Wednesday, November 6, 2024

भारताचा ऑलिंपिक प्रवेश आणि डेक्कन जिमखाना

सन १९१९. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आणि देशाच्या राजकीय वाटचालीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी अनेक घटनांचे साक्षीदार असणारे हे वर्ष. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नेतृत्व देणाऱ्या पुण्यात त्याच वर्षी आणखी एक घटना घडली. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावरील ते घटित भारतीय क्रीडाक्षेत्राला आकार देणारे ठरले.

ती सुरुवात होती भारताच्या ऑलिंपिक यात्रेची; आणि त्या यात्रेचे शिल्पकार होते डेक्कन जिमखाना क्लबचे एक आश्रयदाते व पुढे अध्यक्षही असणारे सर दोराबजी टाटा आणि डेक्कन जिमखान्याचे त्यावेळचे चिटणीस आणि त्यावेळच्या पुणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर रामचंद्र तथा अप्पासाहेब भागवत.

डेक्कन जिमखान्याचे मैदान. डेक्कन जिमखान्याच्या वार्षिक मैदानी स्पर्धा जिमखान्याचे अध्यक्ष सर दोराबजी टाटा यांच्या उपस्थितीत भरल्या होत्या. स्थापनेनंतर जिमखान्याने एक तप पूर्ण केले होते आणि जिमखान्याच्या वार्षिकोत्सवातल्या कुस्ती आणि मैदानी खेळांव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक्स, पोहणे, सायकलिंग अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या उत्तरोत्तर वाढत होती. त्याचवर्षी खेळाडूंची संख्या एका हजाराला टेकली होती.

तेव्हाच्या स्पर्धांमध्ये १०० यार्डांची (सुमारे ९१ मिटर) एक आणि २५ मैल (४० किलोमीटर, म्हणजे जवळजवळ मॅरेथॉनएवढे अंतर) धावण्याची दुसरी अशा दोन प्रमुख शर्यती असायच्या. अनवाणी पायांनी धावणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी नोंदवलेल्या वेळा युरोपियन धावपटूंच्या वेळांशी बरोबरी करणाऱ्या आहेत, त्यातल्या काही मुलांनी ऑलिंपिक-वेळांशी बरोबरी केली आहे, हे सर दोराबजी यांच्या ध्यानात आल्यानंतर ही मुले ऑलिंपिकमध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर धावू शकतात, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या विचाराला खतपाणी घातले अप्पासाहेबांनी. ब्रिटिश वसाहत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील (त्याकाळी त्याला केप कॉलनी म्हणायचे) लोक ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर भारतीयांना ऑलिंपिकमध्ये का भाग घेता येऊ नये, असा भागवतांचा मुद्दा होता.

डेक्कन जिमखान्याचे सध्याचे विश्वस्त जय आपटे हा सगळा इतिहास सांगताना जणू ते दिवस पुन्हा अनुभवत असतात. अलीकडेच त्यांनी जिमखान्याचा इतिहास नोंदविणारी अनेक कागदपत्रे, त्याकाळातल्या वर्तमानपत्रांमधल्या बातम्या असे दस्तावेज एकत्र केले आहेत.

भारतातल्या खेळ-विश्वातल्या अनेक चांगल्या प्रथांचा उगम डेक्कन जिमखान्यात आहे आणि डेक्कन जिमखान्याच्या कार्यकारिणीतल्या मंडळींनी, अन्य सभासदांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेल्या काही कल्पना कशा काळाच्या पुढे होत्या हे या दस्तावेजांतून उलगडत जाते, असे ते सांगतात.

त्यावेळचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या मदतीने सर दोराबजी आणि अप्पासाहेब भागवतांनी भारतीयांच्या ऑलिंपिक प्रवेशाचे प्रयत्न सुरू केले, त्याआधी नॉर्मन प्रिचर्ड या कोलकत्याच्या खेळाडू-अभिनेत्याने १९००च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभाग नोंदवून दोन रौप्यपदके जिंकली होती. स्पर्धांच्याच काळात सुट्टी-पर्यटनाच्या निमित्ताने पॅरिसमध्ये असणाऱ्या प्रिचर्डचा ऑलिंपिक सहभाग हा काहीसा योगायोगच म्हणावा लागेल. मात्र प्रिचर्डचा ऑलिंपिक सहभाग भारताचा अधिकृत सहभाग म्हणून नोंदवला गेला तो नंतर बऱ्याच काळाने. (२०२०च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा भालाफेकीत सुवर्णपदक पटकावेपर्यंत भारतासाठी मैदानी खेळातील वैयक्तिक पदक जिंकणारा नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव खेळाडू होता. पुढे स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक जिंकले ते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये.)

भारतीय संघ स्वतंत्रपणे ऑलिंपिक स्पर्धांना जायला हवा या कल्पनेने भारलेल्या सर दोराबजींनी १९२०च्या अँटवर्प ऑलिंपिकसाठी प्रयत्न सुरू केले, डेक्कन जिमखान्याच्या १९१९च्या वार्षिकोत्सवानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये अँटवर्पमध्ये भारताचा पहिलावहिला स्वतंत्र ऑलिंपिक सहभाग नोंदवला गेला.

अर्थात त्याआधी पडद्यामागे खूप काही घडून गेले होते.

लकडी पुलापलीकडच्या मोकळ्या जागेत फर्ग्युसन महाविद्यालयातील काही उत्साही विद्यार्थी आणि काही उत्साही पुणेकर क्रिकेट खेळायला जमत असत. नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांसह काही नामवंत मंडळी या ‘यंग मेन्स क्रिकेट क्लब’शी जोडलेली होती. यातल्याच काही समविचारी मित्रांना बरोबर घेऊन सन १९०६मधील विजयादशमीच्या दिवशी बाळकृष्ण नारायण तथा बंडोपंत भाजेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी डेक्कन जिमखाना संस्थेची स्थापना केली.

भारतीय तसेच विदेशी खेळांना प्रोत्साहन देणे, त्या खेळांच्या स्पर्धा भरविणे, खेळांचे नियम करून ते खेळ लोकप्रिय करणे हे संस्थेचे कार्यउद्दिष्ट.

भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे ह्यासाठी डेक्कन जिमखान्याची कर्तीधर्ती मंडळी १९१० सालापासूनच प्रयत्न करत होती. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून १९१६ सालापासून दरवर्षी कुस्ती आणि अॅथलेटिक्स स्पर्धा भरविण्यात येतच होत्या.

पळण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसताना डेक्कन जिमखान्याच्या १९१९च्या वार्षिकोत्सवात १०० यार्ड आणि २५ मैलांच्या स्पर्धेत धावणाऱ्या तरुण मुलांनी नोंदवलेल्या वेळांनी प्रभावित झालेल्या सर दोराबजींनी सर लॉईड यांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. सर लॉईड यांनीही डेक्कन जिमखान्याच्या वार्षिक स्पर्धांमध्ये रस घेऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्याचे, जिमखान्यातील दस्तावेज सांगतात.

सर दोराबजींनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे त्यावेळचे अध्यक्ष काउंट बॅलेट लॅटोर यांना लिहिलेल्या एका वैयक्तिक पत्रामध्ये डेक्कन जिमखान्यावरचा त्यांचा अनुभव आणि अँटवर्प स्पर्धांमध्ये धावपटू पाठवण्यामागच्या त्यांच्या विचाराबद्दल सविस्तर लिहिले आहे. इंटरनॅशनल ऑलिंपिक म्युझियममध्ये हे पत्र आजही पाहायला मिळते.

भारताच्या ऑलिंपिक वाटचालीबद्दल बोरिआ मजुमदार आणि नलिन मेहता यांनी त्यांच्या ऑलिंपिक्स –दी इंडिया स्टोरी या पुस्तकात सर दोराबजी, डेक्कन जिमखाना आणि ऑलिंपिक चळवळीची भारतातील सुरुवात या विषयावर विस्ताराने लिहिले आहे.

अँटवर्प स्पर्धांसाठी संघ पाठवायचे ठरल्यानंतर इतक्या मोठ्या स्पर्धांसाठी संघ निवडण्याचे आव्हान होते. त्यासाठी अप्पासाहेब भागवतांनी सर दोराबजींच्या मदतीने एप्रिल १९२०मध्ये भारतातील पहिल्या ऑलिंपिक ट्रायल्स भरवि ल्या. या ट्रायल्समधून अँटवर्प स्पर्धांसाठी, पी.डी. चौगुले, पी.सी. बॅनर्जी, सदाशिव दातार, दिनकरराव शिंदे, के. नवले आणि एच. डी. कैकाडी असा सहाजणांचा संघ निवडण्यात आला. ऑलिंपिक धावपटू ‘जेसी’ ओवेन्सने आत्मचरित्रात या संघाचा, विशेषतः बेळगावच्या चौगुल्यांचा, उल्लेख केल्याचे आपटे आवर्जून सांगतात.

ऑलिंपिक ट्रायल्सच्या आधी जिमखान्याने महिला ऑलिंपियाड स्पर्धा भरविल्या होत्या. या स्पर्धांतील जवळजवळ ३० क्रीडाप्रकारांमध्ये सुमारे ७०० युरोपियन, पारशी आणि हिंदू स्पर्धकांनी भाग घेतल्याची बातमी पायोनिअर मेलने १६ फेब्रुवारी १९२०च्या अंकात प्रसिद्ध केली होती. एकशे चारवर्षांपूर्वीच्या या महिला ऑलिंपियाड स्पर्धांनी क्रीडाविश्वातल्या महिलांच्या सहभागाचा पाय रचण्यास महत्त्वाचा हातभार लावला, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

डेक्कन जिमखान्याच्या मैदानाच्या बाजूला आठल्ये पॅव्हेलियनची बैठी इमारत आहे. प्रथमदर्शनीच, एच.जी. वेल्सच्या विज्ञानकाल्पनिकेतल्या टाइम मशिनप्रमाणे आपल्याला थेट मागच्या शतकातच नेणारी ही इमारत इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या स्थापनेची साक्षीदार आहे.

१९२४च्या ऑलिंपिक स्पर्धांचे काम सुरू करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीची सूचना.
(छायाचित्र सौजन्यः  डेक्कन जिमखाना क्लब)

भारतीय क्रीडाक्षेत्रात अनेक मैलांचे दगड रोवणारी डेक्कन जिमखाना संस्था आता शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करते आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर ‘सुवर्ण’ कामगिरी नोंदवत असताना, त्या साऱ्यांच्या पूर्वसुरींना जागतिक क्रीडामंचाची दारे खुली करून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या डेक्कन जिमखान्याच्या योगदानाचे हे कृतज्ञतापूर्वक स्मरण!

(प्रथम प्रसिद्धी - साप्ताहिक सकाळ, २७ जुलै २०२४)

1 comment:

Anonymous said...

अरे बऱ्याच गोष्टी माहितच नव्हत्या कळल्या असंच लिहित रहा