कॅसॅन्ड्रा ही ट्रॉयच्या राजाची मुलगी. इसवी सनाच्याही बाराशे वर्षं आधी लढल्या गेलेल्या ग्रीक-ट्रोजन युद्धाची ट्रॉय ही रणभूमी. ग्रीक महाकवी होमरच्या इलियडमध्ये त्याकाळातल्या या वैभवसंपन्न ऐतिहासिक ग्रीक शहराचे उल्लेख येतात. त्या युद्धाचा नायक हेक्टर हा या कॅसॅन्ड्राचा भाऊ.
कॅसॅन्ड्राच्या प्रेमात पडलेल्या अपोलो देवानं कॅसॅन्ड्राला अचूक भविष्यवाणी करण्याची अमोघ शक्ती बहाल केली होती, असं एक ग्रीक पुराणकथा सांगते. कॅसॅन्ड्रानं मात्र वर मिळाल्यानंतर शब्द फिरवला. अपोलोला वर देता येत असला तरी दिलेला वर परत घ्यायची मुभा मात्र त्याला नव्हती. चिडलेल्या अपोलोनं मग आपल्या वराला एक शाप जोडला; कॅसॅन्ड्रा अचूक भविष्यवाणी करेल पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अपोलोच्या रागाची धनीण झालेल्या कॅसॅन्ड्रानं आधुनिक इंग्रजी भाषेला एक वाक्प्रचार दिला ‘कॅसॅन्ड्रा मोमेंट’!
या कॅसॅन्ड्रा क्षणाची आठवण आत्ता एवढ्यात अनेकांना झाली ती कृबु -कृत्रिम बुद्धिमत्तेचे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री हिंटन यांना अमेरिकी शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांच्यासह यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर. कृत्रिम न्यूरल नेटवर्क क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी नोंदवताना आधुनिक मशिन लर्निंगची व्याख्याच बदलणाऱ्या हिंटन यांना नोबेल मिळणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘कॅसॅन्ड्रा क्षण’ आहे, असे म्हटले जाते आहे.
नोबेलसाठी विचारात घेतली जाणारी सर्वच कामे विशेषच असतात, पण हिंटन यांचे नोबेल आणखी एका संदर्भाने विशेषच आहे. आपल्या संशोधनासाठी हा सर्वात मानाचा पुरस्कार मिळवलेल्या काही थोड्यांनी नंतर आपल्याच संशोधनाच्या परिणामांबद्दल खेद व्यक्त केल्याचे दाखले आहेत. युरेनियम आणि अणुबाँबशी संबंधित संशोधनाला चालना द्यावी अशा आशयाचे पत्र अल्बर्ट आइनस्टाईन आणि त्यांचे एक सहकारी लिओ शिलार्ड यांनी ऑगस्ट १९३९मध्ये अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांना पाठवले होते. प्रचंड क्षमतेची अस्त्रं निर्माण करू शकणारं हे विज्ञान उरलेल्या जगाच्या आधी हिटलरच्या जर्मनीच्या हाती पडू नये, अशा विचाराची किनार या पत्राला होती. या पत्रामुळे मॅनहॅटन प्रकल्पाला चालना मि ळाली आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये झालेल्या नरसंहारानंतर मात्र आइस्टाईन यांनी रूझवेल्टना पाठवलेले पत्र ही एक ‘मोठी चूक’ होती, अशी कबुली दिली होती.
हिंटन यांचे नोबेल थोडे वेगळे आहे. नोबेल जाहीर होण्याच्या वर्ष- सव्वा वर्ष आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या अग्रदूताने आपल्या संशोधनाच्या परिणामांबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या एकूणच जगण्यात क्रांती घडेल; मात्र नव्यानं काही गुंतागुंतीही उद्भवतील म्हणून सावधगिरी बाळगायला हवी, असं सांगत हिंटन यांनी गुगलमधले आपले सल्लागारपद सोडले होते. उर्वरित आयुष्य आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यात घालवणार असल्याचेही जाहीर करताना हिंटन म्हणाले होते, “अजून तरी ते (तंत्र) आपल्यापेक्षा बुद्धिमान नाहीये, हे मी सांगू शकतो. पण मला वाटतं लवकरच ते (आपल्यापेक्षा बुद्धिमान) होईल.”
जी कामं यांत्रिकीकरणाच्या, स्वयंचलितीकरणाच्या कुवतीबाहेर आहेत असं कालपर्यंत वाटत होतं ती कामं आज ‘शिकत जाणारी’ यंत्रं करायला लागली आहेत. हिंटन यांनी मांडलेल्या कल्पनांचा हा परिपाक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल भीती व्यक्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला वरचढ ठरल्यास तो संपूर्ण मानवी संस्कृतीसाठी धोका ठरू शकतो अशी भीती हिंटन यांच्या आधी आणि नंतरही अनेकांनी व्यक्त केली होती.
महाभारताची सांगता करताना महर्षी व्यासांनी, ‘ऊर्ध्व बाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।’ अशा शब्दांत व्यक्त केलेला विषाद मात्र कदाचित हिंटन प्रभृतींच्या वाट्याला येणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. युरोपीय आर्थि क समुदायाचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅक्ट, अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनाच्या दृष्टीने दिलेले आदेश, ब्राझिल, कॅनडा, चीन आणि इजिप्त, नायजेरिया, केनिया, दक्षिण आफ्रिका अशा राष्ट्रांनीही त्या दिशेनं उचललेली पावले ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनाच्या आशा जागी ठेवणारी काही उदाहरणे. भारतानंही एआय नियमनाच्या दृष्टीने २०१८च्या नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखी काही पावले उचलली आहेत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर हिंटन यांच्या संशोधनावर नोबेल पुरस्काराची मोहोर उठावी हाच कृबुचा कॅसॅन्ड्रा क्षण!
(पूर्वप्रसिद्धी -साप्ताहिक सकाळ)
No comments:
Post a Comment