अलीकडच्या काळात पर्यावरणवाद्यांना आनंद वाटावा, अशा घटना कमालीच्या दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला प्रामुख्याने काम येते ते समाजाला वेगवेगळ्या प्रश्नांवर धोक्याचा कंदील दाखविण्याचे. भारतातील वाघांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचा विषयही त्यापैकीच एक; परंतु ताज्या व्याघ्रगणनेने दिलेले शुभवर्तमान हा या सगळ्याला एक सुखद अपवाद ठरेल, अशी चिन्हे आहेत. अर्थात, या आकड्यांची सत्यासत्यता नीट तपासून पाहिल्यानंतरच पुढचे धोरण ठरविणे योग्य ठरेल, याचेही भान विसरता कामा नये. देशातील वाघांच्या संख्येतील वाढ पाचशेपेक्षा जास्त आहे; म्हणजेच ती तब्बल 30 टक्क्यांची आहे. जगभरात चोरट्या शिकारींसह विविध कारणांमुळे वाघांच्या संख्येत घट होत असताना, भारतात वाघांची संख्या वाढणे आणि ती वाढ लक्षणीय असणे ही "यशकथा‘ आहे हे निश्चित; परंतु हे यश मिळविण्याची कारणे नेमकी कोणती, हेही विचारात घेतले पाहिजे, तरच ही परिस्थिती टिकविणे आपल्याला साध्य होईल.
अठरा राज्यांत पसरलेल्या 3.18 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात 1540 वाघांची प्रत्यक्ष छायाचित्रे मिळाली. ही छायाचित्रे आणि वाघांच्या अस्तित्वाचे अन्य पुरावे लक्षात घेऊन 2226 ही संख्या निश्चित करण्यात आली, असे व्याघ्रगणनेचा ताजा अहवाल सांगतो. या निष्कर्षांप्रमाणे वाघांच्या संख्येतली सर्वाधिक वाढ कर्नाटक राज्यातल्या पश्चिम घाटाच्या पट्ट्यात आणि त्या खालोखाल उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या अरण्यांत आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या 109 असल्याचे ही गणना दर्शवते. जगातले सत्तर टक्के वाघ भारतात आहेत. हे आकडे उत्साहवर्धक असले तरी, वाघांच्या वाढत्या संख्येवरच्या वन्यजीव अभ्यासकांच्या सुरवातीच्या प्रतिक्रिया सावधच आहेत. या सावध प्रतिक्रियांना पार्श्वभूमी आहे ती आकड्यांच्या खेळाचा या देशातला जो एकंदर अनुभव आहे त्याची; तसेच हे आकडे बरोबर आहेत असे गृहीत धरायचे ठरवल्यास, या आकड्यांतून अधोरेखित होणाऱ्या जबाबदाऱ्यांची.
राकट सौंदर्य, शौर्य आणि शक्ती यांचे प्रतीक मानल्या गेलेल्या या रुबाबदार प्राण्याचे एखाद्या अरण्यातले अस्तित्व हीच त्या अरण्याच्या एकंदर सुदृढतेविषयीचे निदर्शक असते. रानात वाघ आहे, याचा अर्थ शाकाहारी प्राणी पुरेसे आहेत. शाकाहारी प्राणी पुरेशा संख्येने आहेत याचा अर्थ हिरवाईचे प्रमाण पुरेसे आहे आणि हिरवाई पुरेशी आहे याचा अर्थ पाणी मुबलक आहे, असा लावला जातो. वाघ असतो म्हणजे रान खुशाल असते. नैसर्गिक अन्नसाखळीत सर्वांत वर असलेला वाघ आपल्या संस्कृतीचाही अविभाज्य भाग आहे. भारताने वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याच्या कितीतरी आधीपासून या देशात अरण्यांच्या आधाराने नांदणाऱ्या अनेकविध संस्कृतींनी वाघाला देवत्वही बहाल केले आहे. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून भारतात वाघ आणि माणसे एकमेकांबरोबर राहात आहेत. देशातल्या, देशाबाहेरच्या पर्यटकांसाठी वाघ हे जितके मोठे आकर्षण आहे, तितकेच ते शिकाऱ्यांचेही लक्ष्य ठरले. मराठीत वापरला जाणारा "वाघ मारला‘ हा वाक्प्रचार काहीतरी अचाट काम करण्याची क्षमता अधोरेखित करतो. वाघाच्या नखांपासून ते कातड्यापर्यंतचे विविध अवयव पुरुषत्वापासून ते विजयश्रीपर्यंतच्या मानवी भावभावना दर्शवतात. लोकव्यवहारातील वाघाविषयीचे विविध समज-गैरसमज, अंधश्रद्धा यांतून ठळकपणे समोर येतात. वाघाच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या किमतीमुळे या अंधश्रद्धांना माणसाच्या हव्यासाचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे वाघ माणसाच्या हव्यासाचे बळी ठरले.
व्याघ्र संवर्धनाचा भारतातला प्रवास व्याघ्रप्रकल्पांची निर्मिती ते राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण असा दीर्घ पल्ल्याचा आहे. व्याघ्र गणनेचा ताजा अहवाल या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. वाघांच्या संख्येत तीस टक्के वाढ असेल तर वाघांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत वाघांचे अधिवासही टिकविण्याची जबाबदारी आता नव्याने स्वीकारावी लागेल. माणसांच्या व्यक्तिगत ते व्यावसायिक हितसंबंधांतून निर्माण होणारे संघर्ष टाळून हे अधिवास टिकवावे लागतील. संवर्धनाशी सुसंगत असा आर्थिक आराखडाही लागेल. व्याघ्र संवर्धनावर काम करीत असलेले तज्ज्ञ या संदर्भात काही मुद्दे गेल्या काही वर्षांपासून मांडत आहेत. व्याघ्रप्रकल्पांच्या निर्मितीबरोबरच राखीव वनांना जोडणारे वावरमार्ग (कॉरिडॉर) राखणे, हा चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वाघांची वाढती संख्या अधिक निरोगी असावी, यासाठी हे वावरमार्ग आवश्यक आहेत. धोकादायक असूनही वाघ हे मार्ग वापरतात हे आजवर अनेकवेळा दिसून आले आहे. संरक्षित क्षेत्राबाहेर वावरणाऱ्या वाघांना सर्वाधिक धोका असल्याचे पाच वर्षांपूर्वी झालेल्या व्याघ्र गणनेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. वाघांचे या स्थलांतरावरून अरण्यांच्या स्थितीबद्दलही अनेक पैलू पुढे येतात.
शिकाऱ्यांचा बीमोड आणि लोकसहभाग ही वाघांच्या संख्येतल्या वाढीची मुख्य कारणे असल्याचे अहवाल सांगतो. या आघाडीवर मिळालेले यश नोंदवताना भविष्यातही हीच परिस्थिती कायम ठेवण्याचे आव्हान डोळ्यांसमोर ठेवावे लागणार आहे.

('सकाळ' अग्रलेख -२२ जानेवारी २०१५)
No comments:
Post a Comment