‘‘जगाला अंकगणना शिकविणाऱ्या भारतीयांचे आपण ऋणी असायला हवे. कारण त्याशिवाय कोणताच उपयोगी शोध लागू शकला नसता,’’ हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे उद्धृत वेळीअवेळी सांगत ‘सांगे वडिलांची कीर्ती... ’वाल्यांच्या पंक्तीला जाऊन बसणाऱ्या प्रत्येकाला ‘इन्फोसिस’च्या एन. आर. नारायणमूर्तींनी गदागदा हलवले आहे. बंगळूर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या दीक्षान्त समारंभात बोलताना मूर्ती यांनी गेल्या ६० वर्षांत जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असे एकही संशोधन भारताने केलेले नाही, असे विधान करून अनेकांच्या मनातल्याच एका प्रश्नाला शब्दरूप दिले आहे.
अर्थात, हा प्रश्न विचारणारे मूर्ती हे पहिलेच आहेत, असे नाही. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातल्या अनेकांनी यापूर्वी या विषयावर भाष्य केले आहे. तरीही मूर्ती यांनी नव्याने हे विधान केल्याने अनेक क्षेत्रांत घोडदौड करीत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुन्हा दाखविणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातले गेले आहे.
मूर्ती हे आताच पुन्हा का बोलले? त्यांच्या ओठांवर देशातल्या संशोधन क्षेत्राची काळजी असली, तरी पोटात आत्मस्तुती आहे की काय? अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. संशोधक-उद्योजक म्हणून परिचित असलेल्या नारायण मूर्ती यांची प्रतिमा भाषणबाजीशी जोडलेली नाही. यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घ्यायला हवे. भारतीयांनी जगाला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. आर्यभट्टाने मांडलेल्या शून्याच्या कल्पनेपासून ते अलीकडे नव्याने जगासमोर मांडल्या गेलेल्या योगविद्येपर्यंत असंख्य उदाहरणे देता येतील. अवकाशशास्त्रात घेतलेली झेप असेल किंवा अमेरिकेसारख्या बड्यांनी नाकारलेले तंत्रज्ञान आत्मसात करण्यातील यश असेल, भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या गुणवत्तेने जगाला स्तिमित केले आहे, यात शंका नाही. ही सुखावणारी वस्तुस्थिती आहे. मात्र याचा अर्थ विज्ञानाच्या जागतिक नकाशावर आपण आपल्या संशोधन संस्थांचे आणि विद्यापीठांचे स्थान तपासायचेच नाही, असा असू नये. जगाच्या तुलनेत आपण कुठवर मजल मारली आहे, याचाही लेखाजोखा मांडायला हवा. देशाने स्वातंत्र्यानंतर शिक्षण, शेती, आरोग्य यांत निश्चित काही चांगले काम केले. अणू ऊर्जा, अवकाश संशोधन (स्पेस रिसर्च) कार्यक्रमही चांगले राबविले होते. तरीही गेल्या सहा दशकांमध्ये भारताने कल्पक असे काहीही केलेले नाही, ही मूर्ती यांची खंत आहे. संशोधन क्षेत्रात होणाऱ्या अल्प गुंतवणुकीपासून ते त्या क्षेत्रातल्या एकंदर उदासीनतेपर्यंतच्या प्रश्नांना स्पर्श करणारी ही खंत आहे. पंडित नेहरूंच्या द्रष्टेपणामुळे आपल्याकडील संशोधन संस्थांना पुरेशी स्वायत्तता आहे. तरीही नावीन्याचा निरंतर शोध घेण्याच्या प्रवासात आपण अजूनही चाचपडतोच आहोत, याची कारणे शोधायला हवीत. मूलभूत संशोधनात आर्थिक गुंतवणुकीबरोबर मानसिक गुंतवणूक करण्याचीही गरज आहे. ‘सिलिकॉन व्हॅली’तल्या अनेक कंपन्यांमधील भारतीयांच्या संख्येची नोंद घेतली तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. आपल्याकडची अनेक मुले परदेशात उत्तम काम करतात, याचा अर्थ तिथे गेल्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेत भर पडते, असे नाही, तर त्यांच्या आजूबाजूचे वातावरण पोषक असते. मूलभूत संशोधनाला वाहून घेऊन त्यात सार्थक मानणारी शास्त्रज्ञांची पिढी हे जर देशाचे वैभव असेल, तर ते प्राप्त करण्यासाठी आपण काय करणार आहोत याची स्पष्टता हवी. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा संशोधनाशी, संशोधनाचा उद्योगांशी, उद्योगांचा व्यापक अर्थव्यवस्थेशी आणि अर्थव्यवस्थेचा लोककल्याणाशी दृढ संबंध निर्माण होण्यासाठी संशोधनाचा पाया मजबूत व्हायला हवा. अनेक राष्ट्रांमधल्या संशोधन संस्था आणि विद्यापीठे जगभरातील गुणवंतांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेत. तेथे पैशांची उणीव नाही, त्यामुळे हे साध्य होते, असा सोपा निष्कर्ष काढून आपल्याला मोकळे होता येणार नाही. प्रश्न संशोधन संस्कृतीच्या अभावाचा आहे. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी संशोधन गतिमान होणे गरजेचे आहे, ही बाब कोणीच नाकारत नसताना सरकारसह विविध पातळ्यांवरील संशोधनाबाबतची उदासीनता अनाकलनीय आहे.
मानसिक गुंतवणुकीला निधीची जोडही आवश्यक आहे. संशोधन क्षेत्रातली आपली गुंतवणूक अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, दक्षिण कोरियासारख्या राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षाही कमी असलेली आपली संशोधन क्षेत्रातली गुंतवणूक २०१० पर्यंत दोन टक्क्यांवर न्यायची असे आपण २००३ मध्ये ठरवले होते. पण आपण ते अद्यापही साध्य करू शकलेलो नाही. सर्जनशीलता, नवनिर्मिती, धडाडी आणि त्यातून उत्पादकतावाढ ही साखळी त्यामुळे आपल्याला निर्माण करता आलेली नाही. त्यामुळेच भूतकाळाच्या गौरवातच रममाण होण्यापेक्षा आजचे वास्तव बदलण्यासाठी शिक्षण, विज्ञान-संशोधन, प्रशासन या क्षेत्रांबरोबरच विद्यार्थी आणि पालक आदी सर्वच घटकांनी ज्ञान-विज्ञान संस्कृतीची उपासना सुरू केली पाहिजे.
(प्रथम प्रसिद्धी - सकाळः अग्रलेख -18 जुलै 2015
(प्रथम प्रसिद्धी - सकाळः अग्रलेख -18 जुलै 2015
No comments:
Post a Comment