Sunday, August 12, 2018

पुस्तक पुस्तकः बहुआयामी प्रवासाची 'सत्या'वचनी गोष्ट

"एफ फाइव्ह". कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाणारी की.
गेली चार दशकं संगणकाच्या क्षेत्रात आपला दबदबा राखणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचं पहिलंच पुस्तक "हिट रिफ्रेश' मराठी वाचकांच्या दृष्टीनं "एफ फाइव्ह'ची एक सुखद अनुभूती आहे. "हिट रिफ्रेश : द क्वेस्ट टू रीडिस्कव्हर मायक्रोसॉफ्टज्‌ सोल ऍन्ड इमॅजिन अ बेटर फ्युचर फॉर एव्हरीवन' या नाडेला यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. मायक्रोसॉफ्टच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासातले नाडेला हे केवळ तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. चार वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बिल गेट्‌स आणि स्टीव्ह बामर या पूर्वसुरींच्या मध्ये उभ्या असलेल्या नाडेला यांच्या छायाचित्रानं भारतीयांची मान जशी उंचावली होती, तसंच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काही करू पाहणाऱ्या भारतीय तरुणांना नवी क्षितिजंही खुणावू लागली होती. ही डिजिटल पिढी आणि या पिढीचं तंत्रज्ञानाधिष्ठीत भविष्य यांचा वेध घेणारी ही विविधांगी कथा वाचकांना निश्‍चितच भावेल.

"हिट रिफ्रेश' ही नाडेला यांची आत्मकथा आहे; मायक्रोसॉफ्टचा जीवनपट आहेच आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भविष्यातला नवनिर्मितीचा वेधही आहे. नेतृत्व आणि परिवर्तन हे दोन मुद्दे अधोरेखित करताना नाडेला वाचकासमोर मायक्रोसॉफ्टमधल्या तीन पिढ्यांचा प्रवास वाचकासमोर ठेवतात. नाडेला यांच्या पुस्तकाचा उदय जोग यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

गोष्टीला सुरवात होते हैदराबादमधून. हैदराबादपासून ते रेडमंडपर्यंतचा आपला प्रवास नाडेला उलगडत नेतात. जग बदलणं हेच आपलं ध्येय आहे अशी श्रद्धा असणाऱ्या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा होती म्हणून आपण - जगाच्या दृष्टीनं आता यशाची जितीजागती दंतकथा असणाऱ्या- मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झालो, असं ते पहिल्यांदाच सांगून टाकतात. ही कथा परिवर्तनाची तर आहेच आणि त्याहीबरोबर या परिवर्तनाला चालना देणाऱ्या सहसंवेदनेच्या जाणिवेची आणि इतरांना सक्षम करण्याच्या आकांक्षेचीही आहे.

सहसंवेदनाच्या जाणिवेबद्दल मायक्रोसॉफ्टच्या दृष्टिकोनाबद्दल सांगताना नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होतानाच्या त्यांच्या स्वत:च्याच मुलाखतीबद्दल सांगून ते लिहितात : "अतिशय व्यक्तिगत पातळीवर लवकरच मला ती सहसंवेदना शिकावी लागणार आहे, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.'

हैदराबादकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या बारावीतल्या सत्याला हैदराबादमधून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगत संकुचित दृष्टिकोन सोडायला लावणारे भारतीय प्रशासकीय सेवेत असणारे वडील आणि हव्या त्या गोष्टी हव्या त्याच वेगानं करण्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या शिक्षिका आईचं आयुष्याबद्दलचं तत्त्वज्ञान या एका बाजूनं परस्परविरोधी वाटणाऱ्या विचारांचे आपल्यावर झालेले परिणाम, आयआयटीच्या प्रवेश परीक्षेतल्या अपयशानंतरचा विद्युत अभियांत्रिकीचा अभ्यास, पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण, शिक्षणादरम्यान जॉन व्हॉन न्यूमन आणि ऍलन ट्युरिंग या गणित आणि संगणकशास्त्रज्ञांची आणि क्वांटम संगणनाची मोहिनी, वडिलांच्या प्रशासकीय सेवेतल्या मित्राच्या मुलीशी, अनुपमा -अनुशी, विवाहाचा निर्णय, व्हिसासंबंधीच्या अमेरिकी नियमांच्या जंजाळातून पत्नीला आपल्याबरोबर अमेरिकेत येता यावं यासाठी घेतलेलं ग्रीन कार्ड परत करण्याचा निर्णय, व्यवसायाच्या आणि नेतृत्वाच्या काही तत्त्वांचा नाडेला यांनी क्रिकेटशी जोडलेला संबंध, मायक्रोसॉफ्टच्या "विंडोज 10'चं अनावरण ऑस्ट्रेलियाऐवजी केनियात करणं आणि मायक्रोसॉफ्टनं पुन:पुन्हा घेतलेला आत्मशोध या सगळ्यासह नजीकच्या भविष्यात जगाला कवेत घेणारं कृत्रिम बुद्धिमत्तेसारखं तंत्रज्ञान आणि त्याच्या नैतिक चौकटी यांच्याविषयीही नाडेला वाचकाशी संवाद साधतात. येत्या पिढ्यांना सहसंवेदना, शिक्षण, सर्जनशीलता स्वीकारावी लागणार आहे, असं सांगताना येणाऱ्या या युगाचा अर्थ पूर्णपणे जाणून घेण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या घटकांचं विश्‍लेषण होण्याची गरजही ते अधोरेखित करतात.

येऊ घातलेल्या तंत्रयुगाच्या लाटेसंबंधी नाडेला आपलं मत वाचकांसमोर ठेवतातच; पण त्या लाटेचा समाजावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतात. माणसं आणि यंत्रांच्या भवितव्याबद्दल संदर्भात नाडेला म्हणतात : "स्थित्यंतराचा प्रत्येक टप्पा अवघड समस्या उभी करतो; पण योग्य मूल्यं आणि संरचना तत्त्वं आणि मानव म्हणून आपल्याला आवश्‍यक असलेली कौशल्यं यांच्या साह्यानं परिवर्तन घडवून आणतानाही माणसाची आणि समाजाची भरभराट शक्‍य आहे.' शेवटच्या प्रकरणात ते भावी काळात अपेक्षित असणाऱ्या आर्थिक विकासासाठी -शिक्षण अधिक नावीन्य गुणिले तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर बरोबर आर्थिक विकास असं एक समीकरणही मांडतात. "हिट रिफ्रेश'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात नाडेला मायक्रोसॉफ्टमधील आपल्या प्रवासात घडलेल्या काही अनर्थांबद्दलही मोकळेपणानं बोलतात.

या पुस्तकाला बिल गेट्‌स यांची प्रस्तावना आहे. भविष्याविषयी आपण सर्वांनी आशावादी असायला हवे, हे सांगताना गेट्‌स यांनी पुस्तकाचा एक महत्त्वाचा पैलू उलगडून दाखवला आहे. ते म्हणतात : "तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्याचा आणि त्याच वेळी काही कठीण प्रश्‍नांना सामोरं जाण्याचा मार्गच सत्यानं आखून दिला आहे.'

नाडेला यांचेच शब्द उधृत करायचे, तर "हिट रिफ्रेश' मुख्यत्वे माणसांबद्दल आणि सहसंवेदना या आपल्यामधल्या एकमेवाद्वितीय गुणाबद्दल आहे. सद्यस्थितीला न भूतो.. असा धक्का देणारी तंत्रज्ञानाची लाट येत असताना तर माणसाला हा गुण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तंत्रज्ञानानं एका बाजूला निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरं जात असताना आपल्याला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे ती परिस्थिती आणि भविष्यातल्या या वाटचालीत आवश्‍यक त्या सर्व क्षणी "एफ फाइव्ह' दाबून रिफ्रेश होण्याची गरज समजावून घेण्यासाठी नाडेला यांचं हे पुस्तक निश्‍चितच मदत करेल.

पुस्तकाचं नाव : हिट रिफ्रेश : मायक्रोसॉफ्टचा हरवलेला आत्मा आणि मनुष्यमात्राच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न यांची एक शोधयात्रा
लेखक : सत्या नाडेला. मराठी अनुवाद : उदय जोग
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स (मूळ इंग्लिश). वेस्टलॅंड पब्लिकेशन्स आणि यात्रा बुक्‍स (मराठी अनुवाद)
पृष्ठं : 208, मूल्य : 350 रुपये
(प्रथम प्रसिद्धी -सकाळ -सप्तरंग, ऑगस्ट 12, 2018)

No comments: