या बाणाची शिकार झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या प्रियेच्या विलापातून.
जखमी झालेल्या वन्यप्राण्यांसाठी जीव टाकणारे रोमीसारखे असंख्य लोक जगभर आहेत. ते वन्यप्राण्यांसाठी अनाथालये चालवतात, अडचणीतल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालतात, आजारी प्राण्यांची देखभाल करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडतात, अपंगत्व आलेल्या प्राण्यांची आयुष्यभर काळजी घेतात. नीलिमकुमार खैरे यांच्या भारतीय सर्पविज्ञान संस्थेचं प्राण्यांचं अनाथालय, डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातला वन्यप्राण्यांचा दवाखाना ही आपल्या आजूबाजूची ठळक उदाहरणे. वन्यप्राण्यांना नवजीवन देण्याचे असे प्रयत्न जगभर सुरू असतात.
ग्रीनपीस या पर्यावरणरक्षणाला वाहून घेतलेल्या संस्थेतून बाहेर पडलेल्या पॉल वॅटसननी तर समुद्री प्राण्यांची शिकार करणाऱ्यांविरुद्ध चक्क लढाईच पुकारली आहे. त्यांच्या ‘सी शेफर्ड’ संघटनेचा थेट ‘डायरेक्‍ट अॅक्शन’वरच विश्‍वास आहे. अॅनिमल प्लॅनेट चॅनेल फॉलो करत असाल तर ‘व्हेल वॉर्स’ नावाची सीरिज आठवत असेल. हा पुन्हा वेगळाच विषय.
पंचवीसएक वर्षांपूर्वी सर्पविज्ञान संस्थेच्या अनाथालयाची सुरवात होत असताना पाय मोडलेल्या एखाद्या राखी बगळ्यावर शस्त्रक्रिया करता येते हाच चमत्कार वाटला होता. वनखात्याने सुटका केलेल्या, लोकांनी वाचवलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याकरिता, वाढवण्याकरिता काय काय आणि किती करावे लागते, एखाद्या प्राण्याबद्दल किती बाजूंनी विचार करावा लागतो याचा आपल्याला अंदाजच येऊ शकणार नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सापडलेली बिबट्याची काही पिल्लं वेगवेगळ्या वेळी नीलिमकडे सोपवली होती. या पिल्लांना वाढवतानाचे नीलिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत.
अनेक प्राणी नंतर कात्रजच्या अनाथालयात आले, बरे झाले, निसर्गात परतले. ज्यांना निसर्गात पुन्हा सोडता येणं शक्‍य नव्हतं, ते तिथेच राहिले. ‘मैत्र जीवाचे...’ या पुस्तकात नीलिमनी बाबा बिबट्या आणि अनाथालयातल्या अन्य काही प्राण्यापक्ष्यांबद्दल लिहिलेही आहे.
अगदी तीनएक आठवड्यांपूर्वी नाशिकच्या सुरगणा तालुक्‍यात वनाधिकाऱ्यांना अगदी विकल झालेली तरसाची एक मादी सापडली. अनिलनी, हा नीलिमचा धाकटा भाऊ, मला तिची गोष्ट सांगितली. मग त्यानीच वनपाल अमित साळवे आणि डॉ. अंकुश दुबेंना फोन लावला. आम्ही तिला नाशिकलाच ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, साळवे मला फोनवर सांगत होते. पण तिची एकंदर स्थिती बघून आम्ही तिला कात्रजला हलविण्याचा निर्णय घेतला. ती गरोदर होती. खूप अशक्त झाली होती. तिचं हिमोग्लोबिन प्रचंड कमी झालं होतं. वीसएक दिवस लागले, तिला पूर्ण बरं व्हायला. तिची बाळं वाचली नाहीत; पण ती छान बरी झाली, डॉ. अंकुश सांगत होते. दोन-चार दिवसांपूर्वीच जिथे सापडली होती त्याच परिसरात तिला पुन्हा सोडलं आम्ही, साळवेंनी गोष्ट संपवली.
विकासाच्या रेट्यात माणूस आणि वन्यप्राण्यांदरम्यान एक संघर्ष उभा राहात असताना, माणसाच्या हव्यासापोटी प्राण्यांच्या जातीमागून जाती संकटात सापडत असताना, असे प्राणीमित्र एखाद्या फुलपाखरासाठीही काही वेगळे करू पाहतात, हाच दिलासा आहे.
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक मार्च 2018)

No comments: